अ‍ॅपशहर

पाणी तरी आणायचे कुठून?

पुलगाव येथील दारूगोळा भांडाराच्या स्फोटानंतर या परिसरातील गावकऱ्यांचे जीवन किती धोक्याचे आहे, याचा प्रत्यय आला. स्फोटांच्या हादऱ्यांमुळे झालेले गावकऱ्यांचे हाल प्रसारमाध्यमांनी जगापुढे मांडले. वर्षभरात बरेच काही स्थ‌िरस्थावर झाले. परंतु, दारूगोळा भांडाराच्या स्थापनेपासून या भागातील शेतकरी तोंड देत असलेल्या समस्येवर तोडगा केव्हा निघणार, असा प्रश्न विचारला जात आहे.

Maharashtra Times 29 May 2017, 4:30 am
एकनाथ चौधरी, वर्धा
महाराष्ट्र टाइम्स.कॉम wardha farmers near pulgaon cad facing water problems due to security restrictions
पाणी तरी आणायचे कुठून?


पुलगाव येथील दारूगोळा भांडाराच्या स्फोटानंतर या परिसरातील गावकऱ्यांचे जीवन किती धोक्याचे आहे, याचा प्रत्यय आला. स्फोटांच्या हादऱ्यांमुळे झालेले गावकऱ्यांचे हाल प्रसारमाध्यमांनी जगापुढे मांडले. वर्षभरात बरेच काही स्थ‌िरस्थावर झाले. परंतु, दारूगोळा भांडाराच्या स्थापनेपासून या भागातील शेतकरी तोंड देत असलेल्या समस्येवर तोडगा केव्हा निघणार, असा प्रश्न विचारला जात आहे.

पुलगाव दारूगोळा भांडारालगत १२ गावे आहेत. यापैकी मुरदगाव, आगरगाव, यसगाव, नागझरी व पिंपरी या गावांना दारूगोळा भांडाराला लागलेल्या आगीची सर्वाधिक झळ पोहोचली. शेती हेच या गावांमधील बहुतांश नागरिकांच्या उत्पन्नाचे मुख्य साधन आहे. मात्र, पाण्याची कमतरता आणि शेतमजुरांची अनुपलब्धता यामुळे स्थानिक शेतकऱ्यांपुढे नवे संकट निर्माण झाले आहे. आगरगाव आणि पिपरी या गावाच्या जवळून निम्न वर्धा धरणाचा कालवा गेला आहे. मात्र, या कालव्याला फारसे पाणी नसते. आणि असले तरी परिसर प्रतिबंधित क्षेत्रात येत असल्यामुळे या ठ‌िकाणी कुठलेही खोदकाम करता येत नाही. परिणामी, कालवा असूनही त्याचा उपयोग शेतीसाठी होत नाही. जवळपास प्रत्येक शेतामध्ये विहिरी आहेत. पण त्यांना पाणी नाही. विहिरी आणखी खोल करण्यासाठी ब्लास्टिंग करावे लागते. पण सुरक्षेच्या कारणास्तव ब्लास्टिंग करण्याची परवानगी येथील शेतकऱ्यांना मिळत नाही. पाण्याअभावी वाळलेली पीके अनेक शेतांमध्ये दिसून येतात. परिसरातील शेतीच्या पाण्याच्या समस्येवर कायमचा उपाय शोधावा, अशी मागणी आता शेतकरी करू लागले आहेत.

गेल्या वर्षीच्या स्फोटांनंतर ज्यांची गावांत शेती नाही, अशा अनेक लोकांनी अन्यत्र स्थलांतर केले. यात बहुतांशी शेतमजुरांचा समावेश होता. त्यामुळे पुलगाव दारूगोळा भांडाराच्या परिसरातील गावांमध्ये शेतीच्या कामांसाठी यावर्षी मजूरच मिळाले नाहीत. स्वाभाविकच अधिक पैसे देऊन अन्य भागांतून मजूर आणावे लागले. त्याचा आर्थिक फटका शेतकऱ्यांना बसला.

गिट्टी खदानीला परवानगी कशी?
आगरगाव आणि पिपरी गावांजवळ गिट्टी खदान आहे. या खदानीमधून सातत्याने उत्खनन चालते. या ठिकाणी मात्र बिनदिक्कतपणे ब्लास्ट केले जातात, असे गावकरी सांगतात. परिसरातील शेतांमधील विहिरींना ब्लास्टिंगची परवानगी नसेल तर या खदानीमध्ये ब्लास्टिंग कसे चालते, हा येथील सामान्य गावकऱ्याला पडलेला प्रश्न अनुत्तरित राहतो. देशाच्या संरक्षणाच्या दृष्टीने मध्यवर्ती दारूगोळा भांडार हे संवेदनशील स्थान आहे. अशा स्थितीत दारूगोळा भांडारापासून केवळ अर्धा किलोमीटर अंतरावर खदान सुरू करण्यास परवानगी कशी मिळाली? हा प्रश्न सहजच निर्माण होतो.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज