अ‍ॅपशहर

देशपांडे रुग्णालयाचे पुनरुज्जीवन

महापालिकेच्या बाळासाहेब देशपांडे प्रसूतीगृहाची सध्याची इमारत पाडून तेथे नवे अद्ययावत रुग्णालय उभारणीचा प्रकल्प मार्गी लागण्याची चिन्हे आहेत.

Maharashtra Times 11 Dec 2017, 3:00 am
म. टा. प्रतिनिधी, नगर
महाराष्ट्र टाइम्स.कॉम redevelopment of deshpande hospital
देशपांडे रुग्णालयाचे पुनरुज्जीवन

महापालिकेच्या बाळासाहेब देशपांडे प्रसूतीगृहाची सध्याची इमारत पाडून तेथे नवे अद्ययावत रुग्णालय उभारणीचा प्रकल्प मार्गी लागण्याची चिन्हे आहेत. पाच कोटी रुपये खर्चून या इमारतीचे नूतनीकरण करण्यात येणार आहे. यासाठीचा प्रस्ताव राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत महापालिकेने राज्य सरकारला पाठवला आहे. या प्रस्तावाच्या अनुषंगाने राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या पायाभूत विकास कामे विभागाचे नाशिकचे कार्यकारी अभियंता आर. एस. सोनवणे यांनी नुकतीच या रुग्णालयास भेट देऊन पाहणी केली व मनपाने पाठवलेला नूतनीकरणाचा प्रस्ताव आवश्यक शिफारशींसह राज्य व पुढे केंद्र सरकारकडे पाठवण्याची ग्वाही दिली. त्यामुळे येत्या दोन-तीन महिन्यात रुग्णालयाच्या नूतनीकरणाचे काम सुरू होण्याची शक्यता आहे.

जुन्या पिढीतील नामवंत वकील बळवंत बाबाजी ऊर्फ बाळासाहेब देशपांडे यांनी त्यांची जागा देशपांडे प्रसुतिगृह करण्यासाठी तत्कालीन नगरपालिकेला १९५९ मध्ये दान केली आहे. येथे त्यांच्याच नावाने (कै.) बाळासाहेब देशपांडे प्रसुतिगृह उभारण्यात आले आहे. सुमारे ५८ वर्षांपूर्वीची ही वास्तू आता धोकादायक झाली असून, तसे स्ट्रक्चरल ऑडिटद्वारेही स्पष्ट झाले आहे. त्यामुळे ही वास्तू पाडून तेथे नवी उभारली जाणार आहे. महापालिकेने या नूतनीकरणासाठी १० कोटी ३२ लाखांचा प्रस्ताव सरकारकडे पाठवला होता. त्यातील निम्मेच पैसे सरकार देणार होते. पण राज्य सरकारने तो नाकारला व राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत केंद्राकडे स्वतंत्र प्रस्ताव करण्याचे सुचवले. त्यानुसार आता सुमारे ५ कोटी रुपये खर्चाचा नवा प्रकल्प आराखडा तयार करून तो राज्य सरकारकडे पाठवण्यात आला आहे. या आराखड्यानुसार राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या पायाभूत विकास कामे विभागाचे नाशिकचे कार्यकारी अभियंता आर. एस. सोनवणे यांनी नुकतीच देशपांडे रुग्णालयास भेट देऊन या इमारतीची पाहणी केली. यावेळी महापौर सुरेखा कदम, मनपाचे आरोग्याधिकारी डॉ. अनिल बोरगे, शहर अभियंता विलास सोनटक्के, आर्किटेक्ट मनोज जाधव, जी. व्ही. काळे, निंबाळकर आदींसह अन्य उपस्थित होते.

विविध सुविधांचा प्रकल्प

बाळासाहेब देशपांडे रुग्णालयाच्या नूतन प्रस्तावित इमारतीत अनेकविध आरोग्य सुविधांचा समावेश आहे. महिलांसाठी २०० खाटांचे रुग्णालय उभारताना यातील १०० खाटा केवळ प्रसूतीसाठी आलेल्या महिलांसाठीच राखीव असतील. तर विविध आजाराने त्रस्त महिलांवरील उपचारासाठी अन्य १०० खाटांची सुविधा असेल. याशिवाय नवजात बालकांसाठी ३० खाटांचे स्वतंत्र रुग्णालयही असणार आहे. अन्य वैद्यकीय सुविधांचा या प्रकल्प आराखड्यात समावेश करताना या सुविधांसाठी आवश्यक असलेला वैद्यकीय स्टाफही मंजूर करण्याचाही प्रस्ताव यात देण्यात आला आहे. त्यामुळे प्रसूतीतज्ज्ञ, भूलतज्ज्ञ व अन्य आवश्यक वैद्यकीय तज्ज्ञांनाही या प्रस्तावात मंजुरी मिळणार आहे.

केंद्र सरकारच्या यंदाच्या बजेट पुनर्विनियोजनात राज्याच्या विविध आरोग्य प्रकल्पांचा समावेश असून, त्यात नगरच्या बाळासाहेब देशपांडे रुग्णालय उभारणीचाही प्रकल्प आहे. त्यामुळे राज्य सरकारकडून या प्रकल्पाला ना-हरकत मिळाल्यावर केंद्र सरकारकडून तातडीने पाच कोटीचा निधी महापालिकेला मिळेल व त्यानंतर प्रत्यक्ष उभारणीचे काम सुरू होणार आहे. सुमारे दोन महिन्यांचा कालावधी यासाठी अपेक्षित मानला जात आहे. त्यामुळे मनपातील सत्ताधारी शिवसेनेला आता राज्य सरकारकडे पाठपुरावा करून त्यांच्याद्वारे तातडीने हा प्रस्ताव केंद्राकडे जाण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज