अ‍ॅपशहर

kailash satyarthi : अकरा कोटी बालमजूर घटवले, नोबेल विजेत्या सत्यार्थींच्या कहाणीने औरंगाबादकर स्तब्ध

नोबेल पुरस्कार विजेते कैलाश सत्यार्थी यांनी आपल्या जीवनातील अनुभव सांगितले. बालमजुरीविरोधात लढणाऱ्या सत्यार्थी यांची संघर्षाची कहाणी ऐकून उपस्थित सर्वच स्तब्ध झाले.

Edited byटीम मटा ऑनलाइन | महाराष्ट्र टाइम्स 24 Mar 2022, 9:06 am
म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद : 'मी शाळेत जाऊ लागलो, पण माझ्याच वयाचा बालक शाळेबाहेर बूटपॉलिश करताना दिसला. मी वयाच्या पाचव्या वर्षी पहिल्यांदा अस्वस्थ झालो, बेचैन झालो आणि याच प्रसंगाने माझ्या आयुष्याला खरी कलाटणी मिळाली... आणि सर्वांच्या प्रयत्नांनी बालमजुरांची संख्या २६ कोटींवरून १५ कोटींपर्यंत घटवण्याचा उलटा इतिहास घडवता आला.... बालमजुरी किंवा तस्करी किंवा चोरलेल्या बालकाला मुक्त करुन त्याच्या आईशी कुशीत सोपवताना आईच्या डोळ्यात तरळणाऱ्या आनंदाश्रूतच ईश्वरदर्शन होते,'... असे नोबेल विजेते कैलाश सत्यार्थी यांचे डोळे दिपवणाऱ्या शब्दांतील आयुष्यभराचे 'रेअरेस्ट ऑफ द रेअर शेअर' औरंगाबादकरांसाठी संस्मरणीय ठरले.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम kailash satyarthi speech child labour in india
अकरा कोटी बालमजूर घटवले, नोबेल विजेत्या सत्यार्थींच्या कहाणीने औरंगाबादकर स्तब्ध


औरंगाबाद मॅनेजमेंट असोसिएशनच्या वतीने बुधवारी (२३ मार्च) एमजीएमच्या रुक्मिणी सभागृहात झालेल्या 'रेअर शेअर' कार्यक्रमानेही आतापर्यंतचा सर्वोच्च बिंदू गाठला आणि याचे साक्षीदार असंख्य संवेदनशील औरंगाबादकर ठरले. या निमित्ताने नोबेल विजेते सत्यार्थी यांचा हा पहिलाच जाहीर कार्यक्रम ठरला. 'एमजीएम'चे सचिव अंकुशराव कदम, उद्योजक नंदकिशोर कागलीवाल, 'एएमए'चे सी. पी. त्रिपाठी, सतीश कागलीवाल, डॉ. सुनिल देशपांडे आदींच्या उपस्थितीत या हृद्य कार्यक्रमाची सुरुवात झाली. नर्मविनोदी शैलीतील चिमटे, हास्यविनोदांचे फवारे आणि अंतर्मुख करणाऱ्या भावभावना व विचारांसह सत्यार्थी यांनी आयुष्याचे पुस्तक मोकळे केलेर्ते म्हणाले, 'मी शाळेत जाऊ लागलो आणि माझ्याच वयाचा चर्मकाराचा मुलगा मात्र शाळेबाहेर बुटपॉलिश, चपलांची दुरुस्ती करताना पाहून मी चक्रावलो. मी शाळेत जातो, मग चर्मकाराचा मुलगा का जात नाही, या प्रश्नाने बालमजुरीच्या दाहकतेच्या चटक्यांनी मी स्वत: पोळून निघालो. पुढे इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग केले, नोकरीही केली. मात्र, बालमजुरी, बालकांची तस्करी, शोषण या विषयात कुणीही काम करत नसल्याचे आणि कमालीची उदासीनता असल्याचे जाणवत गेले. या विषयी कायद्यातही तरतूद नसल्याच्या वस्तुस्थितीने या क्षेत्रात काम करण्याचा मनाने ध्यास घेतला. त्यामुळे नोकरी सोडून दिल्लीत आलो. आठ बाय दहाच्या जागेत संसार थाटला. सर्व प्रकारच्या प्रतिकूल स्थितीचा अनुभव घेत पाक्षिक चालवले, बालमजुरी-शोषणाविरुद्ध प्रश्न मांडत असतानाच, एका दिवशी खंगलेला पिता दारात आला आणि स्वत:च्या १५ वर्षांच्या मुलीला विकण्यापासून रोखण्याची त्याने हातजोडून विनंती केली. माझी बहीण असती तर लिहित बसलो नसतो, हे मनोमन जाणवले आणि तिला सोडवण्यासाठी हल्लाही सहन केला. तरी प्रश्न सुटत नव्हता म्हणून न्यायालयात धाव घेतली आणि तिची सुटका झाली. या मुलीच्या मुक्तीनेच मला प्रत्यक्ष बळ मिळाले आणि अशी मोहीम त्यानंतर सातत्याने चालवली. आजपर्यंत एक लाख बालकांना सक्तीच्या बालमजुरीपासून तसेच चोरी-तस्करीपासून मुक्त करताना मला ईश्वरदर्शन झाले आणि हेच माझ्या आयुष्याचे सार्थक आहे.' डॉ. नताशा कौल-वर्मा यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले, तर संजय संगे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रयत्न पणाला

बालकांना शिक्षणाचा मूलभूत अधिकार मिळावा, यासाठी देशपातळीवर प्रयत्न पणाला लावावे लागले आणि सर्व स्वयंसेवी संस्थांना एकत्र आणून कायद्यात बदल करता आला. या संदर्भातील आंतरराष्ट्रीय कायद्यासाठी संयुक्त राष्ट्रांच्या कार्यालयात थेट घुसण्यापासून करावे लागलेले वेगवेगळे प्रयत्नही सत्यार्थी यांनी आपल्या वेधक शब्दांत मांडले. प्रत्येक तासाला जगातील आठ मुलांची चोरी होते, तर तेवढ्याच मुलांचे लैंगिक शोषण होते, ही दाहकता अजूनही आहे. मात्र ११ कोटी बालमजुरांची संख्या घटवल्याचे नक्कीच समाधान आहे, असेही ते म्हणाले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज