\Bम. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
\Bघर, कुटुंब सांभाळणाऱ्या, मुलांची काळजी वाहणाऱ्या, नोकरीसाठी धावपळ करणाऱ्या नारीशक्तीला महिला दिनानिमित्त रविवारी, आठ मार्चचा दिवस 'सुसाट वेगा'ने साजरा करण्याची संधी 'महाराष्ट्र टाइम्स' पुन्हा घेऊन आला आहे. रविवारी सकाळी सात वाजल्यापासून औरंगाबादमधील क्रांतीचौकातील हॉटेल मॅनोर येथून ही ऑल विमेन बाइक रॅली सुरू होणार आहे.
कोणताही सोहळा, समारंभ, पार्टी या प्रसंगी महिलांना विविध जबाबदाऱ्या पेलाव्या लागतात. तयारी करण्यापासून पाहुण्यांच्या स्वागतापर्यंत साऱ्याचे नियोजन करताना अनेकदा महिलांना कार्यक्रमाचा आनंदच घेता घेत नाही. मात्र, महिला दिनासारख्या हक्काच्या दिवशी काम, टेन्शन, जबाबदाऱ्या यांना काही काळासाठी मागे ठेवत महिलांना धम्माल करता यावी यासाठी दरवर्षीप्रमाणे यंदाही ही बाइक रॅली आयोजित करण्यात आली आहे. त्यादिवशी महिला सुसाट धमाल करणार आहेत. क्रांतीचौकातील हॉटेल मॅनोर येथून ही रॅली सकाळी सात वाजता सुरू होईल. विविध वेशभूषा, रंगभूषा, संकल्पना घेऊन महिला या रॅलीत सहभागी होतील. वेशभूषा, केशभूषा यांच्याबाबत कोणतीही सक्ती नसली तरी बहुतांशी महिला या रॅलीत सहभागी होताना पारंपरिक तसेच आधुनिक हटके पोषाख, फेटे, पगड्या पारिधान करतातच. विशेष म्हणजे नारीशक्तीला बाइकसह मोपेड आणि नॉन गिअर गाड्या घेऊनही रॅलीत सहभागी होता येईल.
\Bसामाजिक भान
\Bमहिला दिन म्हणजे धम्माल, मजा आणि मस्ती असे जरी असले तरी उत्साहाचा हा सोहळा साजरा करतानाही सामाजिक भान जपणे सख्या विसरत नाहीत. स्वतःच्या मनोरंजनाचा विचार न करता त्यातून प्रत्येकाचे प्रबोधन व्हावे आणि रॅलीच्या माध्यमातून एकत्र येणाऱ्या सर्वांपर्यंत जनजागृतीचा संदेश पोहचवावा हा विचार गेल्या दोन्ही वर्षांत पुढे आला आहे. यामध्ये स्त्री शिक्षणापासून आरोग्यापर्यंत प्रत्येक विषय हाताळला जातो. वेशभुषेतूनही या संकल्पना दाखविल्या जातात.