अ‍ॅपशहर

१०० रुपयांसाठी भावाला पेट्रोल ओतून पेटवलं

२०० रुपयाऐवजी केवळ १०० रुपये दिले म्हणून एकाला सावत्र भावाने झोपेत असताना अंगावर पेट्रोल टाकून पेटवून ठार मारण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार शनिवारी (आठ फेब्रुवारी) रात्री बनेवाडी भागात घडला. याप्रकरणी आरोपीला वेदांतनगर पोलिसांनी अटक केली असून, वेदांतनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 10 Feb 2020, 11:37 am
म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
महाराष्ट्र टाइम्स.कॉम alive


२०० रुपयाऐवजी केवळ १०० रुपये दिले म्हणून एकाला सावत्र भावाने झोपेत असताना अंगावर पेट्रोल टाकून पेटवून ठार मारण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार शनिवारी (आठ फेब्रुवारी) रात्री बनेवाडी भागात घडला. याप्रकरणी आरोपीला वेदांतनगर पोलिसांनी अटक केली असून, वेदांतनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बनेवाडी भागात वरूण मुकुंद कुमावत (वय ३२) हा मिस्त्री काम करणारा मजूर राहतो. तो आपल्या सावत्र भावाबरोबर बनेवाडी भागात रहातो. शनिवारी सायंकाळी साडेसात वाजता वरूण कामावरून घरी परतला होता. यावेळी त्याचा भाऊ आरोपी सोमेश कुमावत याने त्याच्याकडे २०० रुपयाची मागणी केली. यावरून त्यांच्यात वाद झाला. यावेळी वरुणने सोमेशला शंभर रुपये देऊन वाद मिटविला व तो झोपी गेला.

वादादरम्यान सोमेशने त्याला ठार मारण्याची धमकी दिली होती. झोपेत असलेल्या वरूणच्या अंगावर सोमेशने पेट्रोल टाकून त्याला पेटवून दिले; तसेच घराला देखील आग लावून बाहेरून कडी लावली व तो निघून गेला. आगीमुळे जागा झालेल्या वरुणने आरडाओरडा केल्यानंतर शेजाऱ्यांनी धाव घेत दरवाजा उघडला. वरुणचा आतेभाऊ योगेशने त्याच्या अंगावरील आग विझवली. वेदांतनगर पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. वरुणला घाटी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. वरुण हा अंदाजे ६० टक्के जळाला आहे. त्याचा चेहरा आणि छाती भाजली गेली आहे. याप्रकरणी वेदांतनगर पोलिस ठाण्यात खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी सोमेशवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याला अटक करण्यात आली आहे.

आरोपीला शुक्रवारपर्यंत कोठडी

या प्रकरणातील आरोपी सोमेश मुकुंदा कुमावत याला अटक करून रविवारी (नऊ फेब्रुवारी) न्यायालयात हजर करण्यात आले. आरोपीने त्याच्या भावाला पेट्रोल टाकून जिवे मारण्याचा प्रयत्न केला असून, त्यामागे आरोपीचा नेमका कोणता उद्देश होता, आरोपीचे कोणी साथीदार आहेत का आदी बाबींचा तपास करणे बाकी आहे. त्याचवेळी आरोपीकडे गुन्ह्याबाबत अधिक चौकशी करून पुरावे हस्तगत करावयाचे आहे. त्यामुळे आरोपीला सात दिवस पोलिस कोठडी देण्याची विनंती सहाय्यक सरकारी वकील जे. डी. राठोड यांनी न्यायालयात केली. ही विनंती मान्य करून प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एस. पी. पांडव यांनी आरोपीला शुक्रवारपर्यंत (१४ फेब्रुवारी) पोलिस कोठडी ठेवण्याचे आदेश दिले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज