अ‍ॅपशहर

शिर्डीत ग्रामस्थांनाच दर्शन दुर्लभ, प्रशासन-ग्रामस्थांमध्ये वादाची ठिणगी

शिर्डीच्या साईबाबा संस्थानने दर्शन व्यवस्थेत बदल केल्यामुळे स्थानिकांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली आहे. दर्शनासाठी स्थानिक ग्रामस्थांनाही पास आवश्यक करण्यात आले आहेत. पास नि:शुल्क असले तरी त्यासाठी बराच वेळ जातो. दर्शन घेऊन आपल्या कामाला जाण्याची, तसेच सोयीनुसार दर्शन घेण्याची ग्रामस्थांची पद्धत आहे. मात्र, आता नव्या बदलामुळे त्यात अडचण येणार आहे.

Authored byविजयसिंह होलम | Edited byसुनील तांबे | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 25 Jan 2021, 5:17 pm
म.टा. प्रतिनिधी, अहमदनगर
महाराष्ट्र टाइम्स.कॉम शिर्डीत ग्रामस्थांनाच दर्शन दुर्लभ, प्रशासन ग्रामस्थांमध्ये वादाची ठिणगी


करोनाच्या परिस्थितीमुळे शिर्डीच्या साईबाबा संस्थानने दर्शन व्यवस्थेत बदल केले आहेत. मात्र, यामुळे स्थानिक ग्रामस्थांनाही दर्शन दुर्लभ होत आहे. याशिवाय प्रसारमाध्यमांसाठीही नियमावली करण्यात आली आहे. यावरून नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी ग्रामस्थ आणि देवस्थान प्रशासनात वादाची ठिणगी पडली असून तिची धग अद्याप कायम आहे. ग्रामस्थांनी यावर चर्चा करून पुढील दिशा ठरविण्यासाठी आज सोमवारी सायंकाळी बैठक बोलाविली आहे.

लॉकडाऊनंतर मंदीर खुले होऊन बरेच दिवस झाले आहेत. मात्र, या काळात प्रशासनाने घेतलेले काही निर्णय वादग्रस्त ठरले आहेत. वेशभूषासंबंधीच्या निर्णयाला ग्रामस्थांनी प्रशासनाला साथ दिली. आता मात्र ग्रामस्थांनाच अडचणीचा ठरणारा निर्णय घेण्यात आला आहे. दर्शनासाठी स्थानिक ग्रामस्थांनाही पास आवश्यक करण्यात आले आहेत. पास नि:शुल्क असले तरी त्यासाठी बराच वेळ जातो. दर्शन घेऊन आपल्या कामाला जाण्याची किंवा सोयीनुसार दर्शन घेण्याची येथील ग्रामस्थांची पद्धत आहे. मात्र, नव्या बदलामुळे त्यात अडचण येणार आहे. त्यामुळे ग्रामस्थ संतप्त झाले आहेत.

अर्थात वादाची ठिणगी ३१ डिसेंबरच्या रात्रीच पडली. त्या दिवशी रात्री प्रशासनाशी वाद झाल्याने नगराध्यक्षांसह अनेक गावकऱ्यांना दर्शनासाठी मंदिरात न जाता कळसाचे दर्शन घेणे पसंत केले. मध्यरात्री अनेक शिर्डीकर अनेक वर्षांपासून साईबाबांच्या मंदिरात जावून दर्शन घेतात. यावर्षी संस्थान प्रशासनाच्या धोरणामुळे अनेक शिर्डीकरांना नविन वर्ष प्रारंभाला मंदिरात जात आले नाही. शिर्डीचे नगराध्यक्ष शिवाजी गोंदकर, माजी विश्वस्त तथा शिवसेनेच्या नगरसेविका अनिता जगताप, माजी विश्वस्त सचिन तांबे, नगरसेवक सुजीत गोंदकर, माजी उपनगराध्यक्ष विजय जगताप यांच्यासह अनेक शिर्डीकरांना मुख्यकार्यकारी आधिकारी कान्हूराज बगाटे यांनी साईमंदिरात जाताना रोखले होते, तेव्हापासून ग्रामस्थ विरूद्ध प्रशासन वादाची ठिणगी पडली आहे.

त्यात आता नव्या बदलांची भर पडत आहे. अलीकडेच संस्थानने प्रसारमाध्यमांसाठी ११ कलमी नियमावली तयार केली आहे. ती मंजुरीसाठी उच्च न्यायालयाकडे पाठविण्यात आल्याचे सांगण्यात येते. ती लागू केली तर वृत्तसंकलनासाठी येणाऱ्या प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींचीही मोठी अडचण होणार आहे. त्यामुळे शिर्डीतील प्रसारमाध्यमांच्या प्रतिनीधींनी त्याला विरोध केला आहे.

शिर्डीच्या विश्वस्त मंडळाची मुदत केव्हाच संपली आहे. सध्या उच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या समितीमार्फत कामकाज सुरू आहे. त्यामध्ये सीईओंना बरेच अधिकार प्राप्त झाले असून त्यांच्याकडून मनमानी कारभार सुरू असल्याचा ग्रामस्थांचा प्रमुख आरोप आहे. त्यासाठी आता पक्षीय भेद बाजूला ठेवत ग्रामस्थ एकत्र आले आहेत. हा वाद समजुतीने मिटावा, अशीही अपेक्षा अनेक ग्रामस्थांकडून व्यक्त होत आहे.

वाचा- Mumbai Farmer Protest: असे राज्यपाल महाराष्ट्राने पाहिले नाहीत; पवारांचा घणाघात

‘शिर्डी ग्रामस्थांचे सुलभ दर्शन व्यवस्था, साईभक्तांचा त्रास कमी होण्यासंदर्भातील गेट नंबर ३ आणि ४ खुले करण्याची आमची मागणी आहे. तसेच साईबाबा संस्थान प्रशासन घेत असलेल्या अनेक जाचक निर्णयासंदर्भात विचारविनिमय करून ठोस निर्णय घेण्यासाठी सोमवारी सायंकाळी सहा वाजता ग्रामस्थांची बैठक बोलाविण्यात आली आहे. गरज पडल्यास हा मुद्दा आम्ही उपमुख्यमंत्री अजित पवार आणि विधी व न्याय विभागाच्या मंत्री आदिती तटकरे यांच्यापर्यंत नेणार आहोत,’ अशी माहिती राष्ट्रवादीचे संग्राम कोते पाटील यांनी दिली.

वाचा- 'तुमचा सातबारा भांडवलदारांच्या नावावर करण्याचा डाव'
वाचा- Dhananjay Munde: त्यांची नावं उघड करू का?; धनंजय मुंडेंबाबत प्रश्न विचारताच अजित पवार भडकले
लेखकाबद्दल
विजयसिंह होलम
विजयसिंह होलम, ‘महाराष्ट्र टाइम्स’मध्ये विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. पत्रकारितेमधील २२ वर्षांचा अनुभव. राजकीय, सामाजिक, गुन्हेगारी विषयक आणि चालू घडामोडींच्या विषयांवर वेळोवेळी विश्लेषणात्मक लिखाण करतात. पत्रकारितेतील अनुभवांसंबंधी पुस्तकाचेही लेखन.... आणखी वाचा

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज