अ‍ॅपशहर

अण्णा हजारेंच्या आंदोलनाचे काय होणार? संभ्रम वाढला

शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आंदोलनाचा इशारा देणारे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यावेळी एकटेच उपोषणाला बसणार आहेत. आंदोलनासाठी 'टीम अण्णा' तयार करण्यात आलेली नाही.

Authored byविजयसिंह होलम | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 23 Jan 2021, 11:15 am
अहमदनगर: ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या आंदोलनासाठी यावेळी ‘टीम अण्णा’ तयार करण्यात आलेली नाही. वेळ पडलीच तर हजारे एकटेच उपोषण सुरू करणार, हे आता स्पष्ट झाले आहे. दोन वर्षांपूर्वी राळेगणसिद्धीमध्ये झालेल्या आंदोलनाचे नियोजन ग्रामस्थांनीच केले होते. तशीच तयारी आता हाती घेण्यात आली आहे. तर दुसरीकडे चर्चेच्या फेऱ्या वाढत असल्याने आंदोलन स्थगित होते की काय, याचीही प्रतीक्षा आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम Anna Hazare


वाचा: फडणवीसांची बाळासाहेबांना आदरांजली; शिवसेनेला चिमटे

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर ३० जानेवारीपासून हजारे यांनी पुन्हा एकदा एल्गार पुकारला आहे. दिल्लीत जागा न मिळाल्याने त्यांनी राळेगणसिद्धी येथेच उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी हजारे यांच्या आंदोलनासाठी टीम असायची. दरवेळी नवीन का होईना मात्र कार्यकर्त्यांची एक फळी हजारे यांच्यासोबत असायची. त्यातील काही मंडळी प्रत्यक्ष आंदोलनात सहभागी होत तर काही सरकारसोबत चर्चेसाठी मध्यस्थी, प्रसिद्धी आणि अन्य कामे सांभाळत असत. मात्र, आंदोलनाचा फायदा उठवत अनेकांनी राजकारणात प्रवेश केल्यानंतर हजारे सावध झाले. गेल्या वेळी त्यांनी कोणत्याही टीम शिवाय आंदोलन केले होते. यावेळीही आंदोलनासाठी टीम अण्णा तयार करण्यात आलेली नाही.

वाचा: प्रदेशाध्यक्षपदावरून काँग्रेसमध्ये गटबाजी उफाळण्याची चिन्हे

मुळात आता हजारे यांनी उपोषण करूच नये, असे त्यांच्या अनेक समर्थकांना वाटते. उपोषणाऐवजी मौन व्रत करावे, अशा सूचनाही त्यांना करण्यात आल्या आहेत. मात्र, उपोषणाशिवाय सरकारवर दबाव येत नसल्याचे सांगत हजारे उपोषण करण्यावर ठाम आहेत. दोन वर्षांपूर्वी ३० जानेवारीलाच हजारे यांनी राज्यात लोकायुक्त आणि शेतकऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांवर यादवबाबा मंदिरात आंदोलन केले होते. त्यांना पाठिंबा देण्यासाठी ग्रामस्थांनीही एक दिवसाचे उपोषण, गावबंद, ठिकठिकाणी धरणे अशी आंदोलने केली होती. यावेळीही टीम अण्णा नसल्याने ग्रामस्थांकडूनच आंदोलन चालविले जाण्याची शक्यता आहे. अलीकडेच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत हजारे समर्थकांचीच गावात सत्ता आली आहे. त्यामुळे हजारे यांच्यासोबत पूर्वीप्रमाणे टीम नसली तरी ग्रामस्थ त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणार असल्याचे सांगण्यात आले.

वाचा: हे तर शरद पवारांचे स्वत:विरुद्ध आंदोलन; भाजपची बोचरी टीका
लेखकाबद्दल
विजयसिंह होलम
विजयसिंह होलम, ‘महाराष्ट्र टाइम्स’मध्ये विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. पत्रकारितेमधील २२ वर्षांचा अनुभव. राजकीय, सामाजिक, गुन्हेगारी विषयक आणि चालू घडामोडींच्या विषयांवर वेळोवेळी विश्लेषणात्मक लिखाण करतात. पत्रकारितेतील अनुभवांसंबंधी पुस्तकाचेही लेखन.... आणखी वाचा

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज