अ‍ॅपशहर

Video: रेल्वे पकडताना तोल जाऊन पडली, आईला पाहून लेकीची धावत्या गाडीतून उडी; थरारक प्रसंग

Akola News: धावती रेल्वे पकडण एका महिलेच्या जीवावर बेतता बेतता राहिलं आहे. ही महिला धावती रेल्वे पकडण्याच्या प्रयत्नात असताना तिचा तोल गेला आणि ती रेल्वे आणि फलाटाच्या मध्ये पडली. काही काळ ही महिला तशीच फरपटत गेली.

| Edited byनुपूर उप्पल | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 30 Mar 2023, 7:27 am
अकोला: रेल्वे स्थानकात धावती रेल्वे पकडणं एका महिलेच्या चांगलंच जीवावर बेतणारं ठरलं असतं. परंतू काळ आला होता पण वेळ आली नव्हती, असंच काहीसं अकोल्याच्या रेल्वे स्थानकात दिसून आलं. बुधवारी रात्री साडे ९ वाजताच्या सुमारास एक महिला तिच्या मुलीसोबत मुंबईला जाण्यासाठी चालत्या अमरावती एक्सप्रेसमध्ये चढण्याचा प्रयत्न करत होती.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम Akola railway station video


मुलगी रेल्वेत चढली खरी, पण पाठीमागे असलेल्या महिलेचा (आईचा) त्याच तोल गेल्याने ती रेल्वे आणि प्लॅटफॉर्मच्या मध्ये पडली. त्याचवेळी रेल्वे स्थानकावर असलेल्या रेल्वे व्हेंडरसह प्रवाशांनी तिला बाहेर ओढलं आणि रेल्वेखाली जाता-जाता महिला थोडक्यात बचावली. तिकडे आपल्या आईला पडताना पाहताच मुलीनेही चालत्या रेल्वेतून उडी घेतली. हा संपूर्ण थरारक प्रसंग सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आहे.

पाहा या घटनेचा थरारक व्हिडिओ -


अनेक भागात सद्यस्थित अतीघाईमुळे अनेकांनी रेल्वे प्रवासामध्ये आपला जीव गमावला आहे. धावत्या रेल्वेत चढण्याचा अथवा रेल्वेतून खाली उतरण्याच्या प्रयत्नात अपघाताच्या मोठ्या प्रमाणात घटना घडल्या. दरवर्षी कितीतरी लोक यामध्ये जीव गमावतात तर कित्येकजण गंभीर जखमी होतात. आजचा अकोला रेल्वे स्थानकावरील प्रकारही अत्यंत थरारक होता.

वाशिम येथील बेबी मधुकर खिलारे या तिच्या मुलीसोबत अमरावती एक्सप्रेसने मुंबईला जात होत्या. त्यांना रेल्वे स्थानकात पोहोचायला वेळ झाला, त्यामुळे त्या प्लॅटफॉर्मवर वेळेत पोहचू शकल्या नाही आणि गाडी सुटली. आई आणि मुलगी दोघेही प्लॅटफॉर्मवर आल्या. तेव्हा अमरावती एक्सप्रेस नुकतीच सुटली होती. तेवढ्यात आई आणि मुलीने धावती रेल्वे पकडण्याचा प्रयत्न केला. मुलगी रेल्वे चढली, परंतु रेल्वेत चढण्याच्या प्रयत्नात असताना बेबी यांचा पाय घसरला आणि त्या रेल्वे आणि प्लॅटफॉर्ममध्ये अडकून रेल्वे खाली जात होत्या. मात्र, या ठिकाणी असलेल्या रेल्वे व्हेंडर शंकर स्वर्गे आणि इतर प्रवाशांनी लागलीच त्यांना बाहेर ओढलं आणि त्यांचा जीव वाचवला. रेल्वेच्या दरवाज्यातून आपल्या आईला पडताना पाहताच मुलीनेही थोड्या अंतरावर चालत्या रेल्वेतून उडी घेतली.


सद्यस्थितीत आई आणि मुलगी दोघीही सुखरुप असून पुढील प्रवासासाठी रवाना झाल्या आहेत. हा संपूर्ण प्रकार अकोला रेल्वेस्थानकावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. दरम्यान, स्वर्हगे यांच्या या धाडसी कृत्याचं सर्वत्र कौतुक केलं जातं आहे. अवघ्या १५ सेकंदात हा सारा थरारक प्रसंत घडला. पण, दैव बलवत्तर म्हणून महिलेचा आणि तिच्या मुलीचा जीव वाचला आहे. त्यानंतर अवघ्या २० सेकंदात रेल्वे पुढील स्थानकासाठी रवाना झाली आहे. दरम्यान, अकोला लोहमार्ग पोलिसांकडून प्रवाशांना आवाहन करण्यात येते की, कोणीही अशा प्रकारे आपला जीव धोक्यात घालून धावत्या रेल्वेमध्ये चढणे-उतरणे, रेल्वे लाईन क्रॉस करुन नये.

महत्वाचे लेख