अ‍ॅपशहर

नगरसेवकावर तरुणाचा प्राणघातक चाकूहल्ला

गल्लीत गोंधळ घालणाऱ्या तरुणांना समजावून सांगितल्याचा राग आल्याने हनुमाननगर येथील शिवसेना नगरसेवक आत्माराव पवार व तरुणांमध्ये सोमवारी रात्री हाणामारी झाली होती. त्याचा राग आल्याने संशयित आरोपीने मंगळवारी दुपारी नगरसेवक आत्माराव पवार यांच्यावर चाकुहल्ला केला.

Maharashtra Times 31 Oct 2018, 4:00 am
म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
महाराष्ट्र टाइम्स.कॉम crime1


गल्लीत गोंधळ घालणाऱ्या तरुणांना समजावून सांगितल्याचा राग आल्याने हनुमाननगर येथील शिवसेना नगरसेवक आत्माराव पवार व तरुणांमध्ये सोमवारी रात्री हाणामारी झाली होती. त्याचा राग आल्याने संशयित आरोपीने मंगळवारी दुपारी नगरसेवक आत्माराव पवार यांच्यावर चाकुहल्ला केला. यामध्ये त्यांच्या पोट, डोके आणि हाताला गंभीर जखम झाली. याप्रकरणी पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपीला अटक करण्यात आली आहे.

हनुमाननगर वॉर्डाचे शिवसेनेचे नगरसेवक आत्माराम माणिक पवार (वय ४१, रा. गल्ली क्रमांक पाच, हनुमाननगर) यांच्या घराजवळ आकाश पडोळ नावाचा तरुण राहतो. सोमवारी रात्री आकाश आणि त्याच्या मित्राला पवार समजावून सांगण्यास गेले होते. यावेळी वाद झाल्याने आरोपी आकाश व त्याच्या मित्रांनी पवार यांच्या घरावर दगडफेक केली. यामध्ये त्यांच्या कारची काच फुटली. दोन्ही गटांनी सोमवारी रात्री पुंडलिकनगर पोलिस ठाणे गाठून परस्पर तक्रारी दिल्या होत्या.

मंगळवारी सकाळी साडेदहा वाजता पवार हे दुचाकीवर महापालिकेमध्ये जाण्यासाठी निघाले होते. यावेळी आरोपी आकाश अचानक त्यांच्या दुचाकीसमोर आडवा झाला. काही कळायच्या आत आकाशने पवार यांच्यावर चाकुने हल्ला चढवला. यावेळी त्यांच्या डोक्याला, पोटावर वार लागले. पोटातील वार पवार यांनी डाव्या हाताने रोखला. यामुळे त्यांच्या तीन बोटांना गंभीर जखम झाली. यावेळी नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतल्यामुळे चाकू पवार यांच्या अंगावर फेकून देत आकाशने पलायन केले. नागरिकांनी तात्काळ पवार यांना खासगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले. घटनेची माहिती मिळताच शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी हॉस्पिटल गाठून पवार यांची भेट घेतली. याप्रकरणी पुंडलीकनगर पोलिस ठाण्यात आरोपी आकाश सुखदेव पडोळ (वय २० रा. हनुमाननगर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याला अटक करण्यात आली आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज