अ‍ॅपशहर

आमदारावर विनयभंगाचा गुन्हा, शिवसैनिक खवळले; बोरनारेंच्या समर्थनार्थ 'सेना' रस्त्यावर

Ramesh Bornare : आमदार रमेश पाटील बोरनारे यांच्यावर दाखल झालेला विनयभंगाचा गुन्हा रद्द करण्यात यावा, या मागणीसाठी शिवसेनेतर्फे गुरुवारी वैजापूर शहरातून भव्य मोर्चा काढण्यात आला.

Edited byअक्षय आढाव | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 17 Mar 2022, 6:41 pm
औरंगाबाद : वैजापूर तालुक्याचे शिवसेना आमदार रमेश पाटील बोरणारे यांच्याविरोधात सूडबुद्धीने आणि राजकीय दबावाखाली पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल केलाय. हा गुन्हा रद्द करण्यात यावा, अशी मागणी करत शिवसेनेतर्फे गुरुवारी वैजापूर शहरातून भव्य मोर्चा काढण्यात आला. यावेळी वैजापूर तालुकाभरातून शिवसेना कार्यकर्त्यांनी मोर्चात सहभाग नोंदवल्याचे पाहायला मिळाले.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम Aurangabad vaijapur Shivsena Morcha support to MLA Ramesh bornare demanded crime of molestation should be abolished
रमेश बोरनारे (शिवसेना आमदार)


नात्यातील एका महिलेला मारहाण आणि विनयभंग केल्याच्या आरोपाप्रकरणी आमदार रमेश बोरणारे यांच्याविरोधात वैजापूर पोलिसात गुन्हा दाखल आहे. बोरणारे यांच्यावर सूडबुद्धीने आणि राजकीय दबावाखाली पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल केल्याचा आरोप करत शिवसेनेतर्फे गुरुवारी वैजापूर शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून शिवसेनेचे जेष्ठ नेते तथा माजी नगराध्यक्ष साबेर खान यांच्या नेतृत्वाखाली भव्य मोर्चा काढण्यात आला. शहरातील मुख्य मार्गावरून हा मोर्चा उपविभागीय अधिकारी कार्यालयावर पोहचला. त्यानंतर उपविभागीय अधिकारी माणिक आहेर यांना निवेदन देण्यात आले.

राजकीय दबावाखाली पोलिसांनी गुन्हा दाखल केल्याचा आरोप

यावेळी उपविभागीय अधिकारी कार्यालयावर मोर्चा पोहचताच शिवसेना नेत्यांनी आपल्या भाषणातून आमदार बोरणारेंना अडकविण्यात आल्याचा आरोप केला. कौटुंबिक वादाला राजकीय स्वरुप देण्याचा प्रयत्न भाजप कार्यकर्ते करीत असून, सूडबुद्धीने राजकीय दबावाखाली आमदार बोरणारे यांच्याविरोधात विनयभंगाचा खोटा गुन्हा दाखल करण्यात आल्याचा आरोपही सेना नेत्यांनी केला. तसंच बोरणारे यांच्याविरोधातील गुन्हा रद्द न झाल्यास शनिवारी वैजापूर शहर बंदचा इशारा सुद्धा यावेळी शिवसेनेतर्फे देण्यात आला.

काय आहे नेमकं प्रकरण?

आमदार बोरणारे यांनी मारहाण केल्याचा आरोप करत त्यांच्याच नात्यातील एका महिलेने वैजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. आपला विनयभंग झाला असल्याचा आरोप सुध्दा या महिलेने केला होता. त्यानंतर पोलिसांनी महिलेचा पुरवणी जबाब नोंदवत बोरनारे यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल केला.
लेखकाबद्दल
अक्षय आढाव
अक्षय आढाव, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये सिनिअर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहेत | याआधी टीव्ही ९ मराठी वेबसाईटसाठी काम केलंय. डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ५ वर्षांचा अनुभव | राजकीय, सामाजिक आणि विश्लेषणात्मक बातम्यांच्या लिखाणाची विशेष आवड.... आणखी वाचा

महत्वाचे लेख