अ‍ॅपशहर

​ अच्छे नव्हे, सर्वात बुरे दिन

सत्ता मिळविण्यासाठी अनेक फसव्या घोषणा करत असलेल्या भाजप सरकारने सत्तेत आल्यानंतर कुठली कामे केली नाही. उलट विविध जाचक अटी नियमे लादून हे सरकार शेतकरी, व्यापारी आणि विद्यार्थ्यांच्या मुळावर बसले आहे. अच्छे दिन तर कधी आलेच नाहीत, उलट स्वातंत्र्यानंतरचे सर्वात बुरे दिन आल्याची टीका माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गुरुवारी जिंतूर येथील सभेत केली.

Maharashtra Times 17 Nov 2017, 3:33 am
परभणी - सत्ता मिळविण्यासाठी अनेक फसव्या घोषणा करत असलेल्या भाजप सरकारने सत्तेत आल्यानंतर कुठली कामे केली नाही. उलट विविध जाचक अटी नियमे लादून हे सरकार शेतकरी, व्यापारी आणि विद्यार्थ्यांच्या मुळावर बसले आहे. अच्छे दिन तर कधी आलेच नाहीत, उलट स्वातंत्र्यानंतरचे सर्वात बुरे दिन आल्याची टीका माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गुरुवारी जिंतूर येथील सभेत केली.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम ajit pawar attack bjp
​ अच्छे नव्हे, सर्वात बुरे दिन

राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने शेतकरी वर्गाच्या विविध मागण्यांसाठी जिंतूर तहसीलवर महामोर्चा काढला. या मोर्चाचे रुपांतर सभेत झाले. यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर जिल्हाध्यक्ष तथा आमदार बाबाजानी दुराणी, विजय भांबळे, मधुसूदन केंद्रे, प्रकाश सोळंके, गणेशराव दुधगावकर, फौजिया खान, सुरेश जाधव, उज्वल राठोड, रामराव वडकुते, सारंगधर महाराज, भावना नखाते, बाळासाहेब जामकर आदी उपस्थित होते.
यावेळी अजित पवार म्हणाले, ‘स्वतःच्या हक्कासाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करीत असलेल्यांवर पोलिस गोळ्या घालत आहेत, सरकार मात्र बघ्याची भूमिका घेते. नोटबंदीमुळे काळा पैसा बाहेर येईल, असा कांगावा या सरकारने केला होता. प्रत्यक्षात मात्र काळा पैसा बाहेर आलाच नाही, उलट सर्वसामान्यांचे अतोनात नुकसान झाले. बँकेतून पैसा मिळण्याऐवजी उद्योगपतींना कर्ज देण्यात आले. सध्या राज्यातील कोणत्याही जिल्ह्यात रस्ते चांगले नाहीत. त्याची अवस्था बिकट झाली आहे. रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता, हे कळायला मार्ग नाही.’

सध्या रब्बी हंगाम सुरू असून वीज नसल्याने मोठे नुकसान होत आहे. शिक्षण महागले, धनगर आणि मुस्लिम समाजाला आरक्षण मिळाले नाही. राज्यात कोणीही सुखी नाही मग हे कसले अच्छे दिन, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. सध्याचे सरकार फोडाफोडीचे राजकारण करून भ्रष्टाचारी लोकांना पक्षात घेत आहे. ज्यांनी जिल्हा बँक खाल्ली अशांना पक्षात घेतल्याची टीका देखील माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकरांचे नाव न घेता अजित पवार यांनी यावेळी केली.
दरम्यान, अधिवेशनापूर्वी कर्ज माफी झाली पाहिजे, अन्यथा एक डिसेंबर पासून राज्यात हल्लाबोल मोर्चे काढण्यात येतील आणि या मोर्चांचा शेवट नागपूर अधिवेशन बंद पाडून करण्यात येईल, असा इशारा देखील यावेळी पवार यांनी दिला. सत्तेची गोड फळे चाखणारी शिवसेनेला बळीराजाचा फुकट पुळका आणत आहे. पटत नसेल तर सरकारमध्ये बसू नका, लोकांना मूर्ख बनवण्याचा खेळ बंद करा अन्यथा येत्या निवडणुकीत मतदार भाजप आणि शिवसेनेला जागा दाखवेल, असेही पवार शेवटी म्हणाले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज