अ‍ॅपशहर

पोलिस बंदोबस्तात झेंडीगेट परिसर सफाई

पाच पोलिसांच्या बंदोबस्तात मनपाच्या तब्बल पन्नासच्यावर सफाई कामगारांनी शुक्रवारी झेंडीगेट परिसरात विशेष स्वच्छता मोहीम राबवली.

Maharashtra Times 2 Dec 2017, 3:00 am
म. टा. प्रतिनिधी, नगर
महाराष्ट्र टाइम्स.कॉम with police force zendi gate area cleanliness campain
पोलिस बंदोबस्तात झेंडीगेट परिसर सफाई


पाच पोलिसांच्या बंदोबस्तात मनपाच्या तब्बल पन्नासच्यावर सफाई कामगारांनी शुक्रवारी झेंडीगेट परिसरात विशेष स्वच्छता मोहीम राबवली. दोन स्वच्छता कामगारांना मारहाण झाल्याने मागील तीन दिवसांपासून या भागाच्या स्वच्छतेवर मनपा कामगार संघटनेने बहिष्कार टाकला होता. अखेर मनपा प्रशासनाने पोलिस बंदोबस्त दिल्याने शुक्रवारी चौथ्या दिवशी मनपाचे स्वच्छता कामगार या भागातील रस्त्यांवर उतरले. तब्बल साडेचार ते पाच तास ही मोहीम सुरू होती.

दोन सफाई कामगारांना मारहाण झाल्याने मागील मंगळवारपासून झेंडीगेट परिसराची सफाई मनपाच्या कामगारांनी केलेली नव्हती. सफाई कामगारांना पोलिस बंदोबस्त दिला तरच शुक्रवारी (१ डिसेंबर) झेंडीगेट परिसराची सफाई करण्याची भूमिका कामगार संघटनेचे अध्यक्ष अनंत लोखंडे यांनी घेतली होती. त्यामुळे प्रभारी आयुक्त भानुदास पालवे यांच्या परवानगीने मनपा प्रशासनाने झेंडीगेट व परिसराच्या साफसफाईसाठी आठ दिवस पोलिस बंदोबस्त देण्याची मागणी पोलिस अधिकाऱ्यांना केली होती. त्यांनीही त्यास मान्यता दिल्याने शुक्रवारी सकाळी साडेसहा वाजताच पाच पोलिस झेंडीगेटला हजर झाले. त्यानंतर कामगार संघटनेचे अध्यक्ष लोखंडे यांनी स्वच्छता कामगारांना येथे बोलावून घेतले. अन्य भागातील स्वच्छता कर्मचारीही बोलावून घेण्यात आले. तब्बल ५०च्यावर कामगार, कचरा संकलन गाडी, घंटा गाड्या व अन्य आवश्यक यंत्रणाही दिमतीला होती. रामचंद्र खुंट ते जिल्हाधिकारी कार्यालय ते स्टेट बँक चौक ते अशोका हॉटल चौक ते पुन्हा रामचंद्र खुंट याअंतर्गत असलेला झेंडीगेट परिसर चकाचक करण्यात आला.

उपआरोग्य अधिकारी डॉ. पैठणकर, मुख्य स्वच्छता निरीक्षक वाघ, स्वच्छता निरीक्षक प्रशांत रामदीन, कामगार संघटनेचे अध्यक्ष लोखंडे आदी या स्वच्छता मोहिमेत होते. महापौरांसह महापालिकेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनीही झेंडीगेटच्या स्वच्छता मोहिमेत सहभागाची ग्वाही दिली होती. मात्र, कोणीही मोहिमेकडे फिरकले नाही.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज