अ‍ॅपशहर

स्वच्छतागृहांची दुरुस्ती

नगर शहरातील तिन्ही बसस्थानकातील स्वच्छतागृहांच्या देखभाल दुरुस्तीचे काम अखेर सुरू झाले आहे. पहिल्या टप्प्यात माळीवाडा बसस्थानकातील महिलांच्या स्वच्छतागृहात कमोड बसवले आहे व बाहेरच्या बाजूस डिस्पोजल युनिट ठेवले गेले आहे.

Maharashtra Times 10 Nov 2017, 3:00 am
म. टा. प्रतिनिधी, नगर
महाराष्ट्र टाइम्स.कॉम public toilets at bus stands repairing work starts
स्वच्छतागृहांची दुरुस्ती


नगर शहरातील तिन्ही बसस्थानकातील स्वच्छतागृहांच्या देखभाल दुरुस्तीचे काम अखेर सुरू झाले आहे. पहिल्या टप्प्यात माळीवाडा बसस्थानकातील महिलांच्या स्वच्छतागृहात कमोड बसवले आहे व बाहेरच्या बाजूस डिस्पोजल युनिट ठेवले गेले आहे. तसेच ‘महिला व बारा वर्षांच्या आतील लहान मुलांसाठी मोफत सुविधा’ असा मोठा बोर्ड दर्शनी भागात लावला आहे.

‘महाराष्ट्र टाइम्स’च्या २८ ऑक्टोबरच्या अंकात प्रसिद्ध झालेल्या 'बसस्थानकांवर अवघड स्थिती' या बातमीनंतर या कामास सुरुवात झाली आहे. प्रहार अपंग क्रांती संघटनेनेही याकामी पाठपुरावा केला होता. दरम्यान, तारकपूर व स्वस्तिक बसस्थानकांतील अशी सुविधांची कामेही येत्या दोन दिवसांत सुरू होत आहेत.

शहराच्या मध्यवर्ती भागात असणाऱ्या माळीवाडा बसस्थानकातून ग्रामीण भागात बस सुटतात. या बसस्थानकात प्रवाशांसाठी सुविधा नाहीत. महिलांसाठी प्रसाधनगृहाचा वापर मोफत असल्याचे फलक असले तरी ते सहजासहजी दिसत नाही. बारा वर्षांच्या आतील मुलांसाठी येथे व्यवस्था नाही. अपंग महिला प्रवाशांना पायऱ्या चढून जावे लागते. प्रसाधनगृहात कमोड नाहीत. तर तारकपूर बसस्थानकात मात्र या सुविधांसाठी महिलांकडून पैसे घेतले जातात. शहराप्रमाणेच जिल्ह्यातील बसस्थानकांतील स्वच्छतागृहांचीही अशीच दयनीय स्थिती असल्याचे वृत्त ‘मटा’मध्ये प्रसिद्ध करण्यात आले होते. त्यानंतर या बातमीची दखल घेत प्रहार अपंग क्रांती संघटनेने या परिस्थितीत सुधारणा करण्याची मागणी महामंडळाच्या अध्यक्षांना केली. तसेच या कामात कुचराई करणाऱ्या ठेकेदार संस्थेचा ठेका रद्द करण्याचीही मागणी केली होती. त्यानंतर महामंडळाची यंत्रणा हलली. स्वच्छतगृहांच्या देखभाल दुरुस्तीची जबाबदारी असलेल्या ठेकेदार संस्थेकडून कामास सुरुवात झाली आहे. माळीवाडा बसस्थानकातील स्वच्छतागृहात अपंग प्रवाशांसाठी कमोड बसवले आहेत तसेच पाइपही बदलले आहेत. तसेच खराब झालेले पाण्याचे नळही बदलले आहेत. स्वच्छतागृहाच्या बाहेर प्रवाशांना दिसेल अशा ठिकाणी ‘महिला व मुलांसाठी मोफत’ असे मोठे फलक लावले आहेत. माळीवाड्याप्रमाणेच तारकपूर व स्वस्तिक बसस्थानकातील स्वच्छतागृहांचीही दुरुस्ती होणार असल्याची माहिती एसटीच्या कार्यालयातून देण्यात आल्याचे संघटनेचे शहराध्यक्ष बाबासाहेब महापुरे यांनी सांगितले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज