अ‍ॅपशहर

खासदार सुजय विखे पाटलांनी लोकप्रतिनिधींसमोर आदर्श निर्माण केला; मुंबईतील घटनेची देशभरात चर्चा...

Sujay Vikhe Patil: लोकप्रतिनिधीने कसे असावे याचा आदर्श अहमदनगरचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील काल सोमवारी रात्री मुंबईत दिला. गाडीतून उतरून सुजय यांनी एका ज्येष्ठ नागरिकांच्या गाडीला धक्का देत त्यांना मदत केली.

Authored byविजयसिंह होलम | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 21 Mar 2023, 11:46 am
अहमदनगर : आपल्या मतदारसंघात प्रवास करत असताना रस्त्यात अडचणीत सापडलेल्या व्यक्तींच्या मदतीला लोकप्रतिनिधी धावून गेल्याचे अनेकदा पहायला मिळते. मात्र, मतदारसंघ नसलेल्या आणि तेही मुंबईसारख्या शहरात बाहेरच्या मतदारसंघातील लोकप्रतिनिधीने धावून जाणे विरळच. असाच प्रकार काल रात्री मुंबईत घडला. अहमदनगरचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील रात्री मुंबईत ज्येष्ठ नागरिकांच्या एका गाडीला धक्का मारताना दिसले. कल्याणमधील एका अभियंत्याने ही दृष्य टिपून सोशल मीडियात पोस्ट केले आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम Sujay Vikhe Patil Help


केतन भोई या कल्याणमध्ये राहणाऱ्या अभियंत्याने ही पोस्ट केली आहे. भोई यांचे शिक्षण नगरच्या विखे पाटील अभियांत्रिक महाविद्यालयात झालेले आहे. त्यामुळे त्यांनी खासदार डॉ. विखे पाटील यांना ओळखले. भोई लिहितात…आज ऑफिस संपल्यानंतर कॅबने घरी जात असताना अंधेरी येथे ३ लोकं एका गाडीला धक्का देताना दिसले. मुंबईत असे प्रसंग फार कमी वेळा दिसतात त्यामुळे कुतूहलाने बघत होतो. तेवढ्यात लक्षात आलं की अरे यात मध्यभागी तर आपले नगरचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील आहेत. पटकन फोटो काढायचा प्रयत्न केला पण नीट फोटो घेता आला नाही. कुठलाही बडेजाव न करता नगरच्या बाहेर स्वतः रस्त्यावर उतरून एका अनोळखी व्यक्तीला मदत करणारे आमच्या नगरचे खासदार आहेत हे बघून अभिमान वाटला. असे खासदार सर्वांना मिळो!


यासंबंधी अधिक माहिती घेतली असता असे समजले की खासदार डॉ. विखे पाटील काल दिल्लीला जाण्यासाठी मुंबईत विमानतळावर निघाले होते. रस्त्यात एका ज्येष्ठ नागरिक दाम्पत्याची गाडी बंद पडली होती. रात्रीची वेळ असल्याने मदतीला कोणीही नव्हते. ते दोघेच प्रयत्न करीत असले तरी त्यांना शक्य होत नव्हते. हे पाहून खासदार डॉ. विखे पाटील यांनी आपले वाहन थांबविले. त्यांच्यासोबतचही मोजकेच सहकारी होते. त्यामुळे ते स्वत: खाली उतरले आणि ज्येष्ठ नागरिकांच्या गाडीला धक्का मारून त्यांची मदत केली.


विखे पाटील यांनी नगर जिल्ह्यात केंद्र सरकारच्या राष्ट्रीय वयोश्री योजनेतून ज्येष्ठ नागरिकांना आवश्यक असलेल्या साहित्याचे मोठ्या प्रमाणात वाटप केले आहे. या योजनेतील सर्वाधिक खर्च आणि लाभाधारक नगर जिल्ह्यातील आहेत. याशिवाय ज्येष्ठ नागरिकांसाठी आरोग्य शिबिरे, मेळावे आणि दौऱ्याच्या वेळीही ज्येष्ठ नागरिकांच्या भेटी यातून खासदार विखे पाटील यांची ज्येष्ठ नागरिकांप्रती आस्था दिसून येते. काल रात्री मुंबईच्या रस्त्यावर ती पुन्हा एकदा दिसून आली.
लेखकाबद्दल
विजयसिंह होलम
विजयसिंह होलम, ‘महाराष्ट्र टाइम्स’मध्ये विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. पत्रकारितेमधील २२ वर्षांचा अनुभव. राजकीय, सामाजिक, गुन्हेगारी विषयक आणि चालू घडामोडींच्या विषयांवर वेळोवेळी विश्लेषणात्मक लिखाण करतात. पत्रकारितेतील अनुभवांसंबंधी पुस्तकाचेही लेखन.... आणखी वाचा

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज