अ‍ॅपशहर

काँग्रेसअंतर्गतच सत्तेची चुरस

जिल्हा परिषद निवडणूक निकालानंतर सर्वाधिक २३ जागा जिंकणाऱ्या काँग्रेसमध्येच आता अध्यक्षपदाची रस्सीखेच रंगण्याची चिन्हे आहेत. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे व आमदार बाळासाहेब थोरात यांच्यापैकी कोणाच्या गटाला अध्यक्षपद भूषविण्याचा मान मिळतो, याची उत्सुकता जिल्ह्यात आहे.

Maharashtra Times 25 Feb 2017, 3:00 am
म.टा.प्रतिनिधी,नगर
महाराष्ट्र टाइम्स.कॉम nagar zp power race
काँग्रेसअंतर्गतच सत्तेची चुरस


जिल्हा परिषद निवडणूक निकालानंतर सर्वाधिक २३ जागा जिंकणाऱ्या काँग्रेसमध्येच आता अध्यक्षपदाची रस्सीखेच रंगण्याची चिन्हे आहेत. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे व आमदार बाळासाहेब थोरात यांच्यापैकी कोणाच्या गटाला अध्यक्षपद भूषविण्याचा मान मिळतो, याची उत्सुकता जिल्ह्यात आहे. दरम्यान, जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसची आज येथे होणारी बैठक महाशिवरात्रीमुळे पुढे ढकलली गेली असून, येत्या एक-दोन दिवसांत ती होण्याची चिन्हे आहेत.

जिल्हा परिषदेची मुदत २१ मार्च रोजी संपणार आहे. त्याआधी नव्या अध्यक्षांची निवड होणार आहे. त्यामुळे मार्चच्या दुसऱ्या आठवड्यात ही निवड अपेक्षित मानली जात आहे. मात्र, या सत्तेसाठी मतांची जुळवाजुळव आतापासून सुरू झाली आहे. निवडून आलेल्या ७२ जागांपैकी सर्वाधिक २३ जागा काँग्रेसच्या आहेत. त्याखालोखाल १८ जागा राष्ट्रवादीच्या तर १४ जागा भाजप, सात शिवसेना व १० अपक्षांना मिळाल्या आहेत. गुरुवारी सायंकाळी हा निकाल स्पष्ट झाल्यानंतर विरोधी पक्षनेते विखे यांनी नगरमध्ये पत्रकार परिषदेत बोलताना जिल्हा परिषदेची सत्ता काँग्रेसच्या ताब्यात घेण्यासाठी मित्रपक्ष राष्ट्रवादीसह समविचारी मंडळींना समवेत घेण्याचे सूतोवाच केले. मात्र, निवडणुकीत नगर तालुक्यात बरोबर असलेल्या शिवसेनेला जिल्हा परिषदेच्या सत्तेत घ्यायचे की नाही, याचा निर्णय वरिष्ठांशी चर्चा करून घेण्याचेही त्यांनी आवर्जून सांगितले आहे. त्यामुळे काँग्रेस व राष्ट्रवादी यांच्या आघाडीचीच सत्ता अपेक्षित मानली जात आहे. यात सर्वाधिक जागांमुळे अध्यक्षपद काँग्रेसला व उपाध्यक्षपद राष्ट्रवादीकडे असणार आहे. शिवाय विषय समित्यांपैकी तीन काँग्रेसला व दोन राष्ट्रवादीला मिळू शकतील. मात्र, काँग्रेसने या सत्तासमीकरणाची घोषणा केली असली तरी अजून राष्ट्रवादीने मात्र त्यावर शिक्कामोर्तब केलेले नाही. अर्थात तो औपचारिकतेचा भाग असल्याचे काँग्रेस सूत्रांकडून स्पष्ट केले जात आहे. प्रश्न फक्त काँग्रेसअंतर्गत अध्यक्षपदाचा मान कोणत्या गटाला मिळणार, याचा असल्याचेही सांगितले जात आहे.

सल्ल्याची चर्चा

‘भाजपचे पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांचे ‘मिशन फोर्टी प्लस’ फक्त ‘फोर्टिन’ ठरले आहे, त्यांनी आता स्वतःची चिंता करावी. ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी बीड जिल्ह्यातील अपयशाची नैतिक जबाबदारी स्वीकारून मंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे, त्यातून प्रा. शिंदे यांनी बोध घ्यावा, पण त्यांनी राजीनामा द्यावा असे मी म्हणत नाही’, असेही विखेंनी पत्रकार परिषदेत म्हटले असल्याने त्यांनी पालकमंत्र्यांना दिलेल्या या सल्ल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज