अ‍ॅपशहर

राज ठाकरेंच्या दौऱ्यानंतर अखेर 'त्या' मनसे पदाधिकाऱ्यांची पक्षातून हकालपट्टी

Aurangabad MNS : राज ठाकरे यांच्या औरंगाबाद दौऱ्यानंतर औरंगाबाद मनसेमध्ये मोठ्या घडामोडी घडल्या आहेत. मनसेने दाशरथे गटातील पदाधिकाऱ्यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे.

Authored byटीम मटा ऑनलाइन | Edited byटीम मटा ऑनलाइन | Maharashtra Times 21 Dec 2021, 9:49 pm
औरंगाबाद : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Raj Thackeray) यांच्या दौऱ्यानंतर औरंगाबाद शहरातील मनसेतील धुसफूस आणि नाराजी नाट्य पुन्हा एकदा समोर आले होते. तर मनसेचे माजी जिल्हाध्यक्ष सुहास दाशरथे (Suhas Dashrathe) यांचं पद काढून घेतल्याने त्यांनी आपली नाराजी उघडपणे बोलून दाखवली होती. त्यामुळे आता दाशरथे गटातील पदाधिकाऱ्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. नूतन जिल्हाध्यक्ष सुमित खांबेकर (Sumit khambekar) यांनी काढलेल्या पत्रकात एकूण चार पदाधिकाऱ्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम raj thackeray
राज ठाकरे (मनसे अध्यक्ष)


राज ठाकरे यांनी आपल्या औरंगाबाद दौऱ्यात अचानकपणे सुहास दाशरथे यांच्यावर केलेली कारवाई चर्चेचा विषय ठरला होता. तर पद काढून घेतल्यानंतर दाशरथे यांच्या समर्थकांनी सोशल मीडियावर दाशरथे यांच्या बाजूने मोहीम चालवली होती. ज्यातून दाशरथे याचं काय चुकले असा सवाल पक्षश्रेष्ठींना करण्यात येत होता. तर आपलं दु:ख दाशरथे आणि त्यांच्या समर्थकांनी माध्यमांच्या माध्यमातून सुद्धा व्यक्त केला होता. त्यामुळे यासर्व घडामोडीची दखल घेत दाशरथे गटातील रमेश पुरी,चेतन शर्मा,संदीप कुलकर्णी आणि दीपक पवार यांची मनसेतून हकालपट्टी करण्यात आली आहे.

तर मनसेकडून काढण्यात आलेल्या पत्रकात म्हटले आहे की, सोशल मिडीयाच्या माध्यमातून पक्ष विरोधी आणि नेत्यांच्या विरोधात चुकीची पोस्ट- वक्त्यव्य केल्यामुळे वरील चारही पदाधिकाऱ्यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्राथमिक सदस्यत्व रद्द करण्यात आले आहे.

वरील बाब त्यांना वारंवार समजावून सांगून देखील पक्ष बदनाम होईल असे कृत्य करित असल्यामुळे त्यांच्यावर संबंधीत कारवाई करण्यात आलेली आहे. तरी वरील नावांशी आजपासून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेशी कोणाताही संबंध नाही. यापुढे त्यांनी जर महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाचा पदाधिकारी व कार्यकर्ता (महाराष्ट्र सैनिक) म्हणून कुठेही समाजात वावरतांना उल्लेख केला तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे पत्रकात म्हटले आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज