अ‍ॅपशहर

तीन पदांचे उमेदवार निश्चित

महापालिकेच्या स्थायी समिती सभापतीपदासह महिला व बालकल्याण समिती सभापती व उपसभापती निवडीत मागील पंधरवड्यापासून सुरू असलेले दबावाचे राजकारण थंड पडण्याच्या मार्गावर आहे.

Maharashtra Times 23 Jul 2017, 3:00 am
म. टा. प्रतिनिधी, नगर
महाराष्ट्र टाइम्स.कॉम the candidates of the three posts are decided
तीन पदांचे उमेदवार निश्चित

महापालिकेच्या स्थायी समिती सभापतीपदासह महिला व बालकल्याण समिती सभापती व उपसभापती निवडीत मागील पंधरवड्यापासून सुरू असलेले दबावाचे राजकारण थंड पडण्याच्या मार्गावर आहे. या तिन्ही पदांसाठी सुरू असलेली रस्सीखेच थंडावल्याचे स्पष्ट करताना ही पदे कोणाला द्यायची, तेही निश्चित झाल्याचे सत्ताधारी शिवसेनेतर्फे सांगितले जात आहे. मात्र, असे असले तरी या निवडणुकीबाबतचे अंतिम चित्र उमेदवारी दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजे सोमवारीच (२४ जुलै) स्पष्ट होणार आहे.

या तीन जागांसाठी येत्या २५ जुलै रोजी निवडणूक होणार आहे. त्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया नगरसचिव कार्यालयात सुरू आहे. पहिल्या दोन दिवसात अवघे ४ अर्ज इच्छुकांनी नेले आहेत. एकही अर्ज मात्र दाखल झालेला नाही. स्थायीच्या सभापतीपदासाठी मनसेच्या सुवर्णा जाधव व महिला व बालकल्याण समितीच्या सभापती व उपसभापती या दोन्ही पदांसाठी राष्ट्रवादीच्या कलावती शेळके यांनी अर्ज घेतले आहेत. तसेच याच समितीच्या सभापती व उपसभापतीपदासाठी अनुक्रमे अपक्ष नगरसेविका सारिका भूतकर व शिवसेनेच्या नगरसेविका सुनीता मुदगल यांनीही अर्ज घेतले आहेत. येत्या २४ जुलैला पहिल्या श्रावणी सोमवारच्या मुहूर्तावर या तिन्ही पदांसाठी उमेदवारी दाखल होणार आहे. त्याच वेळी कोणत्या पदासाठी किती अर्ज आले व अंतिम निकाल काय असेल, हेही स्पष्ट होणार आहे.

राजकारण जोरात

सेनेची सत्ता येताना मनसेच्या सुवर्णा जाधव व वीणा बोज्जा या दोन नगरसेविकांनी साथ दिली असल्याने यापैकी जाधव यांना स्थायी समितीचे सभापतीपद देण्याचा शब्द दिला गेला होता. मात्र, सेनेच्या कोट्यातून स्थायीवर निवड झालेले भाजपचे बाबासाहेब वाकळे यांनीही या पदासाठी प्रयत्न सुरू केले होते. यामुळे फाटाफुटीची चिन्हे दिसू लागल्याने या वादात अखेर तोडगा काढण्यात आला. जाधव यांना हे पद नऊ महिन्यांसाठी देण्याचे व नंतर वाकळेंना ते देण्याचे ठरले आहे. मात्र, हा वाद मिटत नाही तोच महिला व बालकल्याण समितीच्या सभापती-उपसभापतीपदाचा वाद चिघळला. सत्तेला साथ देणाऱ्या अपक्ष नगरसेविका सारिका भूतकर यांना सभापतीपदाचा शब्द दिला असल्याचे सांगितले जात असले तरी सेनेच्या छाया तिवारी व सुनीता मुदगल यांनीही या पदावर दावा केला आहे. याशिवाय या समितीच्या उपसभापतीपदाचा शब्द
मनसेच्या वीणा बोज्जा यांनाही दिल्याचे सांगितले जाते.
या पार्श्वभूमीवर दबावाचे राजकारण जोरात सुरू झाल्याने सत्ताधारी वर्तुळात अस्वस्थता पसरून समर्थक गटात फाटाफुट व नगरसेवक खरेदी-विक्रीसारख्या घोडेबाजाराची चिन्हे दिसू लागली होती. त्यासाठीही काही इच्छुकांची तयारी होती. मात्र, सध्या गटारी अमावस्येनिमित्तच्या दिवस व रात्रीच्या स्वतंत्र पार्ट्या सत्ताधाऱ्यांमधून रंगत असून, त्यात होणाऱ्या चर्चांतून आपसातील फाटाफूट टाळण्यासाठी तडजोडीला प्राधान्य दिल्याचे सांगितले जाते.

या तिन्ही पदांसाठी अनुक्रमे जाधव, भूतकर व मुदगल यांना संधी देण्याचे व बोज्जा, तिवारी व शेळके यांची समजूत काढली गेल्याचे सांगितले जाते. त्यामुळे या तिन्ही पदांसाठी सुरू असलेली रस्सीखेच काहीअंशी थंडावल्याचे चित्र आहे. मात्र, याबाबतचे अंतिम चित्र सोमवारीच स्पष्ट होणार आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज