अ‍ॅपशहर

आरोपीकडून पैसे घेणारा पोलिस निरीक्षक निलंबित

एक कोटी रुपये किमतीचा गांजा पकडल्याच्या गुन्ह्यात आरोपींना मदत करण्यासाठी पैसे घेणाऱ्या तोफखाना पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक राकेश मानगावकर यांना निलंबित करण्यात आले आहे.

Maharashtra Times 22 Jul 2017, 3:00 am
म. टा. प्रतिनिधी, नगर
महाराष्ट्र टाइम्स.कॉम money launderer police inspector suspended
आरोपीकडून पैसे घेणारा पोलिस निरीक्षक निलंबित

एक कोटी रुपये किमतीचा गांजा पकडल्याच्या गुन्ह्यात आरोपींना मदत करण्यासाठी पैसे घेणाऱ्या तोफखाना पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक राकेश मानगावकर यांना निलंबित करण्यात आले आहे. आरोपीकडून पैसे घेतल्याची तक्रार थेट पोलिस महानिरीक्षकांकडे गेल्यानंतर चौकशी करून मानगावकर यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात असून, आणखी पोलिस कर्मचाऱ्यांची चौकशी सुरू आहे.

गेल्या महिन्यात गांजा तस्करी करणारी दोन वाहने तोफखाना पोलिसांनी पकडून सुमारे एक कोटी रुपयांचा गांजा जप्त केला होता. संगमनेरमधील सीमा राजू पंचारिया या महिलेसह पाच जणांना पोलिसांनी अटक केली होती. त्यात गांजा विकत घेणाऱ्या २६ जणांची नावे निष्पण झाली होती. त्यातील काही आरोपींना तोफखाना पोलिसांनी अटक केली होती. या गुन्ह्यातील आरोपींना अटक न करण्यासाठी व अटक केलेल्या आरोपींना सोडविण्यासाठी तोफखान्याचे पोलिस निरीक्षक मानगावकर यांनी आरोपींना पैसे मागितले होते. याबाबत पुरावे जमा करून थेट नाशिक परिक्षेत्राचे पोलिस महानिरीक्षक विनय चोबे यांच्याकडे देण्यात आले होते. त्यांनी चौकशीची आदेश पोलिस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांना दिल्यानंतर शहराचे सहायक पोलिस अधीक्षक अक्षय शिंदे यांनी या प्रकरणाची चौकशी सुरू केली. त्यात प्राथमिक चौकशीत मानगावकर हे दोषी आढळल्याने त्यांना पोलिस महानिरीक्षकांनी तातडीने निलंबित करून त्यांची विभागीय चौकशी सुरू करण्यात आली आहे. यात तोफखाना पोलिस स्टेशनच्या आणखी काही पोलिस कर्मचाऱ्यांचा सहभाग आहे का? याची चौकशी करण्यात येत आहे. दरम्यान, तोफखाना पोलिस स्टेशनला पाथर्डीचे पोलिस निरीक्षक पांडुरंग पवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर पाथर्डीला शनीशिंगणापूरचे राजेंद्र चव्हण यांची बदली करण्यात आली आहे.

कोट

पोलिस निरीक्षक मानगावकर यांनी गांजाप्रकरणात आरोपींना मदत करण्यासाठी पैशाची मागणी केली होती. त्यात काही पैसे घेतले होते. तर काही पैसे घ्यायचे बाकी होते. त्यात दोषी आढळल्याने त्यांना निलंबित करण्यात आले. इतर कर्मचाऱ्यांबाबत चौकशी करण्यात येत आहे.

रंजनकुमार शर्मा, पोलिस अधीक्षक

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज