अ‍ॅपशहर

आता वाटतेय, शेवटपर्यंत मौन धारण करावे

'आंदोलने करूनही व्यवस्थेत आ‌वश्यक ते बदल होत नाहीत. त्यामुळे आता वाटतेय की कायमचेच मौन धारण करावे,' अशी उद्विग्नता ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी व्यक्त केली आहे.

महाराष्ट्र टाइम्स 3 Feb 2020, 6:06 am
अण्णा हजारे यांची उद्विग्नता
महाराष्ट्र टाइम्स.कॉम anna


म. टा. प्रतिनिधी, नगर

'आंदोलने करूनही व्यवस्थेत आ‌वश्यक ते बदल होत नाहीत. त्यामुळे आता वाटतेय की कायमचेच मौन धारण करावे,' अशी उद्विग्नता ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी व्यक्त केली आहे.

निर्भया प्रकरणातील दोषींना लवकर फाशी देण्यात यावी, या मागणीसाठी हजारे यांचे २० डिसेंबरपासून मौन सुरू आहे. या प्रकरणासंबंधी दिल्ली उच्च न्यायालयात रविवारी सुनावणी झाली. आरोपींच्या फाशीच्या अंमलबजावणीवर लावण्यात आलेली स्थगिती उठविण्यात यावी, अशी मागणी करणारी याचिका केंद्र सरकार व तिहार कारागृहाच्या वतीने करण्यात आली आहे. त्यावर सुनावणी झाल्यानंतर कोर्टाने आपला निर्णय राखून ठेवला. त्यामुळे फाशीची अंमलबजावणी तूर्त प्रलंबितच राहिली आहे.

फाशी लांबत असल्याने हजारे यांचे मौनही लांबत आहे. त्यामुळे त्यांच्या काही सहकाऱ्यांनी आणि ग्रामस्थांनी गावातील हरिनाम सप्ताहाच्या निमित्ताने मौन मागे घ्यावे, अशी विनंती हजारे यांना केली आहे. गावात सध्या अखंड हरिनाम सप्ताह आहे. गुरूवारी त्याची सांगता होत आहे. त्यावेळी हजारे यांनी आपले मौन मागे घ्यावे, अशी सूचना सहकाऱ्यांनी केली होती. याला हजारे यांनी तूर्त तरी नकार दिला आहे. लिखित संदेशातून त्यांनी आता मला वाटते शेवटपर्यंत मौन धारण करावे, असे म्हटले आहे. आंदोलनांतून निराशाच येत आहे. मात्र, फाशी होईल तेव्हा होईल. यानिमित्ताने जनजागृती झाली. लोकांचे या प्रश्नाकडे लक्ष वेधले गेले. लोक यावर बोलू लागले. हे मौन आंदोलनातून साध्य झाल्याकडे हजारे यांनी लक्ष वेधले. केवळ या मागणीसाठी म्हणून नव्हे तर एकूणच व्यवस्थेबदद्ल नाराजी व्यक्त करीत शेवटपर्यंत मौन धारण करण्याचा विचार हजारे यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे दिल्लीतील कोर्टाचा निकाल काय येतो, यावर सप्ताहाच्या निमित्ताने हजारे यांचे मौन मागे घेण्यासाठी ग्रामस्थांकडून पुन्हा अग्रह केला जाणार आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज