अ‍ॅपशहर

‘डम्पिंग’च्या पैशांचे करायचे काय?

केंद्र सरकारने पाचशे आणि हजाराच्या नोटांवर घातलेल्या बंदीचा फटका माओवादी चळवळीला बसला आहे. पाचशे आणि हजाराच्या नोटा अचानक चलनातून बाद झाल्यामुळे विविध राज्यांतील जंगलांमध्ये ‘डम्प’ करुन ठेवलेल्या कोट्यवधी रुपयांचे काय करायचे, हा प्रश्न माओवादी नेतृत्वाला सतावू लागला आहे.

Maharashtra Times 12 Nov 2016, 4:30 am
महेश तिवारी, गडचिरोली
महाराष्ट्र टाइम्स.कॉम gadchiroli maoists facing problem of dumped currency
‘डम्पिंग’च्या पैशांचे करायचे काय?


केंद्र सरकारने पाचशे आणि हजाराच्या नोटांवर घातलेल्या बंदीचा फटका माओवादी चळवळीला बसला आहे. पाचशे आणि हजाराच्या नोटा अचानक चलनातून बाद झाल्यामुळे विविध राज्यांतील जंगलांमध्ये ‘डम्प’ करुन ठेवलेल्या कोट्यवधी रुपयांचे काय करायचे, हा प्रश्न माओवादी नेतृत्वाला सतावू लागला आहे.

दरम्यान, माओवादी हा पैसा कुठल्या पद्धतीने बाजारात आणतात यावर गुप्तचर यंत्रणा लक्ष ठेवून आहेत.

बंदुकीच्या धाकावर क्रांतीचे तत्त्वज्ञान सांगणाऱ्या माओवादी चळवळीच्या विस्ताराला आर्थिक किनारही आहे. तळातील चळवळीचा प्रमुख आधार असलेल्या दलमपासून ते सर्वोच्च केंद्रीय समिती अशी संरचना असलेल्या माओवादी चळवळीला जंगलाच्या विविध भागात ‘डम्प’ करून ठेवलेल्या पैशांचा मोठा आधार असतो. खंडणीसह इतर मार्गांनी जमा केलेल्या पैशांवर माओवाद्यांचा आर्थिक डोलारा सांभाळावा लागतो. तेंदुपत्ता कत्राटदार, बांधकाम कंत्राटदार, बस्तर आणि झारखंडमधील खाण मालक यांच्याकडून माओवाद्यांना वर्षभरात साधारणपणे दोनशे कोटी रुपये खंडणी स्वरुपात मिळतात. या संपूर्ण रकमेचे व्यवस्थापन माओवाद्यांच्या सर्वोच्च समितीमार्फत केले जाते. माओवाद्यांच्या प्रत्येक दलमचा साधारण खर्च प्रतिवर्ष तीन ते साडेतीन लाख रुपये आहे. त्यात दलमला लागणाऱ्या दैनंदिन गरजेच्या वस्तूंसह औषधोपचार आणि इतर बाबींचा समावेश असतो. अबुझमाडसारख्या माओवाद्यांचे संपूर्ण वर्चस्व असलेल्या भागांतील रस्ते, तलाव आणि विहिरींच्या देखभालीसाठीही काही पैसे खर्च केले जातात.

‘डम्प’ केलेले पैसे बाहेर काढून ते बँकेत जमा करण्यासाठी प्रयत्न होण्याची शक्यता लक्षात घेता सुरक्षा यंत्रणांनी माओवादग्रस्त भागांतील बँकांच्या व्यवहारांवर लक्ष केंद्रित केले आहे. डम्प केलेले पैसे बाहेर न काढल्यास ते निरुपयोगी ठरणार आणि बँकेत जमा करण्याचा प्रयत्न झाला तर सुरक्ष यंत्रणांच्या कारवाईला तोंड द्यावे लागणार, अशा दुहेरी पेचात माओवादी नेतृत्व सापडले आहे. माओवादी समर्थक असलेल्या झारखंडमधील एका पेट्रोलपंप चालकाला गुरुवारी मोठी रक्कम बँकेत जमा करताना अटक करण्यात आली. या पार्श्वभूमीवर आगामी काळात माओवाद्यांवरील आर्थिक पाश आवळले जाण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

‘डम्प’ म्हणजे काय?
खंडणी स्वरुपात एकत्रित झालेली रक्कम एका प्लास्टीकमध्ये गुंडाळून स्टीलच्या डब्यात ठेवली जाते. हा डबा केव्हाही ओळखता येईल अशा एखाद्या ठिकाणी जंगलात किंवा गावाशेजारी पाच ते दहा फूट खड्डा खणून ठेवला जातो. त्यावर माती टाकून जमीन पूर्ववत केली जाते. या जागेची माहिती फारच थोड्या माओवाद्यांना असते. गरज असेल तेव्हा ही रक्कम डंपमधून काढली जाते. या डम्पवर डल्ला मारण्याचा यापूर्वीही प्रयत्न झाला आहे. गेल्या वर्षी पोलिसांपुढे आत्मसमर्पण करताना तेलंगणमधील दोन बड्या माओवादी नेत्यांनी ‘डम्प’ची रक्कम सोबत नेली होती. तेव्हापासून माओवाद्यांनी ‘डम्प’ची सुरक्षा अधिक कडक केल्याचे बोलले जाते.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज