म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
वंचित बहुजन आघाडीने मध्य मतदारसंघात अमित भुईगळ आणि पश्चिम मतदारसंघात संदीप शिरसाठ यांना उमेदवारी दिली आहे. तर पूर्व मतदारसंघात एमआयएमचे डॉ. गफ्फार कादरी यांना पाठिंबा दिला आहे. त्यामुळे वंचितच्या इच्छुक उमेदवारांनी नाराजी मांडत अपक्ष अर्ज भरला आहे. तर कादरी यांचा प्रचार करणार नसल्याची भूमिका पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी घेतली आहे.
वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएमची आघाडी तुटल्यानंतर दोन्ही पक्षांची मतांची बेरीज करताना दमछाक सुरू झाली आहे. दोन्ही पक्षात बंडखोरी झाल्याने प्रचाराचे नियोजन करण्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पूर्व मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीने डॉ. गफ्फार कादरी यांना पाठिंबा जाहीर केला आहे. तसेच वंचितच्या अधिकृत उमेदवारांच्या यादीत कादरी यांचे नाव आहे. परिणामी, पूर्व मतदारसंघासाठी मुलाखती दिलेल्या वंचितच्या इच्छुकांची निराशा झाली आहे. उमेदवारीसाठी शेवटच्या दिवसापर्यंत इच्छुकांनी प्रयत्न केले. मात्र, कादरी यांना पाठिंबा असल्याच्या भूमिकेवर पक्ष ठाम राहिला. त्यामुळे भारिप बहुजन महासंघाचे शहराध्यक्ष उद्धव बनसोडे यांनी पूर्वमधून अपक्ष उमेदवारी अर्ज भरला. आगामी महापालिका निवडणुकीसाठी वंचितने तीन विधानसभा मतदारसंघ लढवणे अपेक्षित होते. त्यामुळे शहरात पक्षाचा दबदबा वाढला असता, असे पदाधिकाऱ्यांनी सांगितले. कादरी यांना वंचितने पाठिंबा जाहीर केला असला तरी पदाधिकारी व कार्यकर्ते नाराज असल्याने पेच वाढला आहे. नाराजांना प्रचारात सहभागी करून घेण्याचे कादरी यांच्यासमोर आव्हान आहे.