अ‍ॅपशहर

ज्येष्ठ कामगार नेते सुरेश गवळी यांचे निधन; इंदिरा गांधी यांच्याशी होता थेट संपर्क

Suresh Gavali Death : अहमदनगर महाविद्यालयात शिक्षण घेताना सुरेश गवळी हे विद्यार्थी संघटनेत जनरल सेक्रेटरी म्हणून निवडून आले होते. त्यानंतर लाल निशाण पक्षाशी त्यांचा संबंध आला.

Authored byविजयसिंह होलम | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 25 Jul 2022, 11:39 am
अहमदनगर : कामगार चळवळीतील ज्येष्ठ नेते सुरेश मारुती गवळी (वय ७४) यांचे आज पहाटे निधन झाले. डाव्या विचारांच्या कामगारांच्या विविध संघटना बांधणीत त्यांचा मोठा वाटा होता. लाल निशाण पक्षाचे काम करताना दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी तसेच राजीव गांधी यांच्याशी त्यांचा थेट संपर्क होता. तरुण वयात थेट गांधी कुटुंबातील व्यक्तींशी संपर्क साधू शकणाऱ्या नेत्यांमध्ये गवळी यांचे नाव घेतले जाते.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम Ahmednagar (1)
ज्येष्ठ नेते सुरेश मारुती गवळी यांचे निधन


नेवासा तालुक्यातील शिंगवे तुकाई येथील मूळ रहिवासी असलेले सुरेश गवळी विद्यार्थी दशेपासूनच चळवळीकडे आकर्षित झाले. अहमदनगर महाविद्यालयात शिक्षण घेताना ते विद्यार्थी संघटनेत जनरल सेक्रेटरी म्हणून निवडून आले होते. त्यानंतर लाल निशाण पक्षाशी त्यांचा संबंध आला. नगरमधील दिवगंत कामगार नेते भास्करराव जाधव व मधुकर कात्रे यांच्यासोबत त्यांनी काम करण्यास सुरुवात केली.

स्वतंत्र भारतात जन्मलेल्या पहिल्या राष्ट्रपती, द्रौपदी मुर्मू यांचा शपथविधी सोहळा

गवळी यांनी साखर कामगार, औद्योगिक कामगार, कोतवाल, जिल्हा परिषद कामगार, वन कामगार, काच पत्रा वेचणारे कामगार अशा किती तरी कामगार संघटनांसाठी काम केले. सरकारकडे सातत्याने पाठपुरावा करून कामगारांचे विविध प्रश्न त्यांनी मार्गी लावले. कामगारांच्या प्रश्नांची ते अभ्यासूर्ण मांडणी करत. मार्क्सवादी तत्वज्ञानाचे ते अभ्यासक होते. यावर त्यांनी विपूल लेखन केले. या विषयावरील राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये त्यांनी सहभाग घेतला. पुढे त्यांचा लाल निशाण पक्ष भारतीय कम्युनिस्ट पक्षात विलीन झाला. त्यानंतरही त्यांचे कामगार चळवळीतील कार्य सुरूच होते. तरुण वयापासून चळवळीला वाहून घेतलेला नेता, अशी त्यांची ओळख होते.

सत्तांतरानंतर वारं फिरलं, पश्चिम महाराष्ट्रात भाजप पुन्हा मेगभरतीच्या तयारीत

नगरमधील टिळक रस्त्यावरील श्रमिक भवन येथील कार्यालयातून ते कामकाज पाहात होते. डाव्या चळवळीतील विचारवंत ते थेट सामान्य कामगार यांच्याशी त्यांचा संपर्क होता. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांचा देशात दरारा होता. त्या काळातही त्यांच्याशी थेट संपर्क करू शकणारे नेते म्हणून गवळी यांचा उल्लेख केला जात असे. लाल निशाण पक्षाच्या माध्यमातून त्यांचा काँग्रेस आणि गांधी परिवाराशी संपर्क वाढला होता. गेल्या काही वर्षांपासून ते आजारी होते. सोमवारी पहाटे त्यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले असा परिवार आहे. त्यांच्या निधनाची बातमी समजताच कामगार नेते आणि कामगार संघटनांचे पदाधिकारी तसेच नागरिकांनी त्यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांचे अंत्यदर्शन घेतले.
लेखकाबद्दल
विजयसिंह होलम
विजयसिंह होलम, ‘महाराष्ट्र टाइम्स’मध्ये विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. पत्रकारितेमधील २२ वर्षांचा अनुभव. राजकीय, सामाजिक, गुन्हेगारी विषयक आणि चालू घडामोडींच्या विषयांवर वेळोवेळी विश्लेषणात्मक लिखाण करतात. पत्रकारितेतील अनुभवांसंबंधी पुस्तकाचेही लेखन.... आणखी वाचा

महत्वाचे लेख