नगर : नगर येथील कार्यक्रम संपल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना घेऊन जाणारे हेलिकॉप्टर उड्डाण घेऊन निघून गेले होते. मात्र, पवार बसलेल्या सीटच्या बेल्टचा काही भाग दरवाजामध्ये अडकून बाहेरच राहिल्याचे लक्षात आले. त्यामुळे काही मिनिटातच पुन्हा हेलिकॉप्टर हेलिपॅडवर उतरविण्यात आले. दरवाजा व्यवस्थित लावल्यानंतर हेलिकॉप्टरचे पुन्हा उड्डाण झाले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे रविवारी अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या शताब्दी महोत्सव व शिक्षक विकास मंडळाच्या इमारतीच्या भूमिपूजनासाठी आले होते. त्यासाठी रेसिडेन्सिअल मैदानावर हेलिपॅड तयार करण्यात आले आले होते. शिक्षक विकास मंडळाच्या कार्यक्रमानंतर पवार यांच्या हेलिकॉप्टरने ३ वाजून ४४ मिनिटांनी उड्डाण केल्यानंतर हेलिकॉप्टर पुण्याकडे निघून गेले. बंदोबस्ताला असलेले पोलिस रेसिडेन्सिअलच्या मैदानावरच होते. त्यानंतर मात्र दहा मिनिटाने पुन्हा हेलिकॉप्टर हेलिपॅडकडे येत असल्याचा आवाज आला. हेलिकॉप्टर का पुन्हा परत आले, याबाबत अनेकांना शंका आली. बंदोबस्ताला असलेल्या पोलिसांची धावपळ उडाली. तर मैदानावर खेळण्यासाठी आलेल्या मुलांची पळापळ झाली. हेलिपॅडवर हेलिकॉप्टर उतरल्यानंतर दरवाजामधून पवार यांचे सीटबेल्ट काढून घेऊन हेलिकॉप्टरचे पुन्हा उड्डाण झाल्याची माहिती पोलिस उपअधीक्षक संदीप मिटके यांनी दिली.