सिटीझन इम्पॅक्ट
......
धोकादायक कमानीची दुरुस्ती
नगर : डीएसपी चौकाजवळील धोकादायक बनलेल्या दिशादर्शक कमानीच्या वाकलेल्या खांबाला आधार देण्याचे काम गुरुवारी (२२ ऑगस्ट) सुरू करण्यात आले. खांब वाकल्यामुळे येथील कमान धोकादायक बनली होती. याबाबत 'महाराष्ट्र टाइम्स'मध्ये वृत्त प्रसिद्ध झाले होते. या वृत्ताची दखल घेऊन गुरुवारी दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले.
औरंगाबाद-नगर-पुणे या महामार्गावर डीएसपी चौकाजवळ दिशादर्शक कमान उभी करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी या कमानीच्या खांबाला कंटेनरने जोरदार धडक दिली. यामध्ये कमानीचा एक खांब वाकला. हा खांब सात ते आठ नटबोल्टच्या आधारावर उभा असल्यामुळे जोराचा पाऊस, वारा आल्यास ही कमान पडण्याचा धोका वाढला होता. याबाबत 'मटा'मध्ये बुधवारी वृत्त प्रसिद्ध झाले होते. त्यानंतर गुरुवारपासून येथे दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले आहे.
गुरुवारी डीएसपी चौकामध्ये कमानीच्या वाकलेल्या खांबाला लोखंडी रॉडचा आधार देण्याचे काम सुरू करण्यात आले होते. जेणेकरून जोराचा वारा किंवा पावसामुळे कमानीला धोका होणार नाही. औरंगाबाद-नगर-पुणे महामार्गावरील नगर शहरातील डीएसपी चौक हा महत्त्वाचा चौक आहे. चोवीस तास रहदारी असलेल्या या चौकातील धोकादायक कमान दुरुस्तीचे काम करण्यात आले.
.......