अ‍ॅपशहर

पदाधिकारी बदलाची क्लृप्ती

मनपाकडून नोटिसा मिळालेल्या गणेश मंडळांपैकी काहींनी यंदा पुन्हा परवानगी मिळण्यासाठी क्लृप्ती लढवताना नवे पदाधिकारी नियुक्त करून त्यांच्या नावाने परवानगी घेण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत;

Maharashtra Times 25 Aug 2017, 3:00 pm
म. टा. प्रतिनिधी, नगर
महाराष्ट्र टाइम्स.कॉम nagar ganesh mandal notice
पदाधिकारी बदलाची क्लृप्ती


मागील वर्षीच्या गणेशोत्सवात बेकायदा मंडप उभारणीसह विविध अटी व नियमांचा भंग केल्याने मनपाकडून नोटिसा मिळालेल्या गणेश मंडळांपैकी काहींनी यंदा पुन्हा परवानगी मिळण्यासाठी क्लृप्ती लढवताना नवे पदाधिकारी नियुक्त करून त्यांच्या नावाने परवानगी घेण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत; मात्र, यासंदर्भातील तपासणी मनपाच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाने सुरू केली आहे. दरम्यान, नागापूर व बोल्हेगाव परिसरातील दोन मंडळांनी विनापरवाना मंडप उभारणी केल्याने त्यांना नोटिसा देण्यात आल्या आहेत. यंदाच्या गणेशोत्सवासाठी आतापर्यंत सव्वाशेवर मंडळांनी मनपाकडे नोंदणी केली आहे.

सार्वजनिक उत्सवांसाठीचे मंडप धोरण महापालिकेने तयार केले नसले तरी उच्च न्यायालय व राज्य सरकारने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार दोन वर्षांपासून मनपाद्वारे सार्वजनिक गणेशोत्सव परवानगी दिली जात आहे. यंदाही अशा परवानगीसाठी मनपामध्ये झुंबड उडाली आहे. वाहतूक पोलिसांचा ना-हरकत दाखला, धर्मादाय आयुक्तांकडे नोंद, नगर रचना विभागाचा अभिप्राय आदी मुद्यांच्या अनुषंगाने खातरजमा करून परवानगी दिली जात आहे. मागील वर्षीच्या गणेशोत्सवात नियमभंग केल्याने ३४ मंडळांना नोटिसा देऊन रोज प्रत्येकी १०० रुपयांप्रमाणे १ हजार १०० रुपयांची दंड आकारणी करण्यात आली असल्याने या मंडळांना यंदा परवानगी देण्यात आलेली नाही. या मंडळांना नोटिसा देताना त्यांच्या तत्कालीन अध्यक्ष व अन्य पदाधिकाऱ्यांच्या नावाने नोटिसा दिल्या गेल्या असल्याने यंदा ही नावे असलेल्यांना पुन्हा परवानगी मिळणार नसल्याचे लक्षात आल्यावर काहींनी नवी क्लुप्ती लढवत पदाधिकारीच बदलून टाकून, या नव्या नावाने परवानगीचे अर्ज केले आहेत. त्यांची तपासणी अतिक्रमण निर्मूलन विभागाने सुरू केली आहे.

दोन मंडळांना नोटीस

गणेश मंडप उभारणीची कामे अंतिम टप्प्यात आली असून तहसीलदारांच्या अध्यक्षतेखालील समितीचे प्रतिनिधी गुप्तपणे या मंडपांची तपासणी करीत आहेत. महसूल, मनपा, आरटीओ प्रतिनिधींच्या या पथकाने बोल्हेगाव व नागापूर येथे उभारण्यात आलेल्या दोन बेकायदा मंडपांचा अहवाल मनपाला दिला असून, त्यांना तातडीने नोटिसा बजावण्यात आल्याचे अतिक्रमण निर्मूलन विभाग प्रमुख सुरेश इथापे यांनी सांगितले.

आकार झाले कमी

उच्च न्यायालय व सरकारने सार्वजनिक मंडप उभारणीबाबत केलेल्या नियमांची मनपाद्वारे सार्वजनिक गणेश मंडळ कार्यकर्त्यांच्या बैठकांतून जनजागृती केली गेल्याने तसेच मागील तीन वर्षांपासून दरवर्षी बेकायदा मंडप उभारणीबद्दल नोटिसा व दंडात्मक कारवाईचे धोरण सुरू केल्याने यंदा बहुतांश मंडपांचे आकार थोडे कमी झाले आहेत. पूर्वी रस्ते व्यापून टाकणारे मंडप यंदा आकाराने कमी झाले असून, परिसरातील नागरिकांना जा-ये करण्याची सुविधा केली गेली असल्याचे तपासणी पथकाचे निरीक्षण आहे. दरम्यान, महापालिकेकडे आतापर्यंत १२५ वर सार्वजनिक मंडळांनी गणेशोत्सवाची नोंदणी केली आहे.

चौकट ः

३२ मंडळांना नोटिसा

नगर शहरात उभारण्यात आलेल्या सार्वजनिक गणेश मंडळांच्या मंडपांची तपासणी सुरू असून, ३५ ठिकाणी उभारलेल्या मंडपांचे पंचनामे करण्यात आले आहेत. यापैकी ३ मंडळांनी मनपाकडे परवानगीसाठी अर्ज केले असल्याने बाकी ३२ मंडळांना तातडीने मनपाची परवानगी घेतली नाही तर मंडप उतरवून घेण्याच्या नोटिसा देण्यात आल्या आहेत. याशिवाय मनपा आयुक्त घनश्याम मंगळे यांनीही चारही प्रभाग अधिकाऱ्यांना सूचना देऊन त्यांच्या प्रभाग समितीअंतर्गत परिसरात असलेले बेकायदा मंडप तातडीने उतरवून घेण्याची कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज