अ‍ॅपशहर

घरपट्टीप्रश्नी लवकरच निर्णय

घरपट्टीप्रश्नी परभणीकरांच्या हिताचा निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री व संपर्कमंत्री बबनराव लोणीकर यांनी दिले आहे.

Maharashtra Times 13 Sep 2017, 3:07 am
घरपट्टीप्रश्नी लवकरच निर्णय
महाराष्ट्र टाइम्स.कॉम decision on parbhani property tax soon lonikar
घरपट्टीप्रश्नी लवकरच निर्णय

पाणीपुरवठा मंत्री लोणीकरांचे परभणीकरांना आश्वासन
म. टा. वृत्तसेवा, परभणी
परभणी महानगरपालिकेने शहरातील नागरिकांची घरपट्टी व इतर मालमत्ताकरात अचानक अवाजवी वाढ केली आहे. या प्रश्नी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून शासनस्तरावर परभणीकरांच्या हिताचा निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री व संपर्कमंत्री बबनराव लोणीकर यांनी भाजप जिल्हाध्यक्ष आनंद भरोसे यांच्या नेतृत्वाखाली मनपा सदस्य व भाजपा पदाधिकारी यांना दिले आहे.
शासन नियमाप्रमाणे दर पंचवार्षिक योजनेला फेरआढावा होऊन कर वाढ व्हायला हवी. मात्र, गेल्या १७ वर्षांपासून परभणी शहरात प्रशासनाने फेरआढावा न केल्याने शहरामध्ये वसाहती वाढल्या. जुन्या व वाढलेल्या नवीन वसाहती यांना कोणत्याही नागरी सुविधा मिळालेल्या नाहीत. प्रशासनातील नगररचना विभाग व करवसुली विभाग यांच्यात समन्वय नसल्यामुळे त्याचा त्रास सामान्य नागरिकांना होत आहे. नागरिकांना मिळालेल्या नोटिसांनुसार प्रस्तावित घरपट्टीत सध्याच्या घरपट्टीपेक्षा ४० ते ५० पटींनी वाढ झाली आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात घरपट्टी वसूल करायची असेल तर परभणी शहरातील जनतेला मुंबई, पुणे शहरांच्या दर्जाच्या सुविधा देण्यात याव्यात. अद्यावत भाजीमंडई, वाहनतळ व्यवस्था, वाचनालय, रंगमंदिर, सुरळीत पाणीपुरवठा, विद्युत दिवे, स्वच्छता, रस्ते, सार्वजनिक शौचालय अशा प्रकारच्या सुविधा जर मनपा प्रशासन पुरवत नसेल तर आता नागरिकांवर लादण्यात आलेली वाढीव घरपट्टी व मालमत्ता कराचा आर्थिक बोजा रद्द करून पूर्वीप्रमाणे घरपट्टी लावावी, अशी मागणी एका निवदेनाद्वारे भाजप पदाधिकाऱ्यांनी लोणीकर यांच्याकडे केली आहे. त्यावर लोणीकर यांनी लवकरच या प्रश्नी मुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करून शासनस्तरावरून परभणीकरांच्या हिताचा निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन दिले.
यावेळी जिल्हाध्यक्ष आनंद भरोसे, संघटन सरचिटणीस संजय शेळके, मनपा गटनेते मंगला मुद्गलकर, मनपा सदस्य अशोक डहाळे, नंदकुमार दरक, सुनील देशमुख, विद्या पाटील, प्रशांत सांगळे, रितेश जैन, विजय दराडे,विजय गायकवाड, दिनेश नरवाडकर, नितीन वट्टमवार, रामदास पवार, संजय कुलकर्णी, सुधीर कांबळे, पवन घाडगे, अॅड. गणेश जाधव, प्रविण गायकवाड, विशाल बोबडे आदी भाजप पदाधिकारी उपस्थित होते.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज