अ‍ॅपशहर

‘वन लिटर वंडर’ पद्धतीने जगवली झाडे

एखाद्या विशेष दिनाच्या निमित्ताने अथवा कार्यक्रमाच्या निमित्ताने वृक्षारोपण करण्यासाठी अनेकजण पुढाकार घेतात. परंतु वृक्षारोपण केल्यानंतर लावलेली सर्वच्या सर्व झाडे जगविण्याची अत्यंत महत्वपूर्ण जबाबदारी पार पाडत असताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते.

Maharashtra Times 21 Mar 2017, 3:00 am
म. टा. प्रतिनिधी, नगर
महाराष्ट्र टाइम्स.कॉम one liter wonder
‘वन लिटर वंडर’ पद्धतीने जगवली झाडे

एखाद्या विशेष दिनाच्या निमित्ताने अथवा कार्यक्रमाच्या निमित्ताने वृक्षारोपण करण्यासाठी अनेकजण पुढाकार घेतात. परंतु वृक्षारोपण केल्यानंतर लावलेली सर्वच्या सर्व झाडे जगविण्याची अत्यंत महत्वपूर्ण जबाबदारी पार पाडत असताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. मात्र, येथील सुप्रभात ग्रुपने ‘वन लिटर वंडर’पद्धतीचा उपयोग करून सावेडी जॉगिंग ट्रॅकवर लावण्यात आलेली चाळीस झाडे जगवली आहेत. दोन वर्षापूर्वी लावण्यात आलेली ही झाडे आता बारा ते पंधरा फुट वाढली असून सुप्रभात ग्रुपने राबवलेल्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
२१ मार्च हा दिवस ‘जागतिक वन दिन’ म्हणून साजरा केला जातो. या निमित्ताने वनांचा होणारा ऱ्हास, वृक्षारोपण, अशा विषयांबाबत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. वेगवेगळ्या संस्थांच्या, संघटनांच्या वतीने वृक्षारोपणाचे कार्यक्रम देखील आयोजित करण्यात येतात. परंतु ही लावलेली झाडे जगवण्याचे आव्हान सर्वांसमोरच असते. मात्र, येथील सुप्रभात ग्रुपने झाडे जगवण्यासाठी ‘वन लिटर वंडर’पद्धत शोधून काढली असून तिचा वापर करून त्यांनी सावेडी जॉगिंग ट्रॅकच्या परिसरात दोन वर्षापूर्वी लावलेली झाडे जगवली आहेत.
सरकारी अधिकारी, डॉक्टर, इंजिनीअर, वकील, अशा विविध क्षेत्रातील जवळपास शंभर व्यक्तींचा असणाऱ्या सुप्रभात ग्रुपने दोन वर्षापूर्वी ‘वन लिटर वंडर’हा उपक्रम सुरू केला. दररोज सकाळी जॉगिंग ट्रॅकवर फिरण्यासाठी येताना घरून एक लिटर पाणी बाटलीमध्ये घेऊन यायचे, व हे पाणी जॉगिंग ट्रॅकवर लावलेल्या रोपांच्या जवळ पुरलेल्या बाटलीमध्ये टाकून द्यायचे, अशा पद्धतीने जवळपास एक वर्ष ग्रुपमधील सदस्यांनी जॉगिंग ट्रॅकवर लावलेल्या झाडांना पाणी दिले. त्यानंतर मागील वर्षी या ग्रुपच्या सदस्यांनी स्वतःच्या खर्चातून जॉगिंग ट्रॅक परिसरात एक बोअरवेल घेऊन झाडांना पाणी देण्यासाठी स्वतंत्र पाइपलाइन केली. तसेच सर्व झाडांना पाणी वेळेच्या वेळी देता यावे, यासाठी एका कर्मचाऱ्याची नियुक्ती केली. याशिवाय दररोज सकाळी फिरायला आल्यानंतर सर्व झाडे व्यवस्थित आहेत का, पाणी व्यवस्थित दिले आहे का, झाडांची वाढ वेगाने होण्यासाठी त्याची छाटणी करण्याची गरज आहे का, याचीही पाहणी ग्रुपमधील सदस्य करतात. प्रयोगशील प्रात्यक्षिक वन अधिकारी सुरेश दौंड यांच्या मार्गदर्शनात झाडे जगवण्यासाठी सुरु झालेला हा उपक्रम यशस्वीतेसाठी ग्रुपचे जीवन खरात, खजिनदार मुंडके, अध्यक्ष रमेश पलसे, शैलेश राजगुरू, विष्णु तवले, विजय कुल्लाल, साहित्यिक दत्ता नजन, उद्योजक के. के. शेट्टी, प्रकाश बोरूडे, बाळासाहेब बोराटे, गिरिश चिट्टा, विठ्ठल लांडगे, कैलास मडके, सुनील राऊत यांच्यासह इतर सदस्य प्रयत्न करतात.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज