अ‍ॅपशहर

पुणतांब्यातील शेतकरी आंदोलन, पहिला पाठिंबा भाजपचा; खासदार म्हणाले...

पुणतांब्यात शेतकऱ्यांनी विविध समस्यांवरून धरणे आंदोलनाचा इशारा दिला आहे. शेतकऱ्यांच्या या आंदोलनाने संपूर्ण राज्याचे लक्ष वेधले आहे. आता या आंदोलनाला भाजपने जाहीर पाठिंबा दिला आहे. भाजपचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी याबाबत भूमिका स्पष्ट केली.

Authored byविजयसिंह होलम | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 25 May 2022, 11:24 am
अहमदनगर : शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर आंदोलन पुकरालेल्या पुणतांबा ग्रामस्थांना पहिला पाठिंबा भारतीय जनता पक्षाकडून मिळाला आहे. नगरचे भाजपचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी या आंदोलनाला भाजपचा पाठिंबा राहणार असल्याचे सांगितले. गेल्यावेळी भाजपची सत्ता असताना शेतकरी आंदोलन झाले होते. त्यावेळी काँग्रेसमध्ये असलेल्या विखे पाटील यांनी आंदोलनाला सक्रीय पाठिंबा दिला होता.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम puntamba farmers protest bjp supports says mp sujay vikhe patil
पुणतांब्यातील शेतकरी आंदोलन, पहिला पाठिंबा भाजपचा


पुणतांबा ग्रामपंचायतीने शेतकऱ्यांच्या मागण्यांसंबंधी १४ ठराव करून प्रशासनामार्फत सरकारकडे पाठविले आहेत. या मागण्यांवर सकारत्मक निर्णय झाला नाही, तर १ जूनपासून धरणे आंदोलन सुरू करण्याचा इशारा दिला आहे. या आंदोलनाला राजकीय पक्ष पाठिंबा देऊ शकतात, मात्र त्यांनी राजकीय जोडे बाहेर ठेवून यावे, असे आवाहन पुणतांब्याचे सरपंच डॉ. धनंजय धनवटे यांनी केले आहे.

त्यानंतर भाजपकडून पहिला पाठिंबा जाहीर करण्यात आला आहे. यासंबंधी खासदार डॉ. विखे पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला. 'एक जूनपासून पुणतांबा येथून शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू होणार आहे. या आंदोलनाला भाजपचा पाठिंबा राहणार आहे. २०१७ मध्ये पुणतांबा येथून सुरू झालेल्या पहिल्या शेतकरी संपाच्यावेळी आम्ही काँग्रेसमध्ये होतो. भाजप-शिवसेनेकडे सत्ता होती. आता आम्ही भाजपमध्ये आहोत. राज्यातील महाविकास आघाडीच्या सरकारकडून शेतकऱ्यांना अपेक्षा राहिलेली नाही. त्यामुळे वीज, पाणी या प्रश्नावर आम्ही संघर्ष करत आहोत. राज्यात मोठ्या प्रमाणात ऊसाची तोडणी झालेली नाही. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकरी चिंतेत आहेत', असे खासदार विखे पाटील म्हणाले.

मोठी बातमी : पुणतांबा ग्रामसभेत १६ ठराव मंजूर; आंदोलनाची घोषणा करत सरकारला अल्टिमेटम

शेतकऱ्यांच्या इतरही प्रलंबित मागण्यांसाठी पुणतांबे येथील शेतकऱ्यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. मागील दोन महिन्यांत राज्यात अनेक विषयांवर चर्चा सुरू होती. यात शेतकऱ्यांचा साधा उल्लेखही नव्हता. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आम्ही भाजपतर्फे आंदोलने सुरू केली आहेत. मुळात शेतकरी आंदोलन हा कोणत्याही पक्षाचा विषय नाही. त्याकडे राजकीय दृष्टीने पाहणेही योग्य नाही. याच भूमिकेतून आम्ही पुणतांब्यातून सुरू होणाऱ्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देत आहोत', असेही विखे पाटील म्हणाले.

इंदोरीकर महाराजांचे ३० मेपर्यंत सर्व कार्यक्रम रद्द, गैरसोयीबद्दल दिलगीरी मागत काढलं पत्रक
लेखकाबद्दल
विजयसिंह होलम
विजयसिंह होलम, ‘महाराष्ट्र टाइम्स’मध्ये विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. पत्रकारितेमधील २२ वर्षांचा अनुभव. राजकीय, सामाजिक, गुन्हेगारी विषयक आणि चालू घडामोडींच्या विषयांवर वेळोवेळी विश्लेषणात्मक लिखाण करतात. पत्रकारितेतील अनुभवांसंबंधी पुस्तकाचेही लेखन.... आणखी वाचा

महत्वाचे लेख