अ‍ॅपशहर

आदित्य ठाकरेंच्या भाषणावेळीच 'मातोश्री'चा हुकमी एक्का स्टेजवर, शिवसैनिक ओरडले, "हे तर..."

Babanrao Gholap : निवडणुकीच्या १७ दिवस अगोदर न्यायालयीन अडचणीमुळे घोलपांना निवडणूक लढवता आली नाही. पेचप्रसंग निर्माण झाल्याने शिवसेनेकडून उमेदवार शोधाशोध सुरू झाली. भाजपमध्ये असणारे सदाशिव लोखंडे यांनी याच संधीचा फायदा घेत शिवसेनेत प्रवेश केला आणि सेनेने त्यांना उमेद्वारी दिली

Authored byअनिश बेंद्रे | Reported by सचिन बनसोडे | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 25 Jul 2022, 8:19 am

हायलाइट्स:

  • माजी मंत्री बबनराव घोलप यांची स्टेजवर एन्ट्री
  • शिवसैनिकांकडून 'शिवसेनेचा वाघ आला'च्या घोषणा
  • आदित्य ठाकरेंनी घोलपांचा हात हातात घेतला
बातमी थोडक्यात वाचण्यासाठी अॅप डाउनलोड करा
शिर्डी : शिर्डीचे शिवसेना खासदार सदाशिव लोखंडे हे शिंदे गटात सामिल झाल्याने शिवसैनिकांनी शिवसंवाद मेळाव्याप्रसंगी लोखंडे यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. आदित्य ठाकरे यांचे भाषण सुरू असतानाच शिवसेना नेते आणि माजी मंत्री बबनराव घोलप यांची मेळाव्या स्थळी एंट्री झाली आणि शिवसैनिकांनी 'भावी खासदार' असा उल्लेख करत घोलप यांच्या समर्थनार्थ घोषणा दिल्या.
कोण आहेत बबनराव घोलप?

२०१४ साली बबनराव घोलप यांची शिवसेनेकडून शिर्डी लोकसभा या अनुसूचित जातीसाठी राखीव मतदार संघात उमेदवारी निश्चित करण्यात आली होती. नाशिकचे असले तरी घोलप यांचा अनेक वर्षांपासून नगर जिल्ह्यात असणारा दांडगा संपर्क आणि त्यांनी उत्तर नगर जिल्ह्यात केलेली मोर्चेबांधणी यामुळे त्यांना फिक्स खासदार मानले जात होते. मात्र निवडणुकीच्या १७ दिवस अगोदर न्यायालयीन अडचणीमुळे घोलपांना निवडणूक लढवता आली नाही. पेचप्रसंग निर्माण झाल्याने शिवसेनेकडून उमेदवार शोधाशोध सुरू झाली. भाजपमध्ये असणारे सदाशिव लोखंडे यांनी याच संधीचा फायदा घेत शिवसेनेत प्रवेश केला आणि सेनेने त्यांना उमेद्वारी दिली. कुठलाही जनसंपर्क नसताना घोलपांनी केलेली मोर्चे बांधणी आणि शिवसैनिकांनी तळागाळात जाऊन केलेल्या प्रचारामुळे लोखंडे अवघ्या १७ दिवसात शिर्डीचे खासदार झाले.

लोखंडे शिंदे गटात

सदाशिव लोखंडे सेनेकडून खासदार झाले खरे मात्र ते मतदारसंघात दिसत नाहीत असा आरोप त्यांच्यावर सातत्याने केला गेला. २०१९ च्या लोकसभेसाठी शिवसेना पदाधिकाऱ्यांनी विरोध करूनही पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पुन्हा लोखंडेंना उमेदवारी दिली आणि लोखंडे निवडूनही आले. मात्र आता तेच सदाशिव लोखंडे ठाकरे यांची साथ सोडून शिंदे गटात सामील झाल्याने शिवसेना कार्यकर्ते संतप्त झाले आहेत. आदित्य ठाकरे यांचा शिवसंवाद मेळावा शिर्डी येथे सुरू असतानाच शिवसेनेचे माजी मंत्री बबनराव घोलप यांची कार्यक्रम स्थळी एंट्री झाली आणि शिवसैनिकांमध्ये उत्साह संचारल्याचे बघायला मिळाले.

हेही वाचा : शिवसेनेला आणखी एक धक्का, आता आदित्य ठाकरेही मोदी सरकारच्या रडारवर
'शिवसेनेचा वाघ आला'च्या घोषणा

आदित्य ठाकरे यांचे भाषण सुरू असतानाच कार्यकर्ते खा. सदाशिव लोखंडे यांच्याविरोधात घोषणाबाजी करत होते. योगायोगाने त्याचवेळी बबनराव घोलप कार्यक्रमस्थळी दाखल झाले. भाषण थांबत ठाकरे यांनी 'या घोलप साहेब' असे म्हणताच कार्यकर्त्यांनी, भावी खासदार, भावी खासदार, शिवसेनेचा वाघ आला, अशा घोषणा दिल्या. घोलप स्टेजवर दाखल होताच आदित्य ठाकरे यांनी त्यांचा हात हातात घेतला. यावेळी शिवसैनिकांनी घोलप यांच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी केली. मेळाव्यानंतर घोलप हे आदित्य ठाकरेंसोबत साईबाबांच्या दर्शनासाठी पोहचले.

हेही वाचा : मातोश्रीवर यायची इच्छा नाही, तुम्हीच माझ्या मतदारसंघात या, सत्तारांचं आदित्य ठाकरेंना प्रत्युत्तर

प्रसार माध्यमांनी त्यांना खा. लोखंडेच्या भूमिकेबद्दल विचारले असता, साईबाबांनी माझी वाट मोकळी करून दिल्याची सूचक प्रतिक्रिया घोलप यांनी दिली. पक्षाचा आदेश आल्यास तो शिरसावंद्य मानून जे पुढे मला कर्तव्य करायच ते मी करेल. मी बाळासाहेबांचा निष्ठावंत शिवसैनिक असून ५४ वर्ष सेनेत आहे. आदेश पाळणे माझा धर्म असून मला जे काम मिळेल ते मी करत राहील असे देखील घोलप म्हणाले. घोलप यांच्यासमोरील न्यायालयीन अडचणी देखील दूर झालेल्या आहेत. त्यामुळे आगामी काळात ते शिर्डी लोकसभेसाठी पुन्हा सक्रिय होणार असल्याचे संकेत त्यांनीच दिले आहेत. शिंदे गटात सामील झालेल्या खा. लोखंडे यांच्या विरोधात आता उद्धव ठाकरे यांनी बबनराव घोलप यांच्या रूपाने हुकमी एक्का मैदानात उतरवल्याचे बोलले जात आहे.

हेही वाचा : "राजकीय समीकरणं बदलली नसती, तर आदित्य ठाकरेंनी..." अमित ठाकरेंचाही भावावर हल्लाबोल
लेखकाबद्दल
अनिश बेंद्रे
महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये सिनिअर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत | क्राईम विषयाचा 'मास्टरमाईंड' | सामाजिक, राजकीय आणि मनोरंजनविषयक बातम्यांमध्येही हातखंडा | एबीपी माझा, टीव्ही९ मराठीसह पत्रकारिता क्षेत्रात १० वर्षांचा अनुभव... आणखी वाचा

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज