अ‍ॅपशहर

मतदानासाठी जवखेडेतील आरोपींना हवी परवानगी

जवखेडे खालसा तिहेरी हत्याकांडातील तीन आरोपींकडून ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत मतदानाचा हक्क बजाविण्यासाठी गावात जाण्यासाठी परवानगी द्यावी, असा अर्ज न्यायालयात दाखल करण्यात आला आहे.

Maharashtra Times 22 Feb 2018, 4:08 pm
म. टा. प्रतिनिधी, नगर
महाराष्ट्र टाइम्स.कॉम the accused should be allowed to vote for the voters
मतदानासाठी जवखेडेतील आरोपींना हवी परवानगी


जवखेडे खालसा तिहेरी हत्याकांडातील तीन आरोपींकडून ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत मतदानाचा हक्क बजाविण्यासाठी गावात जाण्यासाठी परवानगी द्यावी, असा अर्ज न्यायालयात दाखल करण्यात आला आहे. सरकारी पक्षाने या अर्जाला विरोध दर्शवत कायद्या व सुव्यवस्थेमुळे ही परवानगी देऊ नये, असा युक्तिवाद केला आहे.

पाथर्डी तालुक्यातील काही ग्रामपंचायतींसाठी २७ फेब्रुवारी रोजी मतदान होत आहे. यात जवखेडे खालसा ग्रामपंचायतीचा समावेश आहे. या निवडणुकीत आरोपी प्रशांत जाधव, अशोक जाधव व दिलीप जाधव या तिघांना मतदानाचा हक्क बजावयाचा आहे. तीनही आरोपींना मतदानासाठी पोलिस बंदोबस्तात गावात नेण्याची परवानगी न्यायालयाने द्यावी, असा अर्ज आरोपींकडून अॅड. सुनील मगरे यांनी प्रधान जिल्हा न्यायाधीश रमेश देशमुख यांच्याकडे बुधवारी केला होता. या अर्जाला सरकारी पक्षाचे विशेष सरकारी वकील अॅड. उमेशचंद्र यादव यांनी विरोध केला आहे. या आरोपींना गावात नेल्यास कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल. या खटल्यात गावातील साक्षीदार आहेत. या आरोपींना गावात नेल्यास साक्षीदारांवर परिणाम होईल, असा युक्तिवाद विशेष सरकारी वकील यांनी केला. तसेच पोलिस बंदोबस्ताचा खर्चाचा मुद्दाही उपस्थित केला. पोलिस बंदोबस्ताचा खर्च आरोपी देऊ शकत नाही. त्यांची आर्थिक परिस्थिती नाही, असा युक्तिवाद आरोपींच्या वतीने मगरे यांनी केला. आरोपींना गावात नेता येत नसेल, तर पोस्टल मतदान करून द्यावे, अशी विनंती मगरे यांनी न्यायालयाला केली. या अर्जावर बुधवारी न्यायालयाने निर्णय राखून ठेवला आहे. दरम्यान तीन ही आरोपींना न्यायालयात उशीरा हजर करण्यात आल्याने बुधवारचे साक्षी व पुराव्याचे कामकाज होऊ शकले नाही. या खटल्याची पुढील सुनावणी १३ मार्चला ठेवण्यात आली आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज