अ‍ॅपशहर

निजामुद्दीन-शिर्डी नवी वातानुकूलित रेल्वे सुरू

हजरत निजामुद्दीन ते साईनगर शिर्डी अशी नवी वातानुकूलित सुपरफास्ट रेल्वे गाडी (क्रमांक-०४४१२-०४४११) नव्याने सुरू करण्यात आली आहे.

Maharashtra Times 27 Apr 2017, 3:07 am
म. टा. प्रतिनिधी, नगर
महाराष्ट्र टाइम्स.कॉम new ac train
निजामुद्दीन-शिर्डी नवी वातानुकूलित रेल्वे सुरू


हजरत निजामुद्दीन ते साईनगर शिर्डी अशी नवी वातानुकूलित सुपरफास्ट रेल्वे गाडी (क्रमांक-०४४१२-०४४११) नव्याने सुरू करण्यात आली आहे. आठवड्यातून एक दिवस असणारी ही रेल्वे सेवा २८ जूनपर्यंत सुरू राहणार आहे. दर मंगळवारी ही रेल्वे निजामुद्दीन येथून, तर दर बुधवारी साईनगर-शिर्डी येथून सुटणार आहे.

उन्हाळ्याच्या सुटीत शिर्डीला येणाऱ्या भाविकांची संख्या वाढत असल्याने या प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वे प्रशासनाने ही नवी वातानुकूलित रेल्वे सुरू केली आहे. या गाडीला १८ डबे असणार आहेत. या सुपरफास्ट रेल्वेची पहिली निजामुद्दीन येथून सुटलेली गाडी मंगळवारी (२५ एप्रिल) रात्री साईनगर-शिर्डीला आली व बुधवारी (२६ एप्रिल) सकाळी १० वाजता येथून पुन्हा निजामुद्दीनकडे रवाना झाली.

दर मंगळवारी मध्यरात्री १२ वाजून १० मिनिटांनी हजरत निजामुद्दीन रेल्वे स्थानकावरून ही सुपरफास्ट साप्ताहिक रेल्वे सुटणार आहे. आग्रा कॅट, झांसी, हबीबगंज, इटारसी, भुसावळ, जळगाव, मनमाड, कोपरगाव यामार्गे या दिवशी रात्री ११ वाजून १५ मिनिटांनी ती साईनगर-शिर्डीला पोचणार आहे. हीच रेल्वे दुसऱ्या दिवशी, म्हणजे बुधवारी सकाळी १० वाजता साईनगर-शिर्डी स्थानकावरून सुटून गुरुवारी सकाळी ९ वाजून ४० मिनिटांनी निजामुद्दीन येथे पोचणार आहे. शिर्डीसह हजरत निजामुद्दीन तसेच आग्रा, इटारसी, झांसी, हबीबगंज आदी ठिकाणी जाऊ इच्छिणाऱ्या प्रवाशांनी या गाडीच्या सेवेचा लाभ घेण्याचे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज