अ‍ॅपशहर

खड्डे दुरुस्ती अडकली प्रक्रियेत

महापालिकेची खड्डे दुरुस्ती मोहीम प्रशासकीय प्रक्रियेत अडकली आहे. या दुरुस्तीसाठी आता चौथ्यांदा निविदा काढण्यात आली असल्याने आता पाच दिवसांनी तिला मिळणारा प्रतिसाद स्पष्ट होणार आहे.

Maharashtra Times 27 Jul 2016, 12:15 am
म. टा. प्रतिनिधी, नगर
महाराष्ट्र टाइम्स.कॉम pits stuck in the process of repair
खड्डे दुरुस्ती अडकली प्रक्रियेत


महापालिकेची खड्डे दुरुस्ती मोहीम प्रशासकीय प्रक्रियेत अडकली आहे. या दुरुस्तीसाठी आता चौथ्यांदा निविदा काढण्यात आली असल्याने आता पाच दिवसांनी तिला मिळणारा प्रतिसाद स्पष्ट होणार आहे. त्यानंतरच प्रत्यक्ष दुरुस्तीच्या कामाला मुहूर्त लागण्याची चिन्हे आहेत. खड्डे दुरूस्तीवरून नागरिक विचारत असलेल्या प्रश्नांना उत्तरे देऊन प्रशासनही वैतागुले आहे. दरम्यान, लोकांचा सयंम सुटत चालला असून खड्डे दुरुस्तीच्या मागणीसाठी बुरुडगाव कचरा डेपोकडे जाणारी वाहने परिसरातील नागरिकांनी अडवून रस्ता रोको केला

शहरातील केवळ ८ रस्ते चांगले आहेत. त्यामुळे ते तसेच मूलभूत विकास निधीच्या ४० कोटीच्या रकमेतून होणारे रस्ते वगळता अन्य रस्त्यांवरील खड्डे दुरुस्तीसाठी सुमारे ७० लाखाची वार्षिक निविदा काढण्याची प्रक्रिया सुरू आहे. सुरुवातीच्या दोन निविदांना प्रतिसाद आला नाही. तिसऱ्यावेळी एका नेहमीच्या ठेकेदाराने सहभाग घेताना तब्बल २१ टक्के जादा दराने काम करण्याची तयारी दाखवली. त्याच्याशी चर्चा केल्यानंतर सुमारे १२ टक्के वाढीव दराने काम करण्यास त्याने तयारी दर्शवली. पण मनपा आयुक्तांनी मनपाची कोणतीही विकास कामे एस्टीमेट दरानेच करण्याचे बंधन घातले असल्याने जादा दर देण्यास मनपा प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नकार दिला. त्यामुळे आता चौथ्यांदा ही निविदा प्रसिद्ध करण्यात आली आहे. आणखी पाच दिवसांनी या निविदेला प्रतिसाद मिळाला की नाही, हे स्पष्ट होणार असल्याने तोपर्यंत तरी प्रशासन हातावर हात ठेवून निवांत राहणार आहे व सामान्य नगरकर मात्र ऐन पावसात खड्ड्यांतून जा-ये करीत मनपाच्या नावाने लाखोली वाहणार आहे.

अधिकारी वैतागले

नगर शहरातील बहुतांश रस्त्यांवर मागील महिना-दीड महिन्यांपासून खड्डे झाले आहेत. सध्या सुरू असलेल्या पावसाने या खड्ड्यांचे अस्तित्व अधिक भयावह झाले आहे. पावसाच्या पाण्याने भरलेल्या या खड्ड्यांच्या खोलीचा अंदाज येत नसल्याने छोटी-मोठी वाहने आदळण्याचे व त्याचे नुकसान होण्याचे प्रकार वाढले आहेत. याशिवाय वाहनचालकांनाही पाठदुखीसह अन्य त्रास सुरू झाले आहेत. अशा स्थितीत प्रसिद्धी माध्यमांसह सामान्य नागरिकांकडूनही खड्डे दुरुस्ती तातडीने सुरू करण्याची मागणी मनपाकडे होत आहे. पण त्याला मुहूर्त मात्र अजून लागलेला नाही. भेटणाऱ्या नागरिकांकडून होणारी केवळ खड्डे दुरुस्तीची मागणी व त्याबरोबर मनपा यंत्रणेकडून सुरू असलेली कागदोपत्री चालढकल यामुळे मनपाचे वरिष्ठ प्रशासकीय

अधिकारीही काहीसे वैतागले आहेत. ‘कसेही करा, पण आधी शहरातील खड्डे दुरुस्ती हाती घ्या’, अशी चक्क विनंती मनपा यंत्रणेतील कनिष्ठ अधिकाऱ्यांना करण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. शहरातील विविध संस्थांच्या सांस्कृतिक व सामाजिक कार्यक्रमांमध्ये मनपाचे कनिष्ठ व वरिष्ठ अधिकारी सहभागी होतात. अशावेळी तेथे भेटणारे सामान्य नगरकर ‘खड्डे दुरुस्ती कधी करणार’, असे विचारून त्यांना भांडावून सोडू लागल्याने वरिष्ठ अधिकारीही चक्क वैतागले आहेत. त्यामुळे मनपा यंत्रणेने तातडीने खड्डे दुरुस्तीचे काम सुरू करण्याचा आग्रह आता सामान्य नगरकरांप्रमाणे त्यांचाही सुरू झाला आहे. मात्र, समोर येणाऱ्या प्रशासकीय अडचणींमुळे काहीशी हतबलता व निराशाही त्यांच्या पदरी येऊ लागली आहे.

राजकीय दुर्लक्ष चिंतेचे

नगरच्या नव्या महापौर सुरेखा कदम या पदावर विराजमान होऊन सुमारे १५ दिवस झाले आहेत. २१ जूनला बिनविरोध निवड झाल्यानंतरच शहरातील खड्डे दुरुस्तीला प्राधान्य देण्याचे सुतोवाच त्यांनी केले होते. पण या ग्वाहीला आता महिना झाला तरी प्रत्यक्षात मुहूर्त लागलेला नाही. महापौरपदी निवड झाल्याने विविध संस्था व संघटनांच्या सत्कार समारंभात नवे पदाधिकारी मग्न असले तरी सामान्य नगरकर मात्र खड्डेयुक्त रस्त्यांतून वाट शोधण्यातून वैतागला आहे. मनपातील विरोधी राष्ट्रवादी व अन्य पक्षही काहीसे सुस्त असल्याचे चित्र आहे. रस्त्यांतील खड्ड्यांबद्दल अजूनही त्यांच्याकडून सत्ताधाऱ्यांना धारेवर धरण्यासाठी पुढाकार घेतला गेलेला नाही.

बुरुडगाववासीयांनी कचरा गाड्या अडवल्या

मनपाच्या बुरुडगाव रोडवरील कचरा डेपोकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था तातडीने दूर करण्याच्या मागणीसाठी परिसरातील महिला व नागरिकांनी मंगळवारी रस्ता रोको आंदोलन केले. मनपाच्या कचरा वाहतुकीच्या गाड्याच रोखून धरल्या. या रस्त्यातील खड्ड्यांची तातडीने दुरुस्ती करण्याची ग्वाही दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

बुरुडगावपासून तेथील कचरा डेपोपर्यंत जाणाऱ्या रस्त्याची दयनीय अवस्था झाल्याचे परिसरातील नागरिकांचे म्हणणे आहे. या रस्त्यावरून मनपाच्या कचरा गाड्यांची तसेच अन्य जड वाहनांची वाहतूक नियमितपणे सुरू असल्याने रस्त्याची दुरवस्था वाढली आहे. या रस्त्याने बुरुडगाव व परिसरातील मुले-मुली शाळेत जा-ये करीत असल्याने खड्डेयुक्त रस्त्यामुळे होणारा त्रास टाळण्यासाठी शाळेला दांडी मारण्याचे त्यांचे प्रमाण वाढल्याने पालकही वैतागले आहेत. त्यामुळेच माजी सरपंच बापूसाहेब कुलट यांच्यासह संदीप पाचारणे, संकेत कुलट, कांचन मोढवे, अंजना मोढवे, सुभाष कुलट, उज्ज्वला पाचारणे, देऊबाई पाचारणे, सुमन पाचारणे, तारा मोढवे, कमल कुलट, मंगल तांबे, मनीषा कुलट, राजश्री पाचारणे, दत्तात्रय शिंदे, रावसाहेब मोढवे, शकुंतला पाचारणे आदींसह अन्य नागरिकांनी रस्ता रोको आंदोलन केले. मनपाचे आरोग्याधिकारी पैठणकर व वाघ यांनी तातडीने या रस्त्याच्या दुरुस्तीची ग्वाही दिल्याने आंदोलन मागे घेण्यात आले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज