अ‍ॅपशहर

ऑनलाइन कामास शिक्षकांचा नकार

शिक्षण विभागाची विविध प्रकारची ऑनलाइन प्रशासकीय कामे करताना शिक्षकांची दमछाक होत असून या कामात शिक्षकांचा वेळ वाया जात आहे.

Maharashtra Times 17 Sep 2017, 3:00 am
म. टा. प्रतिनिधी, नगर
महाराष्ट्र टाइम्स.कॉम teacher deni online work
ऑनलाइन कामास शिक्षकांचा नकार

शिक्षण विभागाची विविध प्रकारची ऑनलाइन प्रशासकीय कामे करताना शिक्षकांची दमछाक होत असून या कामात शिक्षकांचा वेळ वाया जात आहे. त्यामुळे मुलांच्या शिक्षणाबरोबरच शाळांच्या शैक्षणिक गुणवत्तेवरही त्याचा परिणाम होत असल्याने शिक्षकांनी ऑनलाइन कामे करण्यास नकार दिला आहे. अकोले येथील पंचायत समितीसमोर प्राथमिक, माध्यमिक शिक्षक संघटनांच्या समन्वय समितीची सभा झाली. तहसीलदार महेश कांबळे यांना निवेदन देण्यात आले.

ऑनलाइन कामांना शिक्षकांचा विरोध नाही. मात्र, त्यासाठी आर्थिक तरतूद करून स्वतंत्र यंत्रणा अस्तित्वात आणावी. प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र अंतर्गत पट संख्येइतक्या उत्तरपत्रिका पुरवाव्यात, लोकसहभागाची सक्ती करू नये, प्रशासकीय आदेश व्हाट्सअॅपवरुन न देता लेखी वा तोंडी कळवावेत, सरकारी शाळांना सवलतीच्या दरात वीज द्यावी, फेसबुक, ट्विटर वापरायची सक्ती करु नये, शासकीय उपक्रमात सेवावर्ग केलेल्या शिक्षकांच्या जागी तातडीने शिक्षक नेमावेत आदी मागण्या निवेदनात केल्या आहेत. ऑनलाइन कामांनी गांजलेले शिक्षक केंद्र आणि तालुका पातळीवरील व्हाट्सअप ग्रुपमधून सभास्थानीच बाहेर पडले. यापुढे आम्ही कोणत्याही प्रकारची ऑनलाइन कामे करणार नसल्याचे शिक्षक आणि मुख्याध्यापक यांनी यावेळी ठामपणाने सांगितले. ‘आम्हाला फक्त मुलांना शिकवू द्या’, असे शिक्षकांनी सांगितले. शिक्षण विभागाकडून शैक्षणिक कामांबरोबरच प्रशासकीय कामाची माहिती ऑनलाइन भरण्याच्या सूचना आहेत. शिक्षकांना अध्यापनाच्या कामातून वेळ काढून ही कामेही करावी लागत आहेत. त्यामुळे शाळांचे नियोजन कोलमडले आहे. प्रशासनाकडून सतत ऑनलाइन कामांचा तगादा लावल्याने, कारवाईचा बडगा उगारला जात असल्याने शिक्षक आणि मुख्याध्यापक प्रचंड तणावाखाली वावरत आहेत. त्यातून बीपी, डायबेटिससारखे आजार जडले असल्याच्या भावना शिक्षकांनी व्यक्त केल्या. अनिल मोहिते यांनी प्रास्ताविक केले. भास्कर कानवडे, सुनील धुमाळ, विठ्ठल म्हशाळ, भाऊसाहेब चासकर, सुनीता रूपवते यांची यावेळी भाषणे झाली. विलास गव्हाणे यांनी सूत्रसंचालन केले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज