अ‍ॅपशहर

चौदावा वित्त आयोग निधी खर्चाची माहिती द्या

महापालिकेने चौदाव्या वित्त आयोगाच्या निधीतून केलेल्या खर्चाची सविस्तर माहिती काँग्रेसने महापालिका आयुक्त घनश्याम मंगळे यांच्याकडे मागितली आहे.

Maharashtra Times 15 Mar 2018, 3:15 pm
म. टा. प्रतिनिधी, नगर
महाराष्ट्र टाइम्स.कॉम the fourteenth finance commission asked for the expenditure
चौदावा वित्त आयोग निधी खर्चाची माहिती द्या


महापालिकेने चौदाव्या वित्त आयोगाच्या निधीतून केलेल्या खर्चाची सविस्तर माहिती काँग्रेसने महापालिका आयुक्त घनश्याम मंगळे यांच्याकडे मागितली आहे. प्रदेश युवक काँग्रेसचे सचिव निखिल वारे यांनी बुधवारी यासंदर्भात मंगळे यांना पत्र दिले आहे. यामुळे महापालिकेतील तपोवन रस्त्याचे शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसचे राजकारण अधिक संघर्षमय होण्याची चिन्हे आहेत.

शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख दिगंबर ढवण यांच्या मागणीनुसार चौदाव्या वित्त आयोगाच्या निधीतून सावेडीतील तपोवन रस्त्यासाठी दीड कोटींचा निधी देण्यास महापालिकेने मंजुरी दिली आहे; मात्र, या रस्त्याच्या कामासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांनी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतूनही तीन कोटींचा निधी मिळवला आहे. एकाच रस्त्यावर दोन निधी खर्च होण्याची शक्यता असल्याने महापालिका प्रशासन संभ्रमात आहे. अशा स्थितीत या वादात काँग्रेसने उडी घेतल्याचे दिसू लागले आहे. वारे यांनी चौदाव्या वित्त आयोगाच्या निधीतील खर्चाची महापालिकेकडे मागितलेली माहिती तपोवन रस्त्याच्या अनुषंगानेच मागितली असल्याचे बोलले जात आहे. केवळ हा तपोवन रस्ता संघर्ष ढवण व जगताप यांच्यात सुरू असताना त्यांनी यात घेतलेली उडी चर्चेचे कारण मात्र झाली आहे.

चौदाव्या वित्त आयोगातून महापालिकेला मिळालेला निधी तसेच जनरल फंड, घनकचरा व्यवस्थापन व घरकुल योजनेसाठी मिळालेला निधी, या वित्त आयोगाच्या एकत्रित बजेट रजिस्टरची माहिती, या निधीतून जनरल फंडात घेण्यात आलेल्या कामांची माहिती, घनकचरा व्यवस्थापनावर झालेला खर्च, या निधीतील शिल्लक रक्कम, या निधीतून प्रस्तावित केलेली कामे व या कामांसाठीचा निधी सोडून शिल्लक असलेला निधी यांची माहिती वारे यांनी आयुक्तांकडे मागितली आहे. तसेच या निधीतून घनकचरा व्यवस्थापनासाठी मिळालेला पैसा घनकचरा व्यवस्थापनाची कामे पूर्ण झाली नसताना अन्य कामांवर खर्च करता येतो काय, याचाही खुलासा विचारण्यात आला आहे. वारे यांनी विचारलेली माहिती तपोवन रस्त्याच्या कामाच्या अनुषंगाने सुरू असलेल्या वादंगाशी संबंधित असल्याने त्यांच्या पत्राची महापालिकेत चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे तपोवन रस्त्याचा वाद आणखी चिघळण्याची शक्यता आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज