अ‍ॅपशहर

तिहेरी तलाक बंदीला मुस्लिम महिलांचाच विरोध

'तिहेरी तलाक बंदी कायद्याला मुस्लिम महिलांचाच विरोध असून, मुस्लिम धर्मात हस्तक्षेप करण्याचा अधिकार सरकारला नाही, तसेच असा कायदा करण्याआधी मुस्लिम महिला व धर्मगुरूंना विश्वासात घ्यायला हवे होते, असे मुस्लिम महिलांचे म्हणणे आहे', असा दावा राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष फौजिया खान यांनी केला.

Maharashtra Times 11 Aug 2018, 2:14 am
महाराष्ट्र टाइम्स.कॉम muslim
म. टा. प्रतिनिधी, नगर

'तिहेरी तलाक बंदी कायद्याला मुस्लिम महिलांचाच विरोध असून, मुस्लिम धर्मात हस्तक्षेप करण्याचा अधिकार सरकारला नाही, तसेच असा कायदा करण्याआधी मुस्लिम महिला व धर्मगुरूंना विश्वासात घ्यायला हवे होते, असे मुस्लिम महिलांचे म्हणणे आहे', असा दावा राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष फौजिया खान यांनी केला.

राष्ट्रवादी महिला काँग्रेसने 'संविधान वाचवा-देश वाचवा' अभियान हाती घेतले असून, या महिनाखेरीस नाशिक येथे मेळावा घेतला जाणार आहे. यासंदर्भातील जनजागृतीसाठी खान यांनी येथील राष्ट्रवादी भवनात जिल्ह्यातील पक्ष कार्यकर्ते, महिला पदाधिकारी व नेत्यांची बैठक घेतली. या वेळी जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्ष राजश्री घुले, महिला जिल्हाध्यक्षा मंजूषा गुंड, महिला शहर जिल्हाध्यक्ष रेश्मा आठरे तसेच शहराचे आमदार संग्राम जगताप, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर घुले, शहर जिल्हाध्यक्ष प्रा. माणिक विधाते, श्रीरामपूरच्या नगराध्यक्षा अनुराधा आदिक, महिला राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष उषा दराडे, सुरेखा ठाकरे, महिला प्रदेश उपाध्यक्षा निर्मला मालपाणी, शारदा लगड, मेधा कांबळे, संजय कोळगे आदी उपस्थित होते.

या बैठकीआधी पत्रकार परिषदेत बोलताना खान यांनी केंद्र व राज्यातील भाजप सरकारवर जोरदार टीका केली. 'देशातील लोकशाही धोक्यात आली असून, सर्वत्र अराजकता पसरली आहे. मराठा, धनगर, मुस्लिम, लिंगायत व अन्य अनेक समाज रस्त्यावर उतरले आहेत तसेच राज्य सरकारी कर्मचारी, अंगणवाडी सेविका, संस्थाचालकही आंदोलन करीत आहेत. देशात अस्थिर वातावरण आहे. अशा स्थितीत देशातील प्रत्येक संवैधानिक संस्था ताब्यात घेण्याचे प्रकार भाजप सरकारने सुरू केल्याने राष्ट्रवादी महिला काँग्रेसने संविधान बचाव-देश बचाव अभियानाअंतर्गत मनुस्मृती व ईव्हीएम दहन आंदोलन हाती घेतले आहे. नागपूर येथे असे आंदोलन झाले असून, आता नाशिकला केले जाणार आहे', असे खान यांनी सांगितले.

'तिहेरी तलाक बंदी कायद्याविरोधात मुस्लिम महिला रस्त्यावर उतरल्या असून, असा कायदा आम्हाला नको, अशी मागणी करीत आहेत. प्रत्येक धर्माचे कायदे असून, ते त्यांना पाहू द्यावे, त्यात सरकारने हस्तक्षेप करू नये तसेच ज्यांच्यासाठी हा कायदा आणला जात आहे, त्या महिलांना व मुस्लिम समाजाच्या धर्मगुरूंना विश्वासात घेतले जावे, अशी या महिलांची मागणी आहे', असेही खान यांनी सांगितले.


विजयाबद्दल संशय

देशभर विरोधी वातावरण असताना भाजपला जळगाव महापालिका व अन्य महापालिकांतून मिळालेल्या यशाबद्दल खान यांनी संशय व्यक्त केला. 'भाजप अन्य पक्षांतून उमेदवार आयात करतो तसेच जळगावमध्ये पोलिसांद्वारे पैसे वाटप झाल्याचे आमच्या (राष्ट्रवादी) कार्यकर्त्यांनी आम्हाला सांगितले आहे', असे त्या म्हणाल्या. 'ईव्हीएम'द्वारे मतदान बंद करून बॅलेट पेपरवर घेण्याची १७ पक्षांची मागणी असूनही त्याची दखल घेतली जात नसल्याने दिल्ली व मुंबईतील निवडणूक आयोगाच्या कार्यालयासमोर राष्ट्रवादी महिला काँग्रेस 'ईव्हीएम'चे जाहीर दहन आंदोलन करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज