अ‍ॅपशहर

शिवसेना वाचवण्यासाठी काय करावं लागेल? प्रकाश आंबेडकरांनी मोजक्याच शब्दांत फॉर्म्युला सांगितला

Uddav Thackeray Dasara Melava : दोन गटांमध्ये झालेल्या विभागणीमुळे शिवसेनेच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. अशा स्थितीत प्रकाश आंबेडकर यांनी उद्धव ठाकरे यांना एक सल्ला दिला आहे.

| Edited byअक्षय शितोळे | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 6 Oct 2022, 5:09 pm
अकोला : मुंबईत काल शिवसेनेचे दोन दसरा मेळावे झाले. शिवाजी पार्क येथून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि बीकेसी मैदानातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी परस्परांविरोधात घणाघाती हल्ला चढवला. त्यामुळे या दोन नेत्यांमधील संघर्षाची दरी आणखीनच वाढली आहे. दोन गटांमध्ये झालेल्या विभागणीमुळे शिवसेनेच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. अशा स्थितीत उद्धव ठाकरे यांची भविष्यातील राजकीय दिशा कशी असेल, याबाबत तर्क-वितर्क लढवले जात असताना वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी आपली भूमिका मांडली आहे. तसंच उद्धव ठाकरे यांना एक सल्लाही दिला आहे.

'उद्धव ठाकरेंना एकनाथ शिंदेंना स्पेस मिळू द्यायची नसेल तर पुढच्या सर्वच निवडणुका त्यांना लढवाव्या लागतील. समझोत्याच्या राजकारणात न अडकता त्यांना हे करावं लागेल,' असं आंबेडकर यांनी म्हटलं आहे. काँग्रेसनं आतापर्यंत एका आरपीआयच्या दहा आरपीआय केल्या आहेत. त्याच पद्धतीने भाजपला एका शिवसेनेच्या दहा शिवसेना करायचा आहेत. त्यामुळे सध्याच्या राजकीय नाट्याचं दिग्दर्शन आणि स्क्रिप्ट रायटिंग तसंच कॅमेरामनही भाजपचे आहेत. आता भाजपला एका शिवसेनेची दहा शिवसेना करू द्यायच्या की नाही, हे उद्धव ठाकरेंनी ठरवावं लागेल,' असंही ते म्हणाले.

अनिल देशमुख लवकरच तुरुंगातून सुटणार? न्यायालयाकडून सीबीआयला उत्तर दाखल करण्याचे आदेश

'शिवसेनेनं ऑफर स्वीकारली नाही'

'सध्याच्या राजकीय स्थितीत महाराष्ट्रातील जनता कोणत्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमत देत नसल्याचं चित्र आहे. त्यामुळे दोन पक्षांना एकत्र येऊनच सत्ता स्थापन करावी लागते. अशा स्थितीत आम्ही शिवसेनेला सोबत येण्याची ऑफर दिली होती. मात्र शिवसेनेकडून अद्याप प्रतिसाद आलेला नाही,' अशी माहिती प्रकाश आंबेडकर यांनी दिली आहे.

आयुष्यभर जपलेला भगवा शेला अखेरच्या क्षणीही पांघरला, निष्ठावान शिवसैनिकाला अखेरचा निरोप

दरम्यान, 'सध्या सुरू असलेलं राजकारण हे महाराष्ट्राची परंपरा नाही. काल दसरा मेळावा सुरू असल्यानं लोकांच्या गाठीभेटी घेत होतो. त्यामुळे ठाकरे आणि शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यातील कुणाचंच भाषण ऐकलं नाही. मी भाषणाकडे लक्षही दिलं नाही आणि विचारणा केली नाही,' असंही आंबेडकर यांनी स्पष्ट केलं आहे.

महत्वाचे लेख