म. टा. प्रतिनिधी, नगर
नगर-सोलापूर रस्त्यावर नगर तालुक्यातील साकत गावाजवळ मालट्रक व क्रुझर गाडीचा अपघात होऊन क्रुझरमधील नऊ प्रवासी जखमी झाले आहेत. अपघातानंतर मालट्रकचालक वाहनासह पळून गेला आहे. गुरुवारी रात्री हा अपघात झाला. या प्रकरणी ट्रकचालकाविरुद्ध नगर तालुका पोलिस स्टेशनला गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
क्रुझर जीपचालक नागेस गणपत आदलिंगे, श्रीधर शिवाजी माळी, कोमल श्रीधर माळी, महादेव हरिश्चंद्र माळी, अजित जनार्दन क्षीरसागर, तृप्ती अजित क्षीरसागर, कान्होपात्रा सुदर्शन यादव, सुदर्शन महावीर यादव, गोपाळ भरत हंडे, एकनाथ हरिश्चंद्र माळी अशी जखमींची नावे असून, सर्व जण सोलापूर जिल्ह्यातील मार्डी येथील रहिवासी आहेत. दोन जणांच्या पाय व हाताला गंभीर दुखापत झाली असून, इतर किरकोळ जखमी झाले असल्याची माहिती नगर तालुका पोलिस स्टेशनकडून मिळाली. हे सर्व जण गुरुवारी रात्री शिर्डी व शनी शिंगणापूर येथे दर्शनासाठी क्रुझर जीपमधून नगरच्या दिशेने येत होते. साकत गावाजवळ सोलापूरकडे जात असलेल्या मालट्रकची क्रुझरच्या चालकाच्या बाजूला धडक बसली. त्यात क्रुझ गाडीचे नुकसान होऊन गाडीतील प्रवासी जखमी झाले. अपघातानंतर मालट्रकचालक वाहनासह निघून गेला. त्यानंतर जखमींना उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. नगर-सोलापूर महामार्गावर पावसामुळे मोठ-मोठ खड्डे पडलेले आहेत. त्यामुळे खड्डे हुकविण्याच्या प्रयत्नात या मार्गावर अपघात होत आहे.