अ‍ॅपशहर

माझा अभिमन्यू करण्याचा प्रयत्न

‘भगवानगडाने मला कन्या मानले आहे. अनेक वर्षे गडावर येत आहे, मात्र यावर्षी गडावर येण्यास खूपच त्रास झाला. पुढील वर्षीच्या दसरा मेळाव्याला जे गडाचे महंत असतील ते मला गडावर सन्मानाने बोलवितील, असा विश्वास वाटतो,’ असे प्रतिपादन ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी भगवानगडाच्या पायथ्याशी झालेल्या दसरा मेळाव्यात व्यक्त केला. महंत नामदेव शास्त्री यांच्याशी सुरू असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर त्यांचे हे विधान वेगळे संकेत देणारे मानले जात आहे. महाभारतातल्या अभिमन्यूप्रमाणे मला घेरण्याचा प्रयत्न करण्यात आला. असा आरोपही त्यांनी केला.

Maharashtra Times 12 Oct 2016, 2:56 am
भगवानगडावरील दसरा मेळाव्यात पंकजा मुंडे यांचा आरोप
महाराष्ट्र टाइम्स.कॉम pankaja munde at bhagwangad rally
माझा अभिमन्यू करण्याचा प्रयत्न


म. टा. वृत्तसेवा, पाथर्डी

‘भगवानगडाने मला कन्या मानले आहे. अनेक वर्षे गडावर येत आहे, मात्र यावर्षी गडावर येण्यास खूपच त्रास झाला. पुढील वर्षीच्या दसरा मेळाव्याला जे गडाचे महंत असतील ते मला गडावर सन्मानाने बोलवितील, असा विश्वास वाटतो,’ असे प्रतिपादन ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी भगवानगडाच्या पायथ्याशी झालेल्या दसरा मेळाव्यात व्यक्त केला. महंत नामदेव शास्त्री यांच्याशी सुरू असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर त्यांचे हे विधान वेगळे संकेत देणारे मानले जात आहे. महाभारतातल्या अभिमन्यूप्रमाणे मला घेरण्याचा प्रयत्न करण्यात आला. असा आरोपही त्यांनी केला.

भगवानगडावर दसरा मेळावा घेण्यासाठी परवानगी नाकारल्याने या वर्षी हा मेळावा गडाच्या पायथ्याशी घेण्यात आला. तेथे त्या बोलत होत्या. नगरचे पालकमंत्री राम शिंदे, दुग्धविकासमंत्री महादेव जानकर, सदाभाऊ खोत, खासदार राजू शेट्टी, खासदार प्रीतम मुंडे, आमदार मोनिका राजळे, शिवाजी कर्डिले, भीमराव धोंडे, बाळासाहेब मुरकुटे आदी उपस्थित होते. या वेळी उपस्थित सर्वच वक्त्यांनी गडाचे महंत नामदेवशास्त्री व विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे तसेच अजित पवार यांच्यावर कडाडून टीका केली.

‘मागील मेळाव्यात आपण जानकर, खोत यांना लाल दिवा मिळणार, असे सांगितले होते. माझ्यामुळेच माझ्या भावांना लालदिवा मिळतो, असे सिद्ध झाले आहे,’ असे म्हणत त्यांनी धनंजय मुंडेंचा नामोल्लेख टाळत चिमटा काढला. ‘गडावर या वेळी मेळावा का नाही याचे उत्तर मी देऊ शकत नाही; मात्र, हिरकणी आपल्या मुलासाठी गड उतरून आली, तशी परीक्षा सध्या मी देत आहे. गडाचा अहंकार खाली उतरावा म्हणून मी गडाच्या पायथ्याला सभा घेत आहे. मी मंत्री असून चुकीचे मी काही करणार नाही; मात्र, गडावर सभा घेतली तर कायदा सुव्यवस्था ढासळते; मात्र, गडाच्या खाली पाचशे मीटरवर सभा घेतली तर कायदा सुव्यवस्था अबाधित राहते, हे कोडे आपल्याला उमगले नाही. मी दहशतवादी नाही, पण सभेला परवानगी नाकारल्याने मला मी दहशतवादी असल्यासारखे वाटायला लागले आहे. महाभारतातल्या अभिमन्यूसारखे सर्वांनी आपल्याला घेरलेले असून कोणतेही कारण काढून राजीनामा मागितला जातो. पण माझा राजीनामा लिहून तयार असून तो मी हेलिकॉप्टरमध्ये ठेवलेला आहे. मी जर काही चुकीचे केले तर मी राजकारणात राहणार नाही. भगवानगडाने आपल्याला मुलगी मानले असून मुलगी बापाचा कधीही अवमान करत नाही. शेवटच्या श्वासापर्यंत मी गडाचा अवमान करणार नाही. हा गड ऊसतोड मजुरांच्या घामातून उभा राहीला आहे. त्यांच्या हातातील कोयता काढून त्यांच्या मुलांच्या हातात पुस्तके द्यायची आहेत. उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मुंडे प्रतिष्ठानकडून २१ हजार रुपयांचा धनादेश दिला जाईल.’ येथून पुढील काळात हुंडा घ्यायचा नाही व स्त्रीभ्रूण-हत्या करायची नाही, अशी शपथ या वेळी त्यांनी सर्वांकडून वदवून घेतली.

महादेव जानकर, राजू शेट्टी, राम शिंदे व सदाभाऊ खोत यांचीही यावेळी भाषणे झाली. गोपीनाथ मुंडे यांनी दिलेल्या ताकदीमुळेच आम्हाला पदे मिळाली असून शेवटपर्यंत आम्ही मुंडेंना साथ देऊ, असे जाहीर केले. जानकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांनी अजित पवार व धनंजय मुंडेंचे यांचे ऐकूण निर्णय घेतले असून त्यांची १२ तासांत बदली करावी, अशी मागणी केली. धनंजय मुंडे यांना बारामतीचा चमचा म्हणत पवारांवरही नाव न घेता टीका केली.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज