अ‍ॅपशहर

वाहतूककोंडीतून मार्ग निघणार

नगर शहरासह सावेडी उपनगरात विविध ठिकाणी होणाऱ्या वाहतूककोंडीतून मार्ग निघण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

Maharashtra Times 10 Feb 2017, 3:00 am
म. टा. प्रतिनिधी, नगर
महाराष्ट्र टाइम्स.कॉम traffic jam
वाहतूककोंडीतून मार्ग निघणार


नगर शहरासह सावेडी उपनगरात विविध ठिकाणी होणाऱ्या वाहतूककोंडीतून मार्ग निघण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. शहर वाहतूक पोलिसांनी यासंदर्भात नियोजन केले असून, त्या अनुषंगाने महापालिकेला सूचना देण्यात आल्या आहेत. या प्रस्तावानुसार अमरधाम स्मशानभूमीचा मुख्य दरवाजा अंत्ययात्रांसाठी बंद करून नव्या पाठीमागील दरवाजाने प्रवेश दिला जाणार आहे. सावेडीत टीव्ही सेंटर ते प्रोफेसर कॉलनी चौक रस्त्याच्या व प्रोफेसर कॉलनी चौक ते प्रेमदान चौक रस्त्याच्या दुतर्फा नो-पार्किंग झोन केला जाणार आहे. या चौकातील पार्किंग सुविधा मनपाच्या या चौकांतील गाळ्यांच्यामागे केली जाणार आहे. तसेच, शहरातील विविध रस्त्यांवर असलेले पी-१ व पी-२ फलक नव्याने रंगविले जाणार आहेत.

पोलिस अधीक्षक डॉ. सौरभ त्रिपाठी यांनी शहर वाहतूक शाखेच्या वाहतूक नियोजन प्रस्तावानुसार मनपा आयुक्तांना पत्र दिले असून, शहर वाहतूक शाखेला आवश्यक असलेल्या सुविधा देण्याचे सुचवले आहे. वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक अजित लकडे यांनी याअनुषंगाने मनपाचे प्रभारी आयुक्त विलास वालगुडे यांची भेट घेऊन त्यांना या प्रस्तावाची माहिती दिली. वालगुडे यांनी त्यास सकारात्मक प्रतिसाद देताना पहिल्या टप्प्यात शहरातील सर्व रस्त्यांवरील पी-१ व पी-२ फलक, तसेच नो-पार्किंग, प्रवेशबंदी फलकांचे नव्याने रंगकाम करवून घेण्याच्या सूचनाही तातडीने मनपाच्या संबंधित विभागा प्रमुखांना दिल्या आहेत.

सावेडीत नो-पार्किंग झोन

फळ, भाजी व खाद्यपदार्थ विक्रेते रस्त्यावरच व्यवसाय करीत असल्याने व नागरिकही रस्त्यावरच वाहने उभी करीत असल्याने येथे वाहतूककोंडी होते. त्यामुळे शहर वाहतूक शाखेने प्रोफेसर कॉलनी चौकातून टीव्ही सेंटर-आकाशवाणी रस्ता व प्रोफेसर कॉलनी चौक ते प्रेमदान रस्ता या दोन्ही रस्त्यांच्या दोन्ही बाजूंना १०० मीटर अंतरापर्यंत नो-पार्किंग झोन प्रस्तावित केला आहे. या रस्त्यांवर येणाऱ्या वाहनांना प्रोफेसर कॉलनी चौकातील मनपाच्या गाळ्यांच्या मागे असलेल्या जागेत पार्किंग व्यवस्था केली जाणार आहे. या बदलाचा अंतिम आदेश लवकरच लागू होणार आहे. त्यामुळे या चौकातील मनपाच्या गाळ्यांमागे पार्किंग व्यवस्थेसाठी आवश्यक सुविधा करण्याचे महापालिकेला सांगण्यात आले आहे. दरम्यान, नो-पार्किंग झोनमध्ये लावलेल्या वाहनांवर कारवाई करण्यासाठी शहर वाहतूक शाखेद्वारे टेम्पो क्रेन सुरू केली जाणार आहे. त्यामुळे पी-१, पी-२, नो-पार्किंग, प्रवेश बंदी असे फलक मनपाद्वारे विविध ठिकाणी लावले जाणार आहेत. पूर्वीचे असे काही फलक पुसट झाले असतील तर ते नव्याने रंगवून घेतले जाणार आहेत.

अमरधाम गेट बंद होणार

अमरधाम रोडवर नेप्ती चौकात नेहमी वाहतूककोंडी होत असल्याने एखाद्या अंत्ययात्रेच्यावेळी अडचणी निर्माण होतात. त्यामुळे आता नालेगावच्या दिशेने असलेला अमरधामचा मुख्य दरवाजा पूर्ण बंद करून पाठीमागील कल्याण रोडच्या दिशेला असलेल्या नव्या दरवाजाने अंत्ययात्रांना प्रवेश दिला जाणार आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज