अ‍ॅपशहर

घातपाताचा कट उधळला

माओवाद्यांनी पुकारलेल्या शहीद सप्ताहाच्या पहिल्याच दिवशी, गुरुवारी पोलिसांनी घातपाताचा मोठा कट उधळून लावला. यावेळी पोलिसांबरोबरच्या चकमकीत एक महिला माओवादी ठार झाली.

Maharashtra Times 29 Jul 2016, 4:30 am
म. टा. प्रतिनिधी, गडचिरोली
महाराष्ट्र टाइम्स.कॉम gadchiroli female naxzlite killed in counter
घातपाताचा कट उधळला


माओवाद्यांनी पुकारलेल्या शहीद सप्ताहाच्या पहिल्याच दिवशी, गुरुवारी पोलिसांनी घातपाताचा मोठा कट उधळून लावला. यावेळी पोलिसांबरोबरच्या चकमकीत एक महिला माओवादी ठार झाली.

विविध चकमकींमध्ये ठार झालेल्या माओवाद्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ माओवाद्यांतर्फे शहीद सप्ताहाचे आयोजन करण्यात येत असते. गुरुवारपासून माओवाद्यांनी गडचिरोली जिल्ह्यात शहीद सप्ताह पुकारला आहे. बुधवारी जिल्हा पोलिस अधीक्षक अभिनव देशमुख यांना छत्तीसगड सीमेलेगतच्या जप्पी गावाजवळ मोठ्या संख्येत माओवादी जमल्याची माहिती मिळाली. त्यानुसार देशमुख आणि अतिरिक्त अधीक्षक मंजुनाथ सिंगे यांनी विशेष अभियान राबवण्यासाठी ‘सी सिक्स्टी’ कमांडोंची पथके दोन पथके या भागात रवाना केली. त्यांच्या सोबतीला पेंढरी पोलिस ठाण्याचे बचाव पथकही या भागात दाखल झाले. गुरुवारी सकाळी अकराच्या सुमारास पोलिस आणि माओवाद्यांमध्ये चकमक उडाली. सुमारे अर्धा तासाच्या या चकमकीत एक महिला माओवादी ठार झाली. पोलिसांचा वाढता दबाव पाहून इतर माओवाद्यांनी जंगलात पळ काढला. मृतक महिलेचे नाव इंदिरा असून ती मूळची कसनसूर उपपोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या कर्रेम गावची रहिवासी आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ती माओवादी चळवळीत सक्रीय होती.

पोलिसांनी घटनास्थळी पंचवीस पिठ्ठु, एक बंदूक आणि इतर साहित्य जप्त केले. कसनसुर दलमचे चाळीस ते पन्नास माओवादी या ठिकाणी जमल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. पेंढरी परिसरात भूसुरूंग पेरून मोठा घातपात घडविण्याचा माओवाद्यांचा प्रयत्न असावा, अशी शक्यता पोलिसांनी व‌र्तविली आहे.

दरवर्षी शहिदी सप्ताहापूर्वी माओवाद्यांकडून ठीकठीकाणी फलक लावणे, रस्त्यांवर झाडे टाकणे असे प्रकार केले जातात. यावेळी मात्र माओवाद्यांना अशा प्रकारची दहशत पसरवता आली नाही. गेल्या अनेक दिवसांपासून माओवाद्यांना जिल्हयात मोठी घटना घडविण्यात यश आलेले नाही. त्यामुळे शहीद सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर या ठिकाणी मोठया घातपाताची तयारी माओवाद्यांनी केल्याच स्पष्ट झाले आहे. पोलिसांच्या सतर्कतेमुळे मोठी घटना घडविण्याचा कट उधळला गेल्याचे पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख यांनी सांगीतले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज