अ‍ॅपशहर

प्रिय रोहित दादा, शाळेत जायला सायकल दिली, खूप आनंद झाला, आता...; विद्यार्थिनीचं पत्र

MLA Rohit Pawar: कर्जत तालुक्यातील १० हजार विद्यार्थ्यांना आमदार रोहित पवार यांच्याकडून सायकलींचे मोफत वाटप करण्यात आले. यावेळी एका विद्यार्थिनीने त्यांना पत्र लिहले.

Authored byविजयसिंह होलम | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 1 Apr 2023, 6:11 pm
अहमदनगर : कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांच्या पुढाकारातून कर्जत तालुक्यातील गरजू विद्यार्थ्यांना सुमारे दहा हजार सायकलींचे मोफत वाटप करण्यात आले. यामुळे दुर्गम भागातील विद्यार्थ्यांची शाळेची चांगली सोय झाली आहे. याबद्दल आठवीतील एका विद्यार्थींनीने आमदार पवार यांना पत्र लिहून त्यांचे आभार मानले आहेत. मात्र, आता कर्जत मध्ये आमच्यासाठी एक सुसज्ज मेडिकल कॉलेज उभारावे, अशी अपेक्षा या चिमुकलीने पत्रातून व्यक्त केली आहे. सायकल वाटपातून आपल्याला समाधान मिळाल्याचे सांगून आमदार पवार यांनी याबद्दल त्या विद्यार्थ्यांचेच आभार मानले आहेत.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम Rohit Pawar


मतदारसंघासोबतच राज्याच्या राजकारणात सक्रीय असलेले आमदार रोहित पवार मतदारसंघात विद्यार्थी आणि युवकांसाठीही कार्यरत असतात. गेल्या आठवड्यात त्यांनी कर्जतमध्ये मोठा कार्यक्रम घेतला. यामध्ये दहा हजार शालेय विद्यार्थ्यांना मोफत सायकलींचे वाटप करण्यात आले. विरोधीपक्ष नेते अजित पवार यांच्या हस्ते हा कार्यक्रम झाला. ग्रामीण आणि दुर्गम भागात राहणाऱ्या मुलांची शाळेत जाण्याची सोय व्हावी, या उद्देशाने त्यांना सायकली देण्यात आल्या. आता या नव्या कोऱ्या सायकली घेऊन विद्यार्थी शाळेत जाऊ लागले आहेत.

कर्जत तालुक्यातील चिंचोली काळदात येथील तृप्ती थिटे या आठवीत शिकणाऱ्या विद्यार्थीनीने याबद्दल आमदार पवार यांना आभाराचे पत्र लिहिले आहे. एवढेच नव्हे तर एक मोठी मागणीही केली आहे. पवार यांनी हे सोशल मीडियात शेअर करून या विद्यार्थिनीचे आभार मानले आहेत.


तृप्ती हिने पत्रात म्हटले आहे की, तुम्ही सायकली दिल्याने आम्हाला खूप आनंद झाला आहे. तुम्ही आमच्या भविष्यासाठी एक दूत आहात, याची खात्री पटली आहे. कर्जत-जामखेडच्या विकासासाठी तुम्ही प्रयत्न करीत आहात. आमची स्वप्न तुम्ही पूर्ण करताना दिसत आहात. आता कर्जतमध्ये एक भव्य मेडीकल कॉलेज उभे राहावे, अशी आमची इच्छा आहे. आमची ही इच्छा तुम्ही पूर्ण कराल, याची खात्री आहे. तुम्ही आमच्या भागासाठी काम करीत आहात, याचा आम्हा लहान मुलांनाही खूप आनंद वाटत आहे, असेही तिने म्हटले आहे.


आमदार पवार यांनी यावर म्हटले आहे की, तृप्तीसारख्या हजारो विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद अनुभवणं यांच्यासारखं दुसरं समाधान नाही. हे आनंदाचे आणि समाधानाचे क्षण अनुभवण्याची संधी दिल्याबद्दल खरं म्हणणे मीच या मुलांचे आभार मानायला हवेत, असेही पवार यांनी म्हटले आहे.
लेखकाबद्दल
विजयसिंह होलम
विजयसिंह होलम, ‘महाराष्ट्र टाइम्स’मध्ये विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. पत्रकारितेमधील २२ वर्षांचा अनुभव. राजकीय, सामाजिक, गुन्हेगारी विषयक आणि चालू घडामोडींच्या विषयांवर वेळोवेळी विश्लेषणात्मक लिखाण करतात. पत्रकारितेतील अनुभवांसंबंधी पुस्तकाचेही लेखन.... आणखी वाचा

महत्वाचे लेख