अ‍ॅपशहर

चिमुरडीच्या तक्रारीची मोदींकडून दखल

​ जिल्ह्यातील अनेक गावांत शाळेची वाट बिकट आहे. अनुचित घटना घडली की या विषयावर चर्चा होते. आंदोलने होतात. प्रत्यक्षात मात्र काहीच होत नाही. हा अनुभव लक्षात घेता वडाळा महादेव येथील एका विद्यार्थिनीने शाळेच्या रस्त्याची तक्रार थेट पंतप्रधानांकडे केली.

संदीप कुलकर्णी | Maharashtra Times 1 Aug 2017, 3:00 am
नगर ः जिल्ह्यातील अनेक गावांत शाळेची वाट बिकट आहे. काही अनुचित घटना घडली की या विषयावर चर्चा होते. आंदोलने होतात. प्रत्यक्षात मात्र काहीच होत नाही. हा अनुभव लक्षात घेता वडाळा महादेव येथील एका विद्यार्थिंनीने आपल्या शाळेच्या रस्त्याची तक्रार थेट पंतप्रधानांकडे केली. पंतप्रधान कार्यालयाने त्याची दखल घेऊन संबंधित अधिकाऱ्यांना सूचना केल्या आहेत. आता तरी तिच्या शाळेची वाट सुकर होण्याची अपेक्षा आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम pmo office take record
चिमुरडीच्या तक्रारीची मोदींकडून दखल


श्रीरामपूर येथून अंदाजे पाच किलोमीटरवर वडाळा महादेव गाव आहे. तर तेथून साधारणपण चार किलोमीटर अंतरावर मुठे वडगाव असून वडाळा ते मुठे वडगाव रस्त्यावर असणाऱ्या वस्तीवरील बहुतांश विद्यार्थिंनी दररोज सायकलने श्रीरामपूर येथे शिक्षणासाठी जातात. हा रस्ता खराब असल्यामुळे इतर वाहनांची रहदारी कमी असल्याने विद्यार्थिंनिंना सायकलवर जाण्याची वेळ आली आहे. पावसाळ्यात तर रस्त्यावरून सायकल चालवताना सुद्धा विद्यार्थिंनिंना अनेक समस्यांचा सामना करावा लागत असून छोटछोटे अपघात देखील येथे होत असतात. रस्त्याची समस्या सोडवण्याबाबत स्थानिक प्रशासन दखल घेत नसल्याने अखेर येथील अंकिता प्रवीण कुलकर्णी या दहावीच्या विद्यार्थिंनीने थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवले. ‘ग्रामीण भागातील मुली शिकल्या पाहिजेत, पण त्यासाठी त्यांना पूरक वातावरण कोण देणार,’ असा प्रश्न उपस्थित करीत अंकिताने खराब रस्त्याची समस्या सोडवण्याची विनंती पंतप्रधानांना केली होती. तिने पाठवलेल्या पत्रावर गावातील इतर दहा मुलींनी सुद्धा स्वाक्षरी केली होती. अखेर पंतप्रधान कार्यालयाने या पत्राची दखल घेऊन संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. त्याबाबतची माहिती अंकिताला सुद्धा देण्यात आली असून आता तरी तिच्या शाळेची वाट सुकर होण्याची आशा निर्माण झाली आहे.

यासंबंधी अंकिताचे वडिल प्रवीण कुलकर्णी यांनी ‘मटा’शी बोलताना सांगितले की, ‘श्रीरामपूर येथे जाण्यासाठी वस्तीपासून चार किलोमीटर अंतरावर एसटी आहे. शाळेची वेळ व एसटीची वेळ यांचा मेळ बसत नसल्यामुळे आमच्या भागातील अनेक विद्यार्थिंनी सायकलने शाळेत जात असून रोज त्यांना खराब रस्त्याचा सामना करावा लागतो. त्याबाबत मुलीने केलेल्या तक्रारीची पंतप्रधान कार्यालयाने दखल घेतली. परंतु अद्यापपर्यंत रस्ता दुरुस्तीच्या कामाबाबत कोणीही संपर्क केला नाही. '

कोट ः

रस्ता खराब असल्यामुळे दररोज सायकलवर श्रीरामपूर येथे शाळेला जाण्यासाठी पाऊणतास लागतो. आपण केलेल्या तक्रारीची पंतप्रधान दखल घेतात, याबाबत ऐकले होते. त्यामुळे गावातील खराब रस्त्याची तक्रार केली. त्यासाठी माझ्या मैत्रिणींनी सुद्धा साथ दिली. आता तरी आमच्या गावाचा रस्ता लवकर दुरुस्त होण्याची शक्यता वाटते.

-अंकिता कुलकर्णी, विद्यार्थिनी.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज