अ‍ॅपशहर

झेडपीच्या कामांची गुणवत्ता नियंत्रक करणार तपासणी

जिल्हा परिषदेमार्फत जिल्ह्यात होणाऱ्या रस्ते, पूल बांधकामासह अन्य कामांची तपासणी राज्य सरकारच्या गुणवत्ता नियंत्रकांकडून करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Maharashtra Times 13 Mar 2018, 12:14 pm
म. टा. प्रतिनिधी, नगर
महाराष्ट्र टाइम्स.कॉम quality control of zps work is examined
झेडपीच्या कामांची गुणवत्ता नियंत्रक करणार तपासणी


जिल्हा परिषदेमार्फत जिल्ह्यात होणाऱ्या रस्ते, पूल बांधकामासह अन्य कामांची तपासणी राज्य सरकारच्या गुणवत्ता नियंत्रकांकडून करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्य गुणवत्ता समन्वयक यांच्या पॅनलवर असलेल्या गुणवत्ता नियंत्रकांची नियुक्ती करण्याचे आदेश जिल्हा परिषदेच्या सीईओंनी दिले आहेत. चौदा तालुक्यांसाठी चौदा नियंत्रक नियुक्त केले असून या नियंत्रकांकडून कामांची तपासणी होऊन कामांचा दर्जाही निश्चित केला जाणार आहे.

जिल्हा परिषद, ग्रामपंचायत यंत्रणांकडून जिल्ह्यात विकासकामे केली जात आहे. या कामांसाठी राज्य सरकार व जिल्हा परिषदेकडून कोट्यवधींचा निधी दिला जातो. बऱ्याचदा कामे निकृष्ट असल्याच्या तक्रारी केल्या जातात. काही वेळेस कामे अपूर्ण असतानाच ठेकेदारास बिले दिल्याचेही आरोप होतात. यातून पुढे या कामांच्या दर्जाबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत. या कामांच्या निकृष्टतेबाबत जिल्हा परिषदेत आंदोलने होत असतात. जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा, विषय समित्यांच्या सभांतही कामांच्या गुणवत्तेचा मुद्दा चर्चेला येत असतो. या पार्श्वभुमीवर जिल्ह्यातील कामांची तपासणी थेट राज्य गुणवत्ता नियंत्रकांकडून करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जिल्ह्यातील चौदा तालुक्यांसाठी चौदा नियंत्रक अधिकाऱ्यांची नियुक्ती केली असून त्यांनी कशा पद्धतीने कामांची तपासणी करणे अपेक्षित आहे, याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत.

कामांचा दर्जा होणार निश्चित

जिल्ह्यातील कामांची तपासणी करताना कामांचे ए, बी, सी या प्रमाणे वर्गीकरण केले जाणार आहे. ए गटात येणारी कामे उत्कृष्ट ठरणार आहेत. बी गटात येणाऱ्या कामांत सुधारणा करावी लागणार आहे. या प्रकारच्या कामात काय सुधारणा करणे अपेक्षित आहे, याची माहिती नियंत्रक देणार आहे. त्यानुसार कार्यवाही झाल्यानंतरच कामांचे पेमेंट दिले जाणार आहे. त्यानंतर सी गटातील कामे असमाधानकारक ठरणार असून या कामांचे पेमेंट दिले जाणार नाही. तसेच ज्या कामांच्या निवीदा पंधरा टक्केपेक्षा कमी दराने मंजूर केल्या आहेत अशा कामांची दोन वेळेस तांत्रिक तपासणी करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज