अ‍ॅपशहर

वाडिया पार्कवर यंदा ‘टर्फ विकेट’ होणारच

‘जिल्हा क्रिकेट असोसिएशन टर्फ विकेट करेलच व त्यासाठी माझा आमदारनिधी देईन’, अशी ग्वाही आमदार अरुण जगताप यांनी शुक्रवारी येथे दिली.

Maharashtra Times 14 Jan 2017, 3:00 am
म. टा. प्रतिनिधी, नगर
महाराष्ट्र टाइम्स.कॉम wadia park cricket
वाडिया पार्कवर यंदा ‘टर्फ विकेट’ होणारच


‘वाडिया पार्क मैदानावरील क्रॉम्प्टन क्रिकेट स्पर्धा टर्फ विकेटवर खेळली गेली तर महाराष्ट्राच्या संघ निवडीत या स्पर्धेतील खेळाडूंच्या कामगिरीचा विचार केला जाईल’, असे माजी रणजीपटू अनिल वाल्हेकर यांनी स्पष्ट केल्यावर, ‘जिल्हा क्रिकेट असोसिएशन यंदा या मैदानावर टर्फ विकेट करेलच व त्यासाठी माझा आमदारनिधी देईन’, अशी ग्वाही जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आमदार अरुण जगताप यांनी शुक्रवारी येथे दिली.

३१व्या क्रॉम्प्टन करंडक क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन शुक्रवारी सकाळी वाडिया पार्क मैदानावर पुणे रणजी संघाचे माजी खेळाडू निरंजन गोडबोले यांच्या हस्ते झाले. ‘मॅट’वर होणाऱ्या यंदाच्या १९ वर्षांआतील खेळाडूंच्या या स्पर्धेत २४ संघ सहभागी झाले असून, त्यात राज्यातील १३ संघ व जिल्ह्यातील ११ संघ आहेत. ४० षटकांच्या या स्पर्धेची प्रत्यक्ष सुरुवात शनिवारी (१४ जानेवारी) परभणी जिल्हा व क्रिकेट करिअर अकादमी यांच्यातील सामन्याने होणार आहे.

येथे टर्फ विकेट करण्यासाठी पुणे क्रिकेट असोसिएशन मदत करेल, अशी ग्वाही रणजीपटू वाल्हेकर यांनी दिली. ‘क्रीडा संकुल समितीने क्रिकेटचे मैदान जिल्हा क्रिकेट असोसिएशनकडे द्यावे किंवा किमान टर्फ विकेट करण्याची परवानगी द्यावी’, असे आमदार जगताप यांनी जिल्हा क्रीडाअधिकारी उदय जोशी यांना सुचवले.

महापौर सुरेखा कदम, उपमहापौर श्रीपाद छिंदम, आमदार संग्राम जगताप, नगरसेवक कुमार वाकळे, प्रा. माणिक विधाते, गणेश गोंडाळ, डॉ. विजय भंडारी, नरेंद्र बाफना, प्रा. रंगनाथ डागवाले, एल. बी. म्हस्के, क्रॉम्प्टन कंपनीचे श्रीराम कुलकर्णी, कामगार प्रतिनिधी अशोक बिमन, माधव वायकर, मधुसूदन कोलते, कपिल पवार उपस्थित होते. क्रॉम्प्टनचे उपाध्यक्ष एन. रमेशकुमार यांनी स्वागत केले. आनंद कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले. नंदकुमार येलूलकर यांनी आभार मानले. उद्‍घाटनानंतर महिला क्रिकेट खेळाडूंचा प्रदर्शनीय सामना झाला. यात पुणे महिला संघाने नगर महिला संघाचा आठ गडी राखून पराभव केला. नगर संघाने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात १०१ धावा केल्या.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज