अ‍ॅपशहर

बहुजनांच्या ऐक्याचा हुंकार

संविधानाच्या सन्मानार्थ तसेच बहुजनांच्या प्रलंबित मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी उस्मानाबाद शहरात मंगळवारी बहुजनांचा मूक मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात जिल्ह्यातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. दहा ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते मागण्यांचे एक निवेदन जिल्हा प्रशासनाला देण्यात आले.

Maharashtra Times 18 Jan 2017, 1:00 am
उस्मानाबादमध्ये विराट मोर्चा
महाराष्ट्र टाइम्स.कॉम bahujan kranti march in osmanabad and parbhani
बहुजनांच्या ऐक्याचा हुंकार


म. टा. प्रतिनिधी, उस्मानाबाद

संविधानाच्या सन्मानार्थ तसेच बहुजनांच्या प्रलंबित मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी उस्मानाबाद शहरात मंगळवारी बहुजनांचा मूक मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात जिल्ह्यातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. दहा ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते मागण्यांचे एक निवेदन जिल्हा प्रशासनाला देण्यात आले.
बहुजन समाजातील अनुसुचित जाती-जमाती, भटके विमुक्त जाती-जमाती, ओबीसी, मराठा, बलुतेदार, मुस्लिम, ख्रिश्चन, बौद्ध, लिंगायत, सोनार, जैन यांसह विविध समाज घटकांमधील नागरिक या मोर्चामध्ये सहभागी झाले होते. या मोर्चात भारत डोलारे, सुनील काळे, मुकेश नायगावकर, दत्ता बंडगर, धनंजय शिंगाडे, अनिल अजमेरा, रवी कोरे, डॉ. गोविंद कोकाटे, धनंजय राऊत, धनंजय आनंदे अग्रभागी होती.
लेडीज क्लबपासून काढण्यात आलेला हा मोर्चा आंबेडकर पुतळा, शिवाजी चौक मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचला. मोर्चा मार्गावर उस्मानाबाद जिल्हा केमिस्ट अॅण्ड ड्रगिस्ट असोसिएशनच्या वतीने पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती.
या मोर्चा दरम्यान शिस्तीचे काटेकोर पालन करण्यात आले. तसेच मोर्चासाठी डॉक्टरांचे पथक व रुग्णवाहिका सज्ज होती. मोर्चाचे भव्य स्वरुप लक्षात घेऊन पोलीस विभागाने अतिरिक्त पोलीस अधीक्षक डॉ. दीपाली घाटगे यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलिस बंदोबस्त ठेवला होता. इतकेच नव्हे, तर बॉम्बशोध पथकाने जिल्हाधिकारी कार्यालय परिसराची कसून तपासणी केली होती.
विविध मागण्यांचे निवेदन दहा ज्येष्ठ नागरिकांनी मोर्चेकऱ्यांच्या वतीने जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांना दिले.

क्रांती मोर्चाला परभणीमध्ये प्रतिसाद
परभणी : बहुजनांच्या विविध मागण्यांसाठी जिल्हाभरातील बहुजन समाजाने मंगळवारी परभणी जिल्हा कचेरीवर मोर्चा काढला. जिंतूर रोडवरील नूतन विद्यालयाच्या मैदानावरून निघालेला हा मोर्चा शहरातील मुख्य मार्गाने काढण्यात आला. या वेळी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले. तत्पुर्वी, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोरील मैदानावर मोर्चाचे छोटेखानी सभेत रूपांतर झाले होते.
सदर मोर्चात लाल, पिवळे, हिरवे, निळे, केशरी अशा सर्व रंगांच्या झेंड्यांसह सहभागी झालेल्या आंदोलकांमुळे हा मार्ग फुलून गेला होता. मोर्चाच्या शेवटी मोर्चेकरांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. ‘संविधानाने बहुजन समाजाला व अल्पसंख्याकांना दिलेल्या घटनात्मक अधिकाराची पायमल्ली होत आहे. या समूहांना त्यांच्या हक्कापासून वंचित ठेवण्यात येत आहे. धनगर, आदिवासी, मराठा, ओबीसी, मुस्लिम या जाती समूहांना आरक्षण देण्याच्या सरकारच्या दुटप्पी धोरणामुळे या जातींमध्ये संघर्ष निर्माण होऊन द्वेष पसरत आहे. छत्रपती शिवाजी महाराज, शाहू, फुले, आंबेडकरांच्या पुरोगामी महाराष्ट्राला ही न शोभणारी बाब आहे. विविध समाजाचे मोर्चे निघूनही त्यांना न्याय देणासाठी सरकार उदासीन दिसून येते. सरकारच्या या भूमिकेमुळेच बहुजन क्रांती मोर्चा हा सर्व समाजाच्या न्याय्य मागण्यांसाठी काढण्यात आला आहे,’ असे या निवेदनामध्ये म्हटले आहे. या निवेदनामध्ये ३५ मागण्या मांडल्या आहेत.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज