म. टा. प्रतिनिधी, वैजापूर
विवाहबाह्य संबंधात अडसर ठरत असल्यामुळे पत्नी व प्रियकराने कट रचून पतीचा खून केल्याचे तिडी (ता. वैजापूर) शिवारातील अंधाच्या खुनप्रकरणाच्या तपासात निष्पन्न झाले आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केवळ सहा तासांत या प्रकरणातील संशयित आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. शेख यासीन शेख वजीर (वय ३३, रा. कसाबखेडा, ता. खुलताबाद), असे त्याचे नाव आहे.
कसाबखेडा येथील सय्यद अशरफ सय्यद नूर (वय ४०) यांचा लोखंडी गजाने वार करून मृतदेह पेट्रोल टाकून जाळल्याची घटना गुरुवारी वैजापूर तालुक्यातील तिडी सवंदगाव रस्त्यावर गट क्रमांक २४ मध्ये रघुनाथ डुकरे यांच्या शेतात उघडकीस आली होती. सय्यद अशरफ हे अंध होते व मागील तीन दिवसांपासून जांभाळा येथे जमातसाठी गेल्यानंतर गायब झाले होते. त्यानंतर त्यांचा अर्धवट जळालेला मृतदेह आढळून आला होता. पोलिसांनी ओळख पटवण्यासाठी मृताची माहिती फोटोसह सोशल मिडियावर व्हायरल केली. पोलिस पाटील जयश्री डुकरे यांच्या फिर्यादीनंतर वैजापूर पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध खुनाचा गुन्हा नोंदवण्यात आला. खुन्याचा तपास लावण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक भागवत कुंदे, पोलिस उपनिरीक्षक भगतसिंग दुलत यांच्या पथकाने तातडीने तपासाची चक्रे फिरवली व गोपनीय माहितीच्या आधारे कसाबखेडा येथील शेख यासीन शेख वजीर या संशयितास ताब्यात घेतले. आधी उडवाउडवीची उत्तरे देणाऱ्या शेख यासीन याने अधिक चौकशीत खुनाची कबुली दिली. पोलिस अधीक्षक मोक्षदा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे निरीक्षक भागवत फुंदे, भगतसिंग दुलत, सहायक फौजदार सय्यद झिया, श्रीमंत भालेराव, रतन वारे, सुनील खरात, रमेश अपसनवाड, विनोद तांगडे, शेख नदीम, योगेश तरमाळे यांनी ही कारवाई केली.
\Bदुचाकीवरून आणले \B
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत सय्यद अशरफ यांची पत्नी व शेख यासीन याचे मागील पाच ते सहा वर्षांपासून प्रेमसंबंध होते. या संबधाआड येणाऱ्या पतीचा काटा काढण्याचा कट शेख यासीन व अशरफ यांच्या पत्नीने रचला. त्यानुसार शेख यासीन याने अशरफ यास गुरुवारी (२० फेब्रुवारी) त्याच्या दुचाकीवर (एम एच २१ जी ०१५६) बसवून तिडी शिवारात आणले. तेते लोखंडी रॉडने मारून खून केला व पुरावा नष्ट करण्यासाठी पेट्रोल टाकून पेटवून दिले. पोलिसांनी गुह्यात वापरलेली स्प्लेंडर मोटारसायकल, हेल्मेट, मोबाइल, पेट्रोलची बाटली, लोखंडी गज घेऊन जाण्यासाठी वापरलेली वायरची पिशवी हस्तगत केली आहे.