म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे राज्य सेवा पूर्व परीक्षांची घोषणा सोमवारी केली. गट अ व बमधील १५ पदांच्या एकूण २०० जागांवर भरती केली जाणार आहे. यामध्ये सर्वाधिक ७३ जागा नायब तहसीलदाराच्या आहेत. गेल्यावर्षी ३४२ जागांसाठी प्रक्रिया झाली. यंदा पदांची संख्या १४२ने कमी झाली. परीक्षांची तयारी करणाऱ्यांची संख्या वाढली आणि पदभरतीचा आकडा कमी झाला.
जाहिरातीनुसार, सहायक राज्यकर आयुक्त १० पदे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, गट विकास अधिकारी सात, सहायक आयुक्त, प्रकल्प अधिकारी एक, उद्योग उपसंचालक, तांत्रिक एक, सहायक संचालक, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता दोन, अशी वर्ग एकमधील २१ पदांची भरती केली जाईल. वर्ग ब मधील उपशिक्षणाधिकारी, शिक्षण सेवा २५, कक्ष अधिकारी २५, सहायक गट विकास अधिकारी १२, सहायक निबंधक सहकारी संस्था १९, उपअधीक्षक भूमी अभिलेख सहा, उपाधीक्षक राज्य उत्पादन शुल्क विभाग एक, सहायक प्रकल्प अधिकारी, संशोधन अधिकारी तत्सम ११ आणि नायब तहसीलदार ७३ पदांची भरती केली जाईल. या पदांसाठीची पूर्व परीक्षा पाच एप्रिल रोजी राज्यातील ३७ केंद्रावर घेण्यात येईल. यासाठी २३ डिसेंबर ते १३ जानेवारी या कालावधीत ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येतील. पूर्व परीक्षेद्वारे मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची मुख्य परीक्षा दोन, तीन व चार ऑगस्ट २०२० रोजी होईल, अशी शक्यता आहे. यासंदर्भातील सविस्तर माहिती https://mahampsc.mahaonline.gov.in आणि www.mpsc.in या वेबसाइटवर उपलब्ध आहे.
\Bस्पर्धक अधिक जागा कमी\B
यंदा सर्वाधिक ७३ जागा नायब तहसीलदाराच्या असल्या तरी गेल्या वर्षीच्या तुलनेत जागा कमी झाल्या आहेत. गतवर्षी ११३ जागा होत्या. उपाधीक्षक राज्य उत्पादन शुल्क विभाग, प्रकल्प अधिकारी या पदासाठी एकच जागा आहे. जागा कमी व इच्छुक जास्त असल्याने स्पर्धा वाढणार आहे.
स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे जास्त व जागांची संख्या कमी होत आहे. अनेक शासकीय विभागांत रिक्त जागांचा आकडा मोठा असल्याचे सांगण्यात येते. त्याचवेळी जागा भरतीच्या जाहिराती प्रकाशित करताना याचा विचार केला जातो की नाही अशी शंका येते.
-मिलिंद सावळे, विद्यार्थी