अ‍ॅपशहर

शिक्षक भारतीची रविवारपासून आंदोलने

विनाअनुदानित शाळांतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना अनुदान देण्याच्या मागणीसाठी शिक्षक भारती येत्या रविवारपासून राज्यात टप्प्याटप्प्याने आंदोलने करणार आहे

Maharashtra Times 29 Sep 2016, 3:00 am
म. टा. प्रतिनिधी, नगर
महाराष्ट्र टाइम्स.कॉम morcha by shiksha bharati
शिक्षक भारतीची रविवारपासून आंदोलने


विनाअनुदानित शाळांतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना अनुदान देण्याच्या मागणीसाठी शिक्षक भारती येत्या रविवारपासून (२ ऑक्टोबर) राज्यात टप्प्याटप्प्याने आंदोलने करणार आहे. विनाअनुदानित शाळांमधील शिक्षकांची फसवणूक झाली असून, त्यांना २० टक्के अनुदान देण्यासाठी जाचक अटी घातल्या गेल्याचा आरोपही शिक्षक भारतीने केला आहे.

शिक्षक भारतीचे संस्थापक अध्यक्ष आमदार कपिल पाटील, राज्य सचिव सुनील गाडगे, कार्याध्यक्ष अप्पासाहेब जगताप आदींसह अन्य पदाधिकाऱ्यांनी २ ऑक्टोबरपासूनच्या राज्यव्यापी आंदोलनाचे नियोजन केले आहे. गांधी जयंती दिवशीचे हे पहिले आंदोलन मुंबईत केले जाणार आहे. यात नगर जिल्ह्यातून जिल्हाध्यक्ष बाबासाहेब लोंढे, मोहमद समी शेख, जितेंद्र आरू, हनुमंत रायकर, सुदाम सरोदे, शकुंतला वाळुंज, छाया लष्करे, महिला जिल्हाध्यक्ष आशा मगर, सचिव विभावरी रोकडे, कार्याध्यक्ष मीनाक्षी सूर्यवंशी, जया गागरे, संध्या गावडे, बापूसाहेब गायकवाड, अशोक धनवडे, संभाजी चौधरी, श्रीकांत गाडगे, प्रवीण रुपटक्के, प्रशांत कुलकर्णी आदी सहभागी होणार आहेत.

विनाअनुदानित शाळेतील शिक्षकांना पगार द्यायचे नाहीत व अनुदानित शाळांतील शिक्षकांना अतिरिक्त करून मराठी माध्यमांच्या शाळा हळूहळू बंद करण्याचे शासनाचे धोरण असल्याचा दावा शिक्षक भारतीने केला आहे. ३-४ भाषांना एकच शिक्षक तसेच गणित व विज्ञानासाठी एकच शिक्षक या संचमान्यतेच्या नव्या निकषाने सामान्य मुलांचे शिक्षण उद्ध्वस्त होणार आहे.

कला-क्रीडा शिक्षकांना ५० रुपये रोजावर लावण्याचे धोरण राज्यातील कला व क्रीडा संस्कृतीचा संपुष्टात आणणारे आहे तसेच दहावीच्या विद्यार्थ्यांना इंग्रजी व गणित विषयाला पर्यायी विषय देण्याचे धोरणही चुकीचे आहे. व्यवहारासाठी हे दोन्ही विषय महत्त्वाचे असल्याचे शिक्षक भारतीचे म्हणणे आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज