अ‍ॅपशहर

साडेनऊ हजार महिलांची धूरविळख्यातून सुटका

पर्यावरण रक्षण आणि महिलांच्या आरोग्यासाठी सुरू केलेल्या पंतप्रधान उज्ज्वला योजनेच्या ‘स्वच्छ इंधन, बेहतर जीवन’ या घोषवाक्याची प्रचिती औरंगाबाद जिल्ह्यातील ९ हजार ४७६ कुटुंबांना आली आहे. या दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना एलपीजी गॅसचे कनेक्शन देण्यात आले आहे.

Maharashtra Times 11 Jan 2017, 3:00 am
Ramchandra.Vaybhat@timesgroup.com
महाराष्ट्र टाइम्स.कॉम lpg gas for bpl families
साडेनऊ हजार महिलांची धूरविळख्यातून सुटका

Tweet : @ramvaybhatMT
औरंगाबाद ः पर्यावरण रक्षण आणि महिलांच्या आरोग्यासाठी सुरू केलेल्या पंतप्रधान उज्ज्वला योजनेच्या ‘स्वच्छ इंधन, बेहतर जीवन’ या घोषवाक्याची प्रचिती औरंगाबाद जिल्ह्यातील ९ हजार ४७६ कुटुंबांना आली आहे. या दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना एलपीजी गॅसचे कनेक्शन देण्यात आले आहे.
चुलीवर स्वयंपाक करताना लाकूड, कोळसा यांच्या धुराचा त्रास महिलांसाठी जीवघेणा ठरतो. कुटुंबातील सदस्यांची काळजी घेणाऱ्या महिला धुराच्या विळख्यात अडकल्या आहेत. पर्यावरणाचा आणि आरोग्याचा वाढता धोका टाळण्यासाठी केंद्र सरकारने प्रयत्न सुरू केले. दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना एलपीजी गॅस कनेक्शन देण्यासाठी पंतप्रधान उज्ज्वला योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेला औरगाबाद जिल्ह्यातून मोठा प्रतिसाद मिळाला आहे. खासदार चंद्रकांत खैरे यांच्या हस्ते काही दिवसांपूर्वी गॅस वितरणाचा प्रारंभ करण्यात आला. दारिद्र्य रेषेखालील ९ हजार ४७६ महिलांना संपूर्ण एलपीजी गॅस कनेक्श्न देण्यात आले आहे. योजनेच्या घोषणेनंतर औरंगाबाद जिल्ह्यात बीपीसीलएल, आयओसी आणि एचपी कंपन्यांच्या ४२ वितरकांच्या माध्यमातून योजनेसाठी अर्ज मागवण्यात आले होते. यासाठी तिन्ही कंपन्यांना १० हजार कनेक्शन देण्याचे टार्गेट देण्यात आले होते.
आतापर्यंत तिन्ही कंपन्यांकडे योजनेसाठी ३४ हजार ३३५ प्राप्त झाले. कागदपत्रांची तपासणी केल्यानंतर ११ हजार ८७५ अर्ज योजनेसाठी मंजूर करण्यात आले आहेत. त्यापैकी ९ हजार ४७६ अर्जदार महिलांना एलपीजी कनेक्शन देण्यात आल्यामुळे त्यांची घरे धूरमुक्त झाली आहेत. कनेक्शन घेताना सिलिंडर, रेग्युलेटरसाठी ठेवण्यात येणारी अनामत रक्कम माफ करण्यात आली आहे. अन्य साहित्यही एका टप्प्यात किंवा हप्त्यात देण्याची सोय योजनेमध्ये आहे. जोपर्यंत हप्ते पूर्ण होत नाहीत, तोपर्यंत सबसीडीच्या रुपाने हप्ते वळते करून घेण्यात येतात. मंत्रालयाने दिलेले उद्दिष्ट पूर्ण केल्यानंतर पुढील निर्णय घेण्यात येणार असल्याचे कंपनी अधिकाऱ्याने सांगितले.

दहा हजारांवर ग्राहकांनी नाकारले अनुदान
आर्थिकदृष्ट्या सक्षम नागरिकांनी गॅसचे अनुदान घेऊ नये. या अनुदानातून गरिबांच्या घरात गॅस कनेक्शन देता येईल, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले होते. औरंगाबाद जिल्ह्यात सुमारे दहा हजार ग्राहकांनी गॅस अनुदान घेणे बंद केले आहे, अशी माहिती गॅस कंपन्यांच्या सूत्रांनी दिली.

- जिल्ह्यातील गॅस वितरक ः ४२
- योजनेसाठी प्राप्त अर्ज ः ३४३३५
- निर्दोष अर्ज ः २७२११
- मंजूर अर्ज ः ११८७५
- कनेक्‍शन वाटप ः ९४७६

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज