अ‍ॅपशहर

सीताफळाच्या बिया थेट फुफ्फुसात; घाटीत दोन आठवड्यात तीन केस

सीताफळाच्या बिया थेट श्वासनलिकेत किंवा फुफ्फुसांत अडकून जीव टांगणीला लागण्याचा प्रकार लहान मुलांच्या बाबतीत होत असून, घाटीत गेल्या दोन आठवड्यांत किमान तीन केसेस या प्रकारच्या झाल्या आहेत.

Authored byम. टा. प्रतिनिधी | महाराष्ट्र टाइम्स 4 Nov 2021, 1:14 pm
म. टा. प्रतिनिधी, औरंगाबादः सीताफळाच्या बिया थेट श्वासनलिकेत किंवा फुफ्फुसांत अडकून जीव टांगणीला लागण्याचा प्रकार लहान मुलांच्या बाबतीत होत असून, घाटीत गेल्या दोन आठवड्यांत किमान तीन केसेस या प्रकारच्या झाल्या आहेत. त्यामुळे सीताफळचा आनंद घेताना लहान मुलांच्या बाबतीत विशेष काळजी घेणे गरजेचे असून, अशी बी जर काही तासांत काढल्या गेली नाही तर जिवाला धोका होऊ शकतो, असा सावधगिरीचा सल्लाही तज्ज्ञांनी दिला आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम custard apple seeds directly into the lungs
सीताफळाच्या बिया थेट फुफ्फुसात; घाटीत दोन आठवड्यात तीन केस


रसाळ, मधूर आणि 'क' जीवनसत्वाने भरपूर असलेल्या सीताफळांचा मोसम सुरू आहे. दौलताबाद-खुलताबादच्या सीताफळांची अवीट गोटी सर्वश्रुत आहे. साहजिकच आबालवृद्ध सीताफळावर ताव मारत नसतील तर नवलच. मात्र, हा अवीट गोडीचा आनंद घेताना मधुनच सीताफळाची बी थेट श्वासनलिकेत; तसेच फुफ्फुसात अडकून जीव टांगणीचा लागण्याचा प्रकार मुलांच्या बाबतीत होत आहे. अशा किमान तीन केस गेल्या दोन आठवड्यांत घाटीत आढळून आल्या आहेत. चिंचोका अडकण्याचे प्रकारही होत असल्याचे घाटीच्या केसेसमधून स्पष्ट झाले आहे. घाटीतच नव्हे, तर खासगी रुग्णालयांमध्येही या प्रकारच्या केसेस दिसून येत आहेत. अशा प्रकारांमध्ये नेमके काय झाले आहे, हेच पालकांना लवकर कळत नाही. असा प्रकार लहान मुलांच्या बाबतीत झाला, तर मुलांना सांगता येत नाही आणि त्यामुळे मोठा पेचप्रसंग उभा राहू शकतो, असेही यानिमित्ताने समोर येत आहे.

''ब्राँकोस्कोपी'ची गरज'

'अशा केसेसमध्ये तातडीने संबंधित रुग्णावर दुर्बिणीद्वारे (ब्राँकोस्कोपी) शस्त्रक्रिया करावी लागू शकते. मात्र, रुग्णालयात पोहचण्यास उशीर झाला, तर जिवाला धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे सीताफळ खाताना काळजी घेणे खूप गरजेचे आहे,' असे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील कान-नाक-घसा विभागाचे प्रमुख डॉ. सुनील देशमुख यांनी 'मटा'शी बोलताना सांगितले.

सीताफळाची बी किंवा चिंचोका अडकण्याचे बहुतांश प्रकार दोन वर्षांपर्यंतच्या मुलांमध्ये दिसून येतात. अशा वेळी दम लागणे, श्वास घेण्यास त्रास होणे, रुग्ण अस्वस्थ होणे, लहान मूल असेल, तर मोठमोठ्याने रडणे, अशी लक्षणे दिसून येतात. असा प्रकार चुकून झालाच, तर मुलांना सांगता येत नाही म्हणूनच पालकांचे लक्ष असणे खूप आवश्यक आहे.

- डॉ. सुनील देशमुख, कान-नाक-घसा विभागप्रमुख, घाटी

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज